Maida Disadvantages and Maida Health Risks: दिसायला पांढराशुभ्र, स्पर्शाला मऊसूत आणि चवीला खुसखुशीत असणारा मैदा आणि त्यापासून बनणारे बेकरी प्रॉडक्ट्स अनेकांच्या आवडीचे असतात. मात्र, हाच मैदा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा समतोल बिघडवणारा सर्वात मोठा घातक घटक ठरत आहे. मैद्यापासून तयार झालेल्या बेकरी प्रॉडक्ट्सची अनेकांना सवय जडली असते. त्याची वैगुण्ये तपासण्याच्या भानगडीतच कोणी पडत नाही. म्हणूनच या मैद्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं…

मैदा का नको?

डाएटसाठी सल्ला घेण्यासाठी येणाऱ्या अनेक जणांमध्ये मैद्याबाबत एक हळवा कोपरा असतो. त्याची आठवण नेहमी कोपऱ्यावरच्या अमुक तमुक बेकरी किंवा दुकान किंवा पाव विकणाऱ्या फॅक्टरीशी जोडलेली असते. त्यामुळे मैद्यापासून तयार होणारे पदार्थ बंद करायचे आहेत, या कल्पनेनेच डाएटबद्दल एक नाराजीचा सूर लागतो.

बेकरी प्रॉडक्टचा चस्का कशापायी?

आहारतज्ज्ञ म्हणून काम करताना परदेशी ब्रेड, पाव आणि भारतात तयार केले जाणारे ब्रेड किंवा पाव यांचा दर्जा त्यात वापरले जाणारे पदार्थ यांचा विचार केला की, भारतीयांच्या ‘गट हेल्थ’ वर बेकरी पदार्थांनीच नामुष्की ओढवलीये हे लक्षात आल्यावाचून राहत नाही. वर्षानुवर्षे आपण पाव, बनमस्का, लादीपाव यांना भावनिकतेचा मुलामा देत मोठं केलंय, हे सारखं जाणवत राहतं. मैद्याचं एवढं मोठं प्रमाण भारतात विशेषतः महाराष्ट्रीय आहारात कसं काय वाढलं असावं, हा विचार वारंवार मनात येत राहतो.

maida disadvantages on human health | health risks of eating maida daily | मैद्याचे दुष्परिणाम आणि आरोग्यावरील तोटे | मैदा खाण्याचे घातक परिणाम आणि आजार
मैद्याचे आरोग्यावर घातक परिणाम होतात (Image- Gemini)

अतिखाई अनारोग्याला आमंत्रण देई

मैदा बाजारात आला तेव्हा गव्हातील कीटक आणि सगळ्या प्रकारचे जंतू निघून जावेत म्हणून तो पांढराफट्टक असणं गरजेचं आहे, या भ्रामक समजुतीने ग्राहकांनी जास्तीत जास्त पांढऱ्या गव्हाच्या पीठाला अर्थात मैद्याला आपलंसं केलं. याच मैद्याच्या अतिसेवनामुळे थकवा येणं, त्वचाविकार जडणं असले विकार होतात. मैद्यात केवळ ग्लुटेनच नव्हे तर गहू ब्लिच करताना वापरले जाणारे बेंझॉइल पेरॉक्साइड आणि अझोडाय कार्बोनामाइड यासारख्या घातक रासायनिक घटकांमुळे दम्यासारखे विकारसुद्धा बळावू शकतात.

जे केमिकल गालावर, तेच पोटात?

१९०१ साली जॉन आणि सिडनी अँड्रु यांनी पहिल्यांदा बेंझॉइल पेरॉक्साइडचं पेटंट घेऊन गहू ब्लिच करण्यासाठी स्वस्त आणि सहज पर्याय म्हणून या रसायनाचा वापर सुरु केला. (त्वचेचा रंग उजळविणाऱ्या अनेक क्रीम्समध्ये हे रसायन असतं) अन्नपदार्थातून पोटात जाणाऱ्या या रसायनामुळे मात्र अनेक पोषक तत्त्वे शरीरात शोषली जात नाहीत. परिणाम काय तर, पचनसंस्था हळूहळू कमकुवत होऊ लागते.

मेंदूही ढेपाळतो ?

आपल्या शरीरातील एल. डी. एल. (कमी घनतेचं लिपो प्रोटिन) हा खरंतर कोलेस्टेरॉलचा एक प्रकार! याचं काम मेंदूला कोलेस्ट्रॉलचा योग्य पुरवठा करणं, हे असतं. मात्र मैद्याचं अतिसेवन शरीरातील ग्लुकोज आणि एलडीएल यांची अनावश्यक युती घडवून आणतं. त्यामुळे शरीरातील पेशींवर ताण येतो आणि माणसाच्या मेंदूची समजून घेण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते. म्हणजेच मेंदू ढेपाळायला सुरुवात होते.

हा तर स्वभावदोषाचा गुन्हेगार

तुम्ही हॅप्पी हॉर्मोन्स (आनंदी संप्रेरक) म्हणजेच सेरोटोनिनबद्दल वाचलं किंवा ऐकलं असेलंच. मन आनंदी ठेवण्यासाठी सेरोटोनिन हे महत्त्वाचं संप्रेरक आहे. हे संप्रेरक मुख्यत्वे आतड्याच्या आरोग्यावर अवलंबून असतं. मैद्यातील ग्लुटेन आतड्याच्या आतील स्तराचं नुकसान करतं आणि विविध ‘मूड डिसऑर्डर’ म्हणजे स्वभाव दोषांसाठी (लहरीपणा, अचानक वाईट वाटणे, मानसिक समतोल नसणे इत्यादी) कारणीभूत ठरतं.

विकारांना आमंत्रण?

आतड्याशी संबंधित सिलियाक डिसीज आणि मानसिक असंतुलन यांचं गहिरं नातं आहे. ग्लुटेनमुळे मेंदूवरचा ताण वाढू शकतो. संशोधनाद्वारे असं सिद्ध झालेलं आहे की, ग्लुटेनचं अतिसेवन आणि शरीरातील वाढीव प्रमाण बायपोलर डिसऑर्डर ,डिप्रेशन, स्कित्झोफ्रेनिया यासारख्या विकारांसाठी कारणीभूत ठरू शकतं. वय वाढत असताना मेंदूची कार्यक्षमता कमी होण्यासाठी मैद्याचे आहारातलं अती प्रमाण कारणीभूत ठरू शकतं.

नशा ही नशा है…

एवढे तर टेस्टी लागतात, मैद्यापासून तयार झालेले बेकरी प्रॉडक्ट्स. मग अनेकांना हा प्रश्न पडतो हा इतका घातक का बरं असतो मैदा? तर यात असलेल्या ग्लुटेनमार्फत एक्झोