-डॉ. देवदत्त पोखरकर
“Trees are poems that the earth writes upon the sky”- Khalil Gibran
भारतीय वनसंपत्तीमध्ये अनेक बहुउपयोगी वृक्ष आढळतात. त्यापैकी मोह हा अत्यंत उपयुक्त, पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आहे. आदिवासी समाजाच्या जीवनाशी मोहाचे अतूट नाते आहे. म्हणूनच त्याला ‘आदिवासींचा कल्पवृक्ष’, ‘जीवनदाता वृक्ष’ तसेच इंग्रजीमध्ये Butter Tree असे संबोधले जाते. दुर्दैवाने, मोह म्हटले की, अनेकांच्या मनात सर्वप्रथम दारू तयार करण्यासाठी उपयुक्त वृक्ष हीच प्रतिमा उभी राहते. पण हा समाजाने निर्माण केलेला एक पूर्वग्रह आहे. मोहाचा वृक्ष म्हणजे केवळ मद्यनिर्मिती नव्हे, तर अन्न, औषध, रोजगार, पर्यावरण आणि आदिवासी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.
फुलांचा सडा म्हणजे जणू मोत्यांची उधळणचं
मोहाच्या Madhuca indica, Maduca longifolia अशा दोन प्रजाती भारतात आढळतात. भारतातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, गुजरात, ओडिशा, तेलंगणा, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांत तो मोठ्या प्रमाणावर आढळतो. सह्याद्री, सातपुडा आणि विंध्य पर्वतरांगांतील जंगलांमध्ये त्याचे विशेष अस्तित्व आहे. कमी पावसाच्या, कोरड्या आणि उष्ण हवामानातही हा वृक्ष सहज वाढतो. फाल्गुन आणि चैत्र महिन्यात मोहाचे झाड नव्या रूपात बहरास येते. पानगळ झाल्यानंतर संपूर्ण झाड निष्पर्ण दिसते. त्यानंतर काही दिवसांतच फांद्यांवर कळ्यांचे गुच्छ दिसू लागतात आणि त्यातून सुगंधी, मांसल, रसाळ व गोड फुले फुलू लागतात. ही फुले प्रामुख्याने रात्री उमलतात आणि पहाटे जमिनीवर गळून पडतात. झाडाखाली पडलेला फुलांचा सडा म्हणजे जणू मोत्यांची उधळणच वाटते.
मोहाच्या फुलांचा मोहक गंध
म्हणूनच प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन या फुलांचे वर्णन करताना म्हटले आहे की, “महुआ के नीचे मोती झरे…..” मोहाच्या फुलांचा गंध इतका मोहक असतो की, संपूर्ण जंगल त्या सुगंधाने भारून जाते. मधमाशा, फुलपाखरे, वटवाघुळे, पक्षी आणि विविध कीटक या फुलांकडे आकर्षित होतात. त्यामुळे परागीभवनाला चालना मिळते.
लोकगीतांमध्ये मोह जिवंत आहे
पहाटेच्या मंद प्रकाशात आदिवासी भागात आजही अनेक स्त्री-पुरुष, लहान मुले, वृद्ध हातात टोपल्या घेऊन मोहाची फुले वेचण्यासाठी जंगलात जातात. ही केवळ उपजीविकेसाठी केलेली कृती नाही; ती त्यांच्या जीवनाचा, संस्कृतीचा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा उत्सव असतो. फुले वेचताना श्रम हलके व्हावेत म्हणून ते पारंपरिक लोकगीते गातात. त्या गीतांमध्ये प्रेम आहे, श्रम आहे, निसर्ग आहे आणि जीवनाचे तत्त्वज्ञानही आहे. भारतात असा एकही आदिवासी समाज सापडणार नाही ज्यांच्या लोकगीतांत मोहाचा उल्लेख नाही. गुजराती, भीली, गोंडी, कोरकू, झारखंडी, छत्तीसगढी, भोजपुरी, लमाणी अशा अनेक भाषांतील लोकगीतांमध्ये मोह जिवंत आहे.
आदिवासींचा जिवाभावाचा सोबती
छत्तीसगढमधील एक प्रसिद्ध लोकगीतात ….”महुआ झरे रे महुआ झरे, डोंगरी के तीर लागे है…”….वसंत ऋतूतील डोंगर, फुलांचा सडा आणि निसर्गाचा आनंद व्यक्त करण्यात आला आहे. तर झारखंडमध्ये गायल्या जाणाऱ्या…..”बिनेली महुआ चंगेलिया हो सखीया सुकुमारे…” या गीतातून मोह वेचताना फुलणाऱ्या प्रेमभावनेचे चित्र दिसते.
“लाली लाली लोवडी, खोळाम चुवे मोवडी…” हे लमाणी गीत तरुण मुलींना प्रेमळ सल्ला देणारे आहे. तर भोजपुरी गीत “कोयली बन्सी बजावे बसवरीया मे, महुआ टपकेला हमरी चुनरीया मे…” हे मोह, कोकीळ आणि तरुणीच्या सौंदर्याची सुंदर सांगड घालते. मराठी भाषेत कवी श्रीकृष्ण राऊत यांच्या ओळी “डोंगऱ्या देवाचं उघडं धन, नाल्याच्या काठानं मोहाचं बन…” या लोकगीतांमधून मोह हा केवळ वृक्ष नसून आदिवासींचा जिवाभावाचा सोबती असल्याचे स्पष्ट होते.
