राज्यातील आगामी रब्बी हंगामावर संकटाचे ढग जमा झाले आहेत. पुरेशा पावसाअभावी पिण्याच्या पाण्याचीच टंचाई जाणवत असेल तर रब्बी पिकांना पाणी कुठून मिळणार, अशी स्थिती आहे. दुसरीकडे हंगामात लागवडच झाली नाही, तर संपूर्ण ग्रामीण कृषी अर्थ व्यवस्थाच अडचणीत येणार आहे.
रब्बी हंगामात लागवड क्षेत्र किती ?
राज्यात रब्बी हंगामात ऑक्टोंबर, नोव्हेंबर महिन्यात लागवड होते. काही ठिकाणी ऊसतोडणी झाल्यानंतर जानेवारी अखेरपर्यंत लागवडी होतात. राज्यात रब्बी हंगामात सरासरी ५३ लाख ९६ हजार ९६९ हेक्टरवर लागवड होते. त्यात हरभरा पिकाची सर्वाधिक लागवड २१ लाख ५२ हजार १४ हेक्टवर होते. त्या खालोखाल १७ लाख ५३ हजार ११८ हेक्टरवर रब्बी ज्वारी, १० लाख ४८ हजार ८०७ हेक्टरवर गहू, २ लाख ५८ हजार ३३१ हेक्टरवर मका, ओट, बार्ली, राजीगरासह इतर तृणधान्ये ११ हजार २९५ हेक्टर, मटकी, मसूरसह अन्य कडधान्ये १ लाख १७ हजार ७५३ हेक्टरवर, करडई, जवस, तीळ, सूर्यफूल, मोहरी, भुईमूग आदी तेलबियांची ५५ हजार ६६० हेक्टर, अशी रब्बी हंगामात एकूण ५३ लाख ९६ हजार ९६९ हेक्टरवर रब्बी हंगामात लागवड होते.
पाणी टंचाईमुळे लागवडीवर परिणाम ?
यंदाच्या पावसाळ्यात राज्यात सरासरीच्या तुलनेत १९ टक्के कमी पाऊस झाला आहे. पावसाळ्यात सरासरी ९०४.५ मिमी पाऊस पडतो, यंदा ८०४ मिमी म्हणजे सरासरीच्या १९ टक्के कमी पाऊस झाला आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी २० जिल्ह्यांमध्ये कमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ५८ टक्के कमी पाऊस झाला आहे. बीडमध्ये ५१ टक्के, जालन्यात ४८ टक्के, हिंगोलीत ४९ टक्के, धाराशिव ४५ टक्के, अहिल्यानगर ४६ टक्के, परभणी, आमरावतीत ४० टक्के, अकोल्यात ३७ टक्के, सिंधूदुर्गमध्ये ३६ टक्के, नंदूरबारमध्ये ३९ टक्के, सातारा २८ टक्के, सांगली २४ टक्के, लातूर ३८ टक्के, नांदेड ३४ टक्के, वाशिम ३५ टक्के, अकोला ३७ टक्के, नागपूर २८ टक्के, चंद्रपूर २९ टक्के आणि वर्धा जिल्ह्यात सरसारीच्या तुलनेत २८ टक्के कमी पाऊस झाला आहे.
परतीच्या मोसमी पावसाची हुलकावणीमुळे संकट गंभीर ?
