राज्यात दुष्काळाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली असून ऑक्टोबर महिन्यातच तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. त्यातच बहुतांश भागातील तापमानाचा पारा ३८ अंशाच्या पार गेल्याने उन्हाचा कडाकाही वाढला आहे. यंदाच्या मौसमी हंगामात पावसाने दीर्घकाळ उघडीप दिल्याने जलसाठ्यांवर मोठा ताण आला आहे. एल निनोचा प्रभाव दिवसेंदिवस तीव्र होत असल्याने ग्रामीण आणि शहरी भागातील पाणीपुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पाण्याच्या बचतीसाठी कठोर उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये पाणीकपात, पाण्याची नासाडी करणाऱ्यांना दंड आकारणे आणि बेकायदा नळ जोडणाऱ्यांवर कारवाई करणे यांसारख्या बाबींचा समावेश आहे, त्याविषयी…

यंदाच्या हंगामात पुरेसा पाऊस न झाल्याने मराठवाडा आणि विदर्भातील शेतीपिकांना मोठा फटका बसला आहे. पाण्याअभावी उभी पिके करपून गेल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. हीच बाब लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने २६ सप्टेंबर रोजी राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. यावरून जवळपास ७४ टक्के तालुक्यांना दुष्काळाचा फटका बसल्याचे दिसून येते. सध्या अनेक भागात पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. हे जलसंकट २०२७ पर्यंत कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने आतापासूनच पाणीबचतीसाठी नियोजन सुरू केले आहे.

राज्यात पाणीटंचाईचे संकट कसे निर्माण झाले?

राज्यात ऑक्टोबरमध्येच तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्यामागे यंदा पावसाने दीर्घकाळ फिरवलेली पाठ हे प्रमुख कारण आहे. त्यातच काही जलशयांमध्ये जमा झालेला पाणीसाठा वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन होऊन कमी होत चालला आहे. सध्या राज्यातील बहुतांश धरणे कोरडीठाक पडली असून विहिरींनीही तळ गाठला आहे. या दुष्काळी परिस्थितीत पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे. हीच बाब लक्षात घेता राज्य सरकारने १६ ऑक्टोबरपासून महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना किमान १० टक्के पाणीकपात लागू करण्याचे निर्देश दिले. दुष्काळी परिस्थिती आणि एल निनोमुळे पाणीटंचाई आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले. याशिवाय, औद्योगिक क्षेत्रालाही वापरल्या जाणाऱ्या पाण्यापैकी किमान ३० टक्के पाण्याचा पुनर्वापर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी नियोजनाचा आराखडा तयार

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, जलसंपदा विभागाने ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंतचा धरणनिहाय आणि वापरनिहाय सविस्तर जलव्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. नागरिक, पशुधन आणि जनावरांसाठी चाऱ्याची गरज भागवल्यानंतरच सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा विचार केला जाणार आहे. यादरम्यान धरणांमध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी अतिरिक्त १० टक्के पाणीसाठा राखून ठेवणे, पाण्याची गळती रोखणे आणि अनधिकृतरीत्या पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करणे, अशा सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करून आगामी काळातील पाणीटंचाईचा सामना करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना?

राज्यात पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने विविध शहरांमध्ये उपलब्ध जलसाठा आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन निर्बंध लागू केले जात आहेत. पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी दंडात्मक कारवाई, पाणीपुरवठ्यात कपात आणि सांडपाण्याचा पुनर्वापर अशा उपाययोजनांवर भर दिला जात आहे. नागपूरमधील धरणांमध्ये त्यांच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे तेथील महापालिकेने पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यानुसार वाहने धुण्यासाठी पाण्याचा वापर करणे, घरासमोरील अंगणात विनाकारण पाणी मारणे, बागांना पाणी देणे तसेच बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणे, असे प्रकार आढळून आल्यास प्रत्येक वेळी ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. याशिवाय अवैध नळ जोडण्या आणि पाण्याच्या मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांविरोधात छापे टाकले जात आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास पोलिसांत तक्रारही नोंदवली जाणार आहे. सध्या शहरातील जुन्या विहिरींच्या स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यावर सौरऊर्जा पंप बसवून पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे, तर उद्याने व बांधकामांसाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.

