पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंड आणि युक्रेन दौऱ्यावर आहेत. ४५ वर्षांमध्ये पोलंडला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. २१ आणि २२ ऑगस्ट रोजी ते वॉर्सा येथे असतील. त्यानंतर ते ‘रेल फोर्स वन’ मधून २० तासांचा रेल्वे प्रवास करून युक्रेनला जातील. पंतप्रधान मोदी वॉर्सा येथे भेट देत असल्याने दोन्ही देशांमधील संबंधांची चर्चा सुरू झाली आहे. भारत आणि पोलंडमध्ये ऐतिहासिक संबंध आहेत. १९३० च्या दशकात एक पोलिश महिला भारतात आली आणि त्या महिलेने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले आणि अगदी हिंदू धर्माविषयीचे लिखाण, योगाभ्यास यांसारख्या अनेक गोष्टी केल्या. यातून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्या महिला होत्या वांडा डायनोस्का. त्यांच्याच विषयी सविस्तर जाणून घेऊ.

वांडा डायनोस्का कोण होत्या?

१८८८ मध्ये सेंट पीटर्सबर्ग येथे जन्मलेल्या डायनोस्का पोलंडमधील एका प्रतिष्ठित कुटुंबातून आल्या होत्या. ‘कॉस्मोपॉलिटन रिव्ह्यू’नुसार, पोलिश भाषेसह त्यांना जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन, लाटवियन आणि इंग्रजी भाषेचेही ज्ञान होते. त्यांना रशियन भाषाही येत होती. डायनोस्का यांना लहान वयातच धार्मिकतेची जाणीव झाली होती, असे ‘कॉस्मोपॉलिटन रिव्ह्यू’च्या लेखात दिले आहे. त्यांचे होणारे पती युद्धात मरण पावल्यामुळे त्यांच्यावर दीर्घ परिणाम झाला होता. या दुःखद घटनेनंतर त्यांनी स्वत:ला संपूर्णतः अध्यात्मात झोकून दिले, असे ‘द हिंदू’च्या वृत्तात दिले आहे.

१८८८ मध्ये सेंट पीटर्सबर्ग येथे जन्मलेल्या डायनोस्का पोलंडमधील एका प्रतिष्ठित कुटुंबातून आल्या होत्या. (छायाचित्र-रमाना हृदयम/फेसबुक)

हेही वाचा : गुजरातच्या या महाराजांची पोलंडच्या घरोघरी पूजा, रस्तेही त्यांच्याच नावावर; कारण काय? कोण होते महाराजा जाम साहेब?

ब्रिटीश समाजसुधारक ॲनी बेझंट आणि डायनोस्का यांची चांगली मैत्री होती. त्यांनी पोलंड आणि भारत यांसारख्या साम्राज्यवादी शक्तींनी शासित राष्ट्रांच्या स्वातंत्र्याचे समर्थन केले. पहिल्या महायुद्धाच्या शेवटी, १९१८ मध्ये पोलंडला पुन्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या पोलंडला परतल्या. तिथे त्यांनी थिओसॉफीवरील (ईश्वराचा साक्षात्कार घडवून आणणारे तत्वज्ञान) व्याख्यानांना हजेरी लावली आणि ‘पोलिश फेडरेशन ऑफ द ऑर्डर ऑफ युनिव्हर्सल युनायटेड मिक्स्ड फ्रीमेसनरी’ची स्थापना केली. त्यात महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश होता.

वांडा डायनोस्का यांचा भारताशी संबंध

डायनोस्का १९३५ साली भारतात आल्या. त्यांनी भारतात योगाचा अभ्यास केला आणि हिंदू धर्मावर विपुल लेखन सुरू केले. त्यांना अनेक भाषांचे ज्ञान होते, परंतु भारतात आल्यावर त्यांनी हिंदी आणि तमिळ भाषाही शिकल्या. डायनोस्का यांनी भगवद्गीता, रामायण, महाभारत आणि इतर अनेक हिंदू धर्मग्रंथांचे पोलिश भाषेत भाषांतर केले. ‘द हिंदू’ वृत्तानुसार त्यांनी पोलिश कवींच्या अनेक महत्त्वपूर्ण कामांचे इंग्रजी, तमिळ आणि हिंदीमध्ये भाषांतर केले. डायनोस्का यांनी पोलिश-इंडियन लायब्ररीची स्थापना करण्यासाठी मौरीसी फ्राइडमन, ज्यू पोल आणि सहकारी थिऑसॉफिस्ट यांची मदत घेतली. इंडो-पोलिश लायब्ररी सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