पौष्टिक फुले
मोहाची फुले अत्यंत पौष्टिक असतात. त्यामध्ये नैसर्गिक साखर, कॅल्शियम, लोह, कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि इतर खनिजे मुबलक प्रमाणात असतात. म्हणूनच गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती आणि कष्टकरी लोकांना मोहाची फुले खायला दिली जातात. मोहापासून भाकर, शिरा, लाडू, खीर, हलवा, पुरणपोळी, गोड पेये आणि अनेक पारंपरिक पदार्थ तयार केले जातात. काही भागांत फुले तांदळाबरोबर शिजवूनही खाल्ली जातात.
अतिसेवन आरोग्यास अपायकारक
मोहाच्या फुलांचा सर्वात प्रसिद्ध उपयोग म्हणजे पारंपरिक मोहाची दारू. गळून पडलेली फुले वाळवून त्यांचे आंबवण केले जाते आणि नंतर ऊर्ध्वपातन प्रक्रियेद्वारे दारू तयार होते. अनेक आदिवासी समाजात ही दारू केवळ मद्य म्हणून नव्हे, तर सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा भाग म्हणून वापरली जाते. विवाह, सण, देवपूजा आणि काही ठिकाणी औषध म्हणूनही तिचा उपयोग केला जातो. त्यामुळे मोहाच्या दारूकडे केवळ व्यसन म्हणून पाहणे योग्य नाही. परंतु, इतर कोणत्याही मद्याप्रमाणे तिचे अतिसेवन आरोग्यास अपायकारक असल्याने संयम आवश्यक आहे.
फुलोऱ्यानंतर मोहाला रसाळ फळे येतात. पिकल्यावर ती पिवळसर होऊन खाली पडतात. फळातील बियांना काही भागांत टोळी असे म्हणतात. या बियांपासून महुआ तेल मिळते. पूर्वी हे तेल स्वयंपाकासाठी आणि दिवे लावण्यासाठी वापरले जात असे. आज त्याचा उपयोग साबण, मेणबत्त्या, सौंदर्यप्रसाधने, औषधे आणि विविध उद्योगांमध्ये होतो. तेल काढल्यानंतर उरलेली पेंड उत्तम सेंद्रिय खत म्हणून वापरली जाते.
आयुर्वेदिक महत्त्व
आयुर्वेदात मोहाचे विशेष महत्त्व आहे. फुले शरीराला ऊर्जा देतात. खोकला आणि घशातील जळजळ कमी करण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. सालीतील टॅनिन जखमा भरून येण्यास मदत करते. बियांचे तेल संधिवात, सांधेदुखी, त्वचारोग आणि डोकेदुखीवर उपयुक्त मानले जाते. खोडातून निघणारा चीकही काही पारंपरिक उपचारांमध्ये वापरला जातो.
निसर्गाचे एक वरदान
मोहाचे झाड केवळ माणसांचेच नव्हे, तर मोहाचे झाड म्हणजे जंगलातल्या पशू-पक्ष्यांसाठी निसर्गाचे एक वरदानच आहे. अस्वल मोहाची गोड फुले अत्यंत आवडीने खातात. त्यामुळे फुलोऱ्याच्या काळात पहाटे मोहाच्या झाडाखाली अस्वले दिसणे सामान्य आहे. रानडुक्कर, सांबर, चितळ, हरिण, नीलगाय, माकडे आणि कोल्हेही मोहाची फुले व फळे खातात. मधमाशा मध गोळा करतात. पोपट, मैना, बुलबुल आणि वटवाघुळे मधुरसावर जगतात. अनेक पक्षी मोहाच्या दाट फांद्यांमध्ये घरटी बांधतात. त्यामुळे जंगलातील अन्नसाखळी टिकवून ठेवण्यात मोहाचे मोठे योगदान आहे.
उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत
मोह हा आदिवासी आणि ग्रामीण समाजासाठी उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. उन्हाळ्यात फुले गोळा करून वाळवली जातात आणि बाजारात विकली जातात. बिया, तेल, पाने, फळे आणि लाकूड यांपासून अनेक लघुउद्योग चालतात. पानांपासून पत्रावळी व द्रोण तयार होतात. लाकूड शेतीची अवजारे, फर्निचर आणि इंधनासाठी वापरले जाते. त्यामुळे मोहाच्या झाडाचा प्रत्येक भाग आर्थिकदृष्ट्या उपयुक्त आहे.
मोहाला देवतेसमान मानले जाते
आदिवासी समाजात मोहाला देवतेसमान मानले जाते. जन्म, विवाह, सण-उत्सव आणि मृत्यूसंस्कार अशा विविध प्रसंगी मोहाची पूजा केली जाते. विवाहाच्या वेळी मोहाची फांदी मांडवात रोवून नवदांपत्य तिची पूजा करते. अनेक समाजांमध्ये मोहाच्या झाडाला अन्नदाता आणि पूर्वजांचे प्रतीक मानले जाते. मोह म्हणजे त्यांच्यासाठी केवळ वृक्ष नाही, तर कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आहे. म्हणूनच अनेक आदिवासी मोहाचे झाड कधीही तोडत नाहीत. आज जंगलतोड, वणवा, हवामान बदल आणि शहरीकरणामुळे अनेक भागांत मोहाची झाडे कमी होत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मोहाची लागवड करणे, नैसर्गिक जंगलांचे संरक्षण करणे आणि या वृक्षाच्या महत्त्वाबाबत जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. मोहाचे संवर्धन करणे म्हणजे केवळ एका वृक्षाचे संरक्षण नव्हे, तर भारतीय जैवविविधता, लोकसंस्कृती आणि आदिवासींच्या वारशाचे जतन करणे होय.