यंदा १९ सप्टेंबरपासून देशातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला. ३ ऑक्टोंबरपर्यंत निम्या राज्यातून आणि १० ऑक्टोंबरपर्यंत संपूर्ण राज्यातून मोसमी पाऊस माघारी गेला आहे. सप्टेंबर महिन्याचा अखेरचा आठवडा आणि ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या विविध भागात प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील भागात, पश्चिम महाराष्ट्रात, कोकण किनारपट्टीवर मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडतो. यालाचा काही भागात उतरा – हस्ताचा, हत्तीचा पाऊसही म्हटले जाते. खरीप पिकांमुळे शेत जमिनीतील ओलावा कमी झालेला असतो. परतीच्या पावसाने पुन्हा शेत जमिनीत ओलावा वाढतो. परतीचा पाऊस पश्चिम महाराष्ट्रात इतका मोठा असतो की, शेत जमिनीचे बांध फुटतात. खरिपातील काढणीला आलेली पिके मातीमोल होतात. हा पाऊस रब्बी हंगामासाठी पोषक ठरतो. यंदा परतीचा पाऊस न झाल्यामुळे आणि पावसाळ्यात ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात खंड पडल्यामुळे जमिनीत मुळातच ओलावा कमी आहे. विहिरी, कुपनलिकांमध्ये पाण्याची पातळी खालावली आहे. त्यात तापमानात वाढ झाल्यामुळे सिंचनासाठी पाण्याची टंचाई जाणवत आहे, अशा स्थितीत रब्बी हंगामातील पेरण्या सरासरी ५० टक्क्यांपर्यंतच जाण्याचा अंदाज आहे.
रब्बी ज्वारीच्या पट्ट्यात पावसाची मोठी तूट ?
राज्यात रब्बी हंगामात मराठवाडा, विदर्भात हरभरा, तेलबियांची पिके घेतली जातात. विदर्भ, मराठवाड्यासह नाशिक, पश्चिम महाराष्ट्रात पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी गहू पिकाची लागवड केली जाते. नाशिक, पुणे. अहिल्यानगर भागांत कांद्याची लागवड होते. कमी पाण्यात, एक – दोन पावसात येणारे ज्वारीचे पीक पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून सोलापूर परिसरात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मंगळवेढ्याला ज्वारीचे आगार मानले जाते. पण, यंदा सोलापुरात सरासरीच्या तुलनेत ५८ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. सोलापूर परिसर मोठ्या पाणी टंचाईचा सामना करत आहे. त्यामुळे ज्वारी लागवडीसाठी प्रसिद्ध असलेल्या भागातच ज्वारी लागवड अडचणीत आली आहे. तरीही राज्याच्या अन्य भागात कमी पाण्यावर येणारी, पिकाला आली नाही तरी किमान चारा मिळेल, म्हणून शेतकरी ज्वारी लागवडीवर भर देण्याचा अंदाज आहे.
पाण्याअभावी भाजीपाला, फळभाज्यांची दरवाढ अटळ ?
राज्यातील धरणांमध्ये पाण्याची स्थिती आजघडीला समाधानकारक आहे. १० ऑक्टोंबरअखेर धरणांमध्ये ७२.९९ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी ९०.७२ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत २२ टक्के कमी आहे. या उपलब्ध पाण्याचे नियोजन ऑगस्ट २०२७ अखेर पिण्याच्या पाण्यासाठी केले जाणार आहे. सरकारने उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे धरणांतून शेतीला, सिंचनासाठी पाच – सहा पाण्याची आवर्तने मिळणार नाहीत. पाण्याची उपलब्धता पाहून एक – दोन आवर्तने मिळतील. पण, हे पाणी गहू, ऊस, डाळिंब, द्राक्ष, केळी सारख्या फळबागांना पुरेसे नाही. अपुऱ्या पाण्यामुळे नद्याच्या काठावर भाजीपाला पिके घेणेही कठीण आहे. त्यामुळे लागवडच झाली नाहीतर बाजारात तुटवड निर्माण होऊन भाजीपाल्यांची दरवाढ होण्याची शक्यता आहे. वाढते तापमान त्यात आणखी भर घालणार आहे. दक्षिण भारतात माघारी मोसमी पाऊस सक्रीय न झाल्यास दक्षिणेतून मुंबई, पुण्यात होणारी भाजीपाल्यांची आवक थांबून महागाईचा भडकाच उडण्याची शक्यता आहे.