“दोन्ही देशांचे संबंध आणखी मजबूत करण्यात आणि पूर्व व पश्चिम देशांना जवळ आणण्यात त्यांनी मदत केली. विशेष म्हणजे त्यांच्या पोलंड भेटीदरम्यान त्यांनी त्या प्रदेशातील सर्वात लांब आणि सर्वात मोठी नदी विस्तुलामध्ये गंगाजल वाहिले. हे दोन संस्कृतींच्या मिलनाचे प्रतीक होते,” असे ‘एन्लायटेन्ड सोल: द थ्री नेम ऑफ उमादेवी’ या माहितीपटाची निर्मिती करणार्‍या जाहिरात चित्रपट निर्मात्या सुजाता सेट यांनी ‘द हिंदू’ला सांगितले होते. डायनोस्का यांनी भारतातील वर्तमानपत्रांसाठी लेखन केले होते. त्यांनी मुलांमध्ये देशभक्ती जागृत करण्याचे महत्त्व आणि दुसऱ्या महायुद्धाच्या अतिरेकांचा पोलंडवर झालेला परिणाम याबद्दलही लिहिले.

युद्धातून सुटण्यासाठी भारतात आलेल्या पोलिश निर्वासितांचीही त्यांनी मदत केली. १९४० च्या दशकात, नवानगर (सध्या गुजरातमधील जामनगर म्हणून ओळखले जाते) येथील जाम साहब दिग्विजयसिंहजी महाराज यांनी १००० हून अधिक पोलिश निर्वासित मुलांना आश्रय दिला होता. त्याचप्रमाणे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कोल्हापूर प्रेसिडेन्सी (आता महाराष्ट्रात) वळिवडे येथे पोलिश छावणी उभारण्यात आली होती.

महात्मा गांधींनी दिली ‘उमादेवी’ अशी ओळख

डायनोस्का यांची महात्मा गांधींशी मैत्री झाली. डायनोस्का यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा दिल्याने महात्मा गांधी यांनी त्यांना उमादेवी या नावाने सन्मानित केले. उमादेवीने १९५९ मध्ये तिबेटी शरणार्थी चीनमधून पळून आल्यानंतर त्यांना स्थायिक करण्यास मदत केली. त्यांनी त्यांच्यासाठी निधी उभारला आणि मुलांना भारतातील शाळांमध्ये आश्रय दिला. ‘डेली पायोनियर’च्या वृत्तानुसार, तिबेटी मुळाशी ही मुले जुळली राहावी यासाठी मुलांनी त्यांचे पारंपरिक कपडे घालावे आणि त्यांची भाषा बोलावी असा उमादेवी यांनी आग्रह धरला. तेव्हा तिबेटी लोकांनी त्यांना ‘तेन्झिन चोडॉन’ म्हणजेच विश्वासाचा रक्षक असे नाव दिले.

हेही वाचा : कोलकाता अत्याचार प्रकरणामुळे मुंबईतील १९७३ च्या दुर्दैवी घटनेची आठवण; काय होते अरुणा शानबाग प्रकरण?

उमादेवींनी दलाई लामांबरोबरही वेळ घालवला आणि त्यांना काही काळ शाकाहारी होण्यास प्रेरित केले. ‘सेट’ला दिलेल्या मुलाखतीत दलाई लामा यांनी त्यांची आठवण करून देत, त्यांचा उल्लेख ‘मदरजी’ (आईसमान) म्हणून केला. ‘सेट’च्या म्हणण्यानुसार, “उमादेवी या संन्यासी नव्हत्या त्यांनी जगाचा पूर्णपणे त्याग केला होता. अध्यात्मात विलीन झाल्यामुळे त्यांना दुःखाचा स्वीकार करण्यात मदत झाली.” ‘कॉस्मोपॉलिटन रिव्ह्यू’नुसार, १९७१ मध्ये दिल्लीतील एका कॉन्व्हेंटमध्ये उमादेवींचे निधन झाले. काही वृत्तानुसार त्यांचे म्हैसूरमध्ये निधन झाले. “त्यांनी कॅथलिक धर्म, हिंदू आणि बौद्ध धर्म एकत्र केले. जरी त्यांना भारतीय (उमादेवी) आणि तिबेटी ओळख (तेन्झिन चोडॉन) मिळाली असली तरी त्या एक पोलिश देशभक्त राहिल्या आहेत,” असे जाहिरात चित्रपट निर्मात्या सुजाता सेट यांनी सांगितले.