राज्य सरकारने ‘महाराष्ट्र ग्रामदान अधिनियम १९६४’ रद्द करण्यासाठी प्रारुप अधिनियमचा मसुदा प्रसिद्ध केला. त्यावर सूचना आणि हरकती मागवल्या, पण हा अधिनियम रद्द करण्यास कुणाचा विरोध आहे, त्याविषयी..
ग्रामदान म्हणजे नेमके काय?
ग्रामदान हा गांधीवादी विचारवंत विनोबा भावे यांनी १९५१मध्ये सुरू केलेल्या ‘भूदान चळवळी’चाच पुढचा टप्पा आहे. भूदानाचा अर्थ मोठ्या जमीनदारांकडून मिळालेल्या जमिनीचे भूमिहीनांमध्ये पुनर्वितरण करणे असा होता; तर ग्रामदानअंतर्गत संपूर्ण गाव आपली जमीन एका विश्वस्त संस्थेच्या स्वाधीन करते. या पद्धतीमुळे गावाबाहेरील कोणालाही किंवा गावातील ज्याने ग्रामदानात सहभाग घेतला नाही, अशा व्यक्तीला जमीन विकता येत नाही. मात्र, मूळ जमीनदार त्यावर शेती करणे सुरू ठेवू शकतात आणि त्याचे लाभ मिळवू शकतात. यामुळे नैसर्गिक संसाधनांवर समाजातील प्रत्येकाला समान हक्क आणि जबाबदाऱ्या मिळून त्यांचे रक्षण करण्याचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्रात ग्रामदान कायदा २१ गावांनी स्वीकारला. ही गावे दहा जिल्ह्यांमध्ये पसरली आहेत.
अधिनियम सरसकट रद्द करण्यास विरोध का?
महाराष्ट्र ग्रामदान अधिनियम १९६४ सरसकट रद्द करण्यास भूदान ग्रामदान किसान असोसिएशनसह भूदान चळवळीतील कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे. प्रारुप अधिनियमावर हरकती नोंदवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागण्याही मांडल्या आहेत. प्रथम कायद्यात आवश्यक सुधारणा करण्याचा पर्याय स्वीकारणात यावा, अशी भूदान चळवळीतील कार्यकर्त्यांची मागणी आहे. ग्रामदान अधिनियम हा केवळ जमीन व्यवहाराचा कायदा नाही. त्याकडे केवळ जमीन खरेदी-विक्री, हस्तांतरण किंवा महसूल अभिलेखांशी संबंधित कायदा म्हणून पाहणे योग्य होणार नाही. हा अधिनियम विनोबा भावे यांच्या भूदान-ग्रामदान विचारांना कायदेशीर चौकट देणाऱ्या ऐतिहासिक प्रक्रियेचा भाग आहे. त्यामुळे या अधिनियमाचे मूल्यमापन केवळ जमीन व्यवहारातील अडचणींच्या आधारे करून तो सरसकट रद्द करणे योग्य होणार नाही, असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
अंमलबजावणी अपुरी का राहिली?
ग्रामदान अधिनियमातील काही तरतुदी आजच्या काळात अडचणी निर्माण करीत असतील, तर त्या तरतुदींमध्ये आवश्यक सुधारणा करणे शक्य आहे. पण, गेल्या सहा दशकांत अधिनियमातील किती तरतुदी प्रभावीपणे लागू करण्यात आल्या? किती ग्रामदान गावांना अधिनियमाने अपेक्षित अधिकार प्रत्यक्षात देण्यात आले? अंमलबजावणीत विलंब होण्याची कारणे कोणती? ग्रामदान गावांच्या अडचणी कायद्यामुळे निर्माण झाल्या की प्रशासकीय अंमलबजावणीच्या अभावामुळे? असे प्रश्न भूदान चळवळीतील कार्यकर्त्यांनी उपस्थित केले आहेत.
मेंढा-लेखा प्रकरणात काय झाले?
गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा-लेखा हे ग्रामदान व्यवस्थेच्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाचे उदाहरण आहे. गावाने आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ग्रामदान स्वीकारले. त्यानंतर ग्रामदान अधिनियमाच्या कलम ३९ अंतर्गत ग्राम मंडळाला ग्रामपंचायतीचे अधिकार व कर्तव्ये देण्याची कार्यवाही शासनाकडून दीर्घकाळ प्रलंबित राहिली. परिणामी ग्राम मंडळास न्यायालयीन मार्गाचा अवलंब करावा लागला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणात शासनाच्या वैधानिक कर्तव्याकडे लक्ष वेधून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर शासनाने दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ रोजी संबंधित अधिसूचना काढून आवश्यक प्रशासकीय कार्यवाही केली. ज्या कायद्याची अंमलबजावणी करणे, ही शासनाची जबाबदारी आहे, त्या कायद्याची अंमलबजावणी वेळेवर न झाल्याने निर्माण झालेल्या समस्येच्या आधारावर तोच कायदा रद्द करणे न्याय्य ठरेल काय? हा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
प्रमुख मागण्या काय आहेत?
अधिनियम रद्द करण्याची प्रक्रिया स्थगित करावी, सर्व ग्रामदान गावांची यादी प्रसिद्ध करावी, जमीन आणि प्रशासकीय स्थिती सार्वजनिक करावी, प्रभावित गावांमध्ये सार्वजनिक सुनावणी घ्यावी, ग्रामसभा आणि ग्राम मंडळांचे लेखी मत घ्यावे, मेंढा-लेखा प्रकरणातील उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सखोल अभ्यास करावा, अधिनियमाच्या मागील सहा दशकांच्या अंमलबजावणची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अधिनियमातील प्रत्यक्ष अडचणींचा अभ्यास करून आवश्यक त्या तरतुदींमध्ये सुधारणा करावी, ग्रामदान जमिनीच्या मालकी, वापर, वारसा, हस्तांतरण आणि कर्जपुरवठ्याबाबत स्पष्ट कायदेशीर व्यवस्था करावी, ग्राम मंडळ आणि ग्रामपंचायत यांचे अधिकार व कर्तव्ये स्पष्ट करावीत, या प्रमुख मागण्या आहेत.
सुधारित ग्रामदान कायद्याचा पर्याय आहे का?
ग्रामदान अधिनियम रद्द करण्याऐवजी त्याचे आधुनिकीकरण करून सुधारित ग्रामदान कायद्याचा पर्याय निवडावा. या अधिनियमाकडे केवळ जुना किंवा कालबाह्य जमीन कायदा म्हणून पाहणे योग्य होणार नाही, असे भूदान चळवळीतील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. विनोबा भावे यांच्या विचारविश्वातून आणि असामान्य प्रतिभेतून साकार झालेले भूदान आणि ग्रामदान धोक्यात आले आहे, अशी खंत भूदान चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते नरेंद्र बैस यांनी व्यक्त केली आहे.
mohan.atalkar@expressindia.com
