Premium

विश्लेषण: धोनीचे श्रेष्ठत्व पुन्हा सिद्ध… पण पुढील हंगामात खेळणार का?

चेन्नईने ‘आयपीएल’च्या १६व्या हंगामाचे जेतेपद पटकावले. त्यामुळे धोनीचे वर्चस्व आणि श्रेष्ठत्व पुन्हा सिद्ध झाले आहे. पण तो पुढील हंगामात खेळणार का?

mahendra singh dhoni retirement
महेंद्रसिंह धोनी पुढील आयपीएल सीजन खेळेल? (फोटो – पीटीआय संग्रहीत)

अन्वय सावंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महेंद्रसिंह धोनी. भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि कर्णधारांपैकी एक. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करून जवळपास तीन वर्षे होत आली असली, तरी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये अजूनही धोनीचीच चलती आहे. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाने गतविजेत्या गुजरात टायटन्सला पराभूत करून ‘आयपीएल’च्या १६व्या हंगामाचे जेतेपद पटकावले. त्यामुळे धोनीचे वर्चस्व आणि श्रेष्ठत्व पुन्हा सिद्ध झाले आहे. पण तो पुढील हंगामात खेळणार का, हे निश्चित नाही.

हा धोनीचा अखेरचा हंगाम होता का?

४१ वर्षीय धोनीचा हा अखेरचा हंगाम असेल, असे म्हटले जाते होते. मात्र, या चर्चांना धोनीने तूर्तास पूर्णविराम दिला आहे. ‘निवृत्ती जाहीर करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ ठरू शकेल. तुम्हा सर्वांचे आभार आणि मी आता निवृत्त होत आहे, असे म्हणणे सोपे जाईल; परंतु पुढील नऊ महिने मेहनत घेत आणखी एका ‘आयपीएल’मध्ये खेळणे हे आव्हानात्मक आहे. मला शरीराने साथ दिली पाहिजे. मात्र, चेन्नईच्या चाहत्यांनी मला जे प्रेम दिले आहे, ते पाहता, मी आणखी एक हंगाम खेळणे गरजेचे आहे. ही माझ्याकडून त्यांच्यासाठी भेट असेल,’ असे अंतिम धोनी म्हणाला. तो २०२४च्या हंगामात खेळणार असल्याचे यामुळे सूचित होते.

चेन्नईच्या यशात धोनीचे नेतृत्वाचा वाटा किती?

धोनीला फलंदाज म्हणून यंदा मोठे योगदान देता आले नाही. यष्टिरक्षण करताना धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला धावणे अवघड जात होते. याच कारणास्तव त्याने प्रत्येक सामन्यात अखेरची दोन किंवा तीन षटकेच फलंदाजी करणे पसंत केले. त्याने १२ डावांत ५७ चेंडूंत १०४ धावा केल्या. यात तीन चौकार व १० षटकारांचा समावेश होता. मात्र, त्याच्या फलंदाजीत पूर्वीचा धोनी दिसला नाही. फलंदाज म्हणून तितकासा प्रभाव पाडता आला नसला, तरी आपले कुशल नेतृत्व आणि अचूक रणनीतीने धोनीने चेन्नई संघाला यशाचा मार्ग दाखवला. तसेच त्याने खेळाडूंना आत्मविश्वास देत त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करवून घेतली आणि यात त्याला प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगची मोलाची साथ लाभली.

विश्लेषण: मुंबईला यंदाही ‘आयपीएल’ अजिंक्यपदाची हुलकावणी, रोहितच्या अपयशाचा फटका?

धोनीने खेळाडूंना कशा प्रकारे आत्मविश्वास दिला?

गेल्या हंगामात चेन्नईला १४ पैकी केवळ चार साखळी सामने जिंकता आले होते. गुणतालिकेत चेन्नईचा संघ नवव्या स्थानी राहिला. त्या हंगामात सुरुवातीला रवींद्र जडेजाने कर्णधारपद भूषवले. मात्र, चेन्नईच्या संघाला आठपैकी केवळ दोन सामने जिंकता आले आणि कर्णधारपदाच्या दडपणाचा जडेजाच्या कामगिरीवर परिणाम झाला. त्यामुळे पुन्हा धोनीने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली आणि संघाची मोट बांधली. गेल्या हंगामात चमक दाखवणारा डावखुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काएल जेमिसन यांसारखे खेळाडू दुखापतींमुळे यंदाच्या हंगामाला मुकले. अन्य काही खेळाडू हंगामादरम्यान जायबंदी झाले. मात्र, चेन्नईची विजयी घोडदौड कायम राहिली.

चेन्नईच्या यशात अजिंक्य रहाणेचे महत्त्वाचे योगदान होते. यंदाच्या हंगामापूर्वी रहाणेचा खेळ आता ट्वेन्टी-२० क्रिकेटला साजेसा नाही, असे म्हटले जात होते. मात्र, धोनी आणि चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाने रहाणेला आत्मविश्वास दिला. ‘माझ्या यशाचे श्रेय माहीभाई (धोनी) आणि संघ व्यवस्थापनाला जाते. हंगामापूर्वी त्यांनी मला पाठिंबा दिला आणि माझी काय भूमिका असेल हे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर त्यांनी ढवळाढवळ केली नाही. त्यांनी मला हवे तसे खेळण्याची मोकळीक दिली. त्यामुळे मला यश मिळाले,’ असे अंतिम सामन्यानंतर रहाणे म्हणाला. रहाणेप्रमाणेच शिवम दुबे, तुषार देशपांडे, युवा मथीश पाथिराना यांसारख्या खेळाडूंना धोनीने पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांनी वेळोवेळी आपला खेळ उंचावत चेन्नई संघाला ‘आयपीएल’चे जेतेपद मिळवून दिले.

विश्लेषण : स्पॅनिश फुटबॉलमध्ये वर्णद्वेष का ठरतोय कळीचा मुद्दा? व्हिनिशियसप्रकरणी काय प्रतिक्रिया उमटल्या?

धोनीसाठी यंदाचे जेतेपद किती खास?

धोनी कर्णधार असेपर्यंत चेन्नईच्या संघाला जेतेपदासाठी दावेदार मानले जाणारच. परंतु यंदाच्या हंगामात गतविजेते गुजरात, मुंबई इंडियन्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु या संघांनीही चांगली कामगिरी केली. त्यामुळे जेतेपदासाठी बरीच चढाओढ होती. अंतिम सामन्यातही अखेरच्या दोन चेंडूंवर जडेजाने एक षटकार व एक चाैकार मारल्याने चेन्नईला जेतेपद मिळवता आले. यंदाच्या हंगामात चेन्नईला अधिक संघर्ष करावा लागला आणि त्यामुळेच हे जेतेपद खास ठरले. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाचे हे पाचवे जेतेपद आहे. यामुळे त्यांनी मुंबई इंडियन्सच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. धोनीने पुढील हंगामातही खेळणार असल्याचे जाहीर केल्यामुळे चेन्नईला विक्रमी सहावे जेतेपद मिळवून देऊन मगच निवृत्त होण्याचा धोनीचा मानस असू शकेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-05-2023 at 09:26 IST
Next Story
विश्लेषण: रशिया – युक्रेन नंतर इराण – अफगाणिस्तान युद्धाची चाहूल? काय आहे नेमके प्रकरण?