– दयानंद लिपारे 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बलशाही, बलदंड मल्लांच्या परंपरेत कोल्हापुरात पृथ्वीराज पाटीलच्या रूपाने ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा परतल्याने चैतन्याची गुढी उभारली गेली आहे. महाराष्ट्र केसरीच नव्हे तर हिंदकेसरीचा किताब या नागरीतील मल्लांनी अनेकदा प्राप्त केला आहे. असा लौकिक असूनही गेली दोन दशके कोल्हापूरला किताबापासून वंचित राहावे लागले होते. ही परिस्थिती करवीरनगरीतील आखाडे आणि कुस्तीगिरांच्या चिंतेचा आणि चिंतनाचा भाग बनली होती. पृथ्वीराजच्या ऐतिहासिक जेतेपदाने कोल्हापूरच्या कुस्ती संस्कृतीवर काय परिणाम होईल, याचा घेतलेला वेध –

पृथ्वीराजचे जेतेपद कोल्हापूरसाठी का महत्त्वाचे आहे?

पृथ्वीराजने २१ वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळवून दिली आहे. कोल्हापुरात आजवर महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरीचे मानकरी अनेकजण झाले आहेत. पण आशियाई, राष्ट्रकुल, ऑलिम्पिक स्पर्धेतील यशापर्यंत कोणीही झेप घेतलेली नाही. पण या यशानंतर कोल्हापुरातून दर्जेदार मल्ल घडतील, अशी आशा करता येऊ शकते.

पृथ्वीराजचे यश हे कोल्हापूरच्या कुस्ती संस्कृतीसाठी कसे सकारात्मक ठरू शकेल?

कोल्हापूर म्हणजे कुस्ती ही सर्वदूर ओळख आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी अनेक कलागुणांना वाव दिला. तसेच मल्लविद्येला प्रोत्साहन दिले. त्यातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नामवंत मल्लांची मालिका आकाराला आली. मात्र या सहस्रकात कोल्हापूरच्या कुस्तीला ओहोटी लागल्याचे चित्र आहे. या काळात महाराष्ट्र केसरीने हुलकावणी दिली. आंतरराष्ट्रीय कुस्तीतही लौकिक मिळवावा असे काही घडले नाही. यातून कुस्तीविषयी काहीशी निराशाजनक भावना नव्या पिढीत दिसते. त्यामुळे सध्याची पिढी फुटबॉलकडे झपाट्याने वळली. फुटबॉलचे अनेक क्लब आणि प्रत्येक क्लबचे हजारो चाहते. एकूणच फुटबॉलच्या प्रेमात कोल्हापूरकर आकंठ बुडाले आहेत. पृथ्वीराजच्या निमित्ताने पुन्हा एकदा कुस्तीविषयी आकर्षण निर्माण होऊन तालमीमध्ये नवी पिढी दंड थोपटताना दिसेल असे आशादायक चित्र अपेक्षित आहे.

कोल्हापूरची कुस्तीमधील मानसिकता बदलेल का?

कोल्हापूरच्या कुस्ती क्षेत्राचे अंतर्बाह्य स्वरूप, मानसिकता बदलण्याची गरज आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या खासबाग मैदानात गवत माजले आहे; याची चिंता कोणालाच पडलेली नसावी? कुस्तीगीर म्हणजे मन, मनगट, मेंदूचा विकास अशी एक ढोबळ व्याख्या केली जात असताना कोल्हापूरच्या आजचे कुस्तीविश्व खुलेपणा दाखवणार का? असाही प्रश्न आहे. पृथ्वीराजच्या उज्ज्वल यशानंतर मनमुराद आनंद व्यक्त करताना मर्यादा का जाणवल्या? महाराष्ट्र केसरी मिळूनही उत्साहाचे फटाके कोठे दिसले नाहीत; ते का बरे? माझ्या तालमीच्या मल्लांनी ‘महाराष्ट्र केसरी’ मिळवली तर हत्तीवरून मिरवणूक काढू, असे घोषित करण्याच्या वृत्तीतून कुस्तीक्षेत्राचा दिलदारपणाऐवजी संकुचित वृत्ती दिसते. तालमी-तालमीतील अडेलतट्टूपणा दिसतो. तो टाळून आखाड्यांमधील परस्परांचा सुसंवाद वाढून कोल्हापूरच्या कुस्तीची नवी सुरुवात होईल, अशी आशा आहे.

पृथ्वीराजचे यश आंतरराष्ट्रीय स्तरावर परिवर्तित होईल का?

कोल्हापूरच्या वैभवशाली कुस्ती परंपरेमुळे महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरीच्या मानाच्या गदा एकापाठोपाठ येत गेल्या. कुस्तीची हा लौकिक लयाला का जातो, याचा याचा विचार गंभीरपणे होताना दिसत नाही. देशभरातील कुस्तीचा आढावा घेतात उत्तर भारतातील मल्लांचा दबदबा वाढला आहे. आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये त्यांचाच लौकिक दिसतो आहे. या पातळीवर कोल्हापूरचे किंबहुना महाराष्ट्राचे मल्ल अपवादानेच चमकताना दिसतात. कोल्हापूर, महाराष्ट्रातील मल्लांचा प्रवास फार तर हिंदकेसरीपर्यंत जाऊन पोहोचतो. यात पृथ्वीराजचा प्रवासात काहीसा वेगळा आणि नव्या उंचीने जाणारा आहे. त्याने कुमार जागतिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे. काही आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे सुवर्ण पदक पटकावले आहे. महाराष्ट्र केसरीवीरांपैकी फार थोड्या मल्लांना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत हे यश परिवर्तित करता आले आहे. ही पृथ्वीराजकडून अपेक्षा आहे. १९५२ साली फिनलंड (हेलसिंकी) ऑलिम्पिक स्पर्धेत खाशाबा जाधव यांनी कुस्तीमध्ये कांस्यपदक मिळवले. तेव्हापासून आजमितीपर्यंत महाराष्ट्राने तिथपर्यंत कधीच मजल मारली नाही. या कालखंडात कुस्ती क्रीडा प्रकारातील वर्चस्व हे  उत्तरेकडील मल्लांनी मिळवले आहे. पृथ्वीराज आपले यश आशियाई आणि ऑलिम्पिकपर्यंत उंचावू शकतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra kesari 2022 winner prithviraj patil will this help kolhapur to gain its glory print exp scsg
First published on: 13-04-2022 at 09:32 IST