पुणे शहरात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याची तयारी

पुणे शहरातही पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अधिक कठोर निर्बंध लागू करण्याची तयारी सुरू आहे. आगामी काळात पुणेकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. १२ ऑक्टोबरपर्यंत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत केवळ २६.२२ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे १५ ऑक्टोबरपासून दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याची योजना आखण्यात आली आहे. शहरातील अधिकृत व अनधिकृत सर्व वाहनांचे वॉशिंग सेंटर पुढील आदेशापर्यंत तातडीने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच बांधकाम, बागकाम आणि जलतरण तलावांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास बंदी घालण्यात येणार आहे. याशिवाय गृहनिर्माण सोसायट्यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू ठेवण्याचे आणि प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर बागांसाठी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनधिकृत नळजोडण्यांविरोधात कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. नागरिकांना पाण्याची गळती आढळल्यास त्वरित प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये धरणातील पाण्याचे तीव्र बाष्पीभवन

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात वेगळ्याच संकटाने डोके वर काढले असून जायकवाडी धरणातील पाण्याचे तीव्र उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. या धरणातील दररोज अंदाजे १.६४९ अब्ज लिटर पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सुमारे १८ लाख नागरिकांच्या सात दिवसांच्या पाणीवापराएवढे हे प्रमाण आहे. हे बाष्पीभवन शहरातील १८ लाख लोकसंख्येला सुमारे सात दिवस पुरेल इतके प्रचंड आहे. छत्रपती संभाजीनगर शहराला दररोज २०० ते २३० दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. यंदा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी १८४ दशलक्ष घनमीटर पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. मात्र, वाढत्या तापमानामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने उपलब्ध जलसाठ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

दुष्काळाचा राज्यातील शेतकऱ्यांना किती मोठा फटका?

दुष्काळाचा शेतीवर होणारा परिणाम दिवसेंदिवस गंभीर होत असून, उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. विशेषतः नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठ्या प्रमाणात उत्पादन घटण्याची भीती सतावत आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार यंदा नाशिक जिल्ह्यात मोसमी पावसाच्या सरासरीच्या केवळ ३४.३ टक्के पाऊस झाला आहे. पावसातील मोठ्या तुटीचा फटका जिरायती पिकांना बसला असून, बाजरी आणि कांद्याच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. पाण्याअभावी द्राक्षबागा वाचवण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे. दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील खरीप हंगामातील मका, कापूस, सोयाबीन तसेच तुरीचे पीक दुष्काळाने नष्ट झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरीही आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप जमा झालेली नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा याची अनेकांना चिंता सतावत आहे.

दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारच्या उपाययोजना काय?

दुष्काळामुळे ग्रामीण भागातील रोजगार, उपजीविका आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याने राज्य सरकारकडून मदत उपाययोजनांचे नियोजन केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील सहा ते आठ महिन्यांसाठी दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण रहिवाशांना मदत देण्याचे नियोजन केले आहे. त्यामध्ये रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. दुष्काळामुळे झालेल्या पीकनुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या ११ सदस्यीय पथकाने राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा केला होता. त्यामध्ये बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश होता. पावसाची कमतरता आणि पावसातील दीर्घ खंडामुळे पिकांचे किती नुकसान झाले, याची पाहणी या पथकाने केली. यादरम्यान जालना, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये दररोज सुमारे एक हजार पाण्याचे टँकर तैनात केले जात आहेत. परिस्थिती आणखी गंभीर झाल्यास पुढील तीन ते चार महिन्यांत ही संख्या दररोज सुमारे पाच हजारांपर्यंत वाढवली जाणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे सविस्तर निवेदन सादर करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे. याशिवाय, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, जनावरांसाठी चाऱ्याची खरेदी आणि गरजेनुसार पशुधन छावण्या सुरू करण्याबाबतही सरकार विचार करत आहे.