Monsoon & Pre Monsoon Difference : मोसमी पावसाचा (मान्सूनचा) प्रवास सुरू असतानाच सध्या राज्याच्या काही भागांत पूर्वमोसमी पावसाच्या सरींची हजेरी आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गुरुवारी (१९ मे) पाऊस झाला. पुढील एक ते दोन दिवस पावसाची शक्यता कायम आहे. त्याचप्रमाणे देशातील पश्चिम-उत्तर, पूर्वोत्तर आणि दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये पुढील तीनचार दिवस जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. पण मान्सून आणि मान्सूनपूर्व पाऊस या दोन गोष्टींमध्ये काय फरक आहे?, अनेकदा हे दोन शब्द वापल्या वाचनात येतात. पण त्याचा नक्की अर्थ काय? या दोघांमध्ये काय फरक असतो आणि याचसंदर्भात अनेक प्रश्नांची उत्तरं या लेखामधून जाणून घेऊयात…

जून महिना जवळ आला की सगळीकडे मान्सून कधी येणार अशी चर्चा सुरु होते. मे महिन्यात किंवा जूनच्या सुरुवातील आलेला पाऊस म्हणजे मान्सूनपूर्व आणि विशिष्ट तारखेला येणारा पाऊस म्हणजेच मान्सून असेही हवामान खाते आणि हवामान तज्ज्ञांकडून सांगितले जाते. पण हा मान्सून नेमका ओळखायचा कसा? त्या विशिष्ट पावसालाच मान्सून का म्हणायचं असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. यातील नेमका फरक समजून घेण्यासाठी काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.

how does hail fall marathi news, how does hail fall in summer marathi news
विश्लेषण: गारांचा पाऊस कडक उन्हाळ्यात कसा पडतो? हिमवर्षाव आणि गारपिटीमध्ये काय फरक?
Loksatta explained Due to the continuous increase in mustard production, the discussion of yellow revolution is starting
विश्लेषण: देश पिवळय़ा क्रांतीच्या दिशेने..
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?

मान्सून आणि मान्सूनपूर्व पाऊस आपल्याला काही सामान्य निरीक्षणांवरुनही ओळखता येतो. काय आहेत ही निरीक्षणे पाहूयात…

१. मान्सूनपूर्व पावसादरम्यान दिवसभर खूप उकडते, हा उकाडा असह्य होतो आणि मग पाऊस कोसळतो. मान्सूनमध्ये ढग जमा होतात. ऊन आणि सावली यांचा खेळ सुरु होतो, काहीवेळा संथ वाराही वाहतो आणि मग हा पाऊस पडतो.
२. मान्सूनपूर्व पावसात उष्णतेमुळे ढग निर्माण होतात. वारा खालून वर जातो आणि बाष्प साठून पाऊस येतो. मान्सूनमध्ये ढग जमिनीला समांतर दिशेने पुढे पुढे सरकतात आणि पाऊस पडण्यास सुरुवात होते.
३. मान्सूनपूर्व पावसाचे ढग दाट असतात तसेच त्याची जाडी आणि उंचीही खूप असते. मान्सूनचे ढग तितके उंच नसतात. त्याची जाडीही कमी असून ते पसरलेले असतात.
४. मान्सूनपूर्व पाऊस स्थानिक आणि कमी पट्ट्यात पडतो तर मान्सून तुलनेने जास्त टप्प्यात विस्तृत दिसतो.
५. मान्सूनपूर्व पाऊस गडगडाटी, धडाकेबाज आणि रौद्र असतो. मान्सून संततधार, संथ आणि शांतपणे येतो.

याशिवाय शास्त्रीय दृष्ट्याही मान्सूनपूर्व आणि मान्सून ओळखण्याच्या काही पद्धती आहेत. त्या खालीलप्रमाणे…

१. मान्सूनमध्ये वाऱ्याची दिशा, गती यांचा अभ्यास केलेला असतो. त्यानुसार या पावसाचा अंदाज बांधता येतो. मान्सून नैऋत्य दिशेने येतो. मान्सूनपूर्व पावसासाठी असे विशेष कोणते अंदाज नसतात.
२. आकाश ढगांनी किती आच्छादलेले आहे यावरुन मान्सून ओळखता येऊ शकतो. मान्सूनपूर्वमध्ये असा निकष लावता येत नाही.
३. मान्सून केरळमध्ये आला हे ओळखण्यासाठी त्या विशिष्ट ठिकाणी काही जागा निश्चित केली जाते. त्या ठिकाणी विशिष्ट प्रमाणात पाऊस पडल्यास तो मान्सून आहे असा निष्कर्ष बांधता येतो.
४. याशिवाय ढगांचा पट्टा कुठपर्यंत सरकला आहे यानुसार मान्सून ओळखता येतो. हे मोजण्याच्या काही शास्त्रीय पद्धती आहेत. त्यांचा अभ्यास करुन मान्सूनची ओळख पटते.

देश आणि मुख्यतः शेतकरी ज्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात तो मान्सून की मान्सूनपूर्व हे वरील काही निकषांवरून ओळखता येते. मान्सून नेमका कधी येणार आणि त्याआधी आलेला पाऊस हा मान्सूनपूर्व आहे का, हे ओळखता येण्यासाठी काही किमान निरीक्षणे नोंदवल्यास सामान्यांनाही यातील फरक कळू शकतो, असे ‘भवताल’ मासिकाचे संपादक आणि पर्यावरणविषयक पत्रकार अभिजित घोरपडे यांनी ‘लोकसत्ता डॉटकॉम’ला सांगितले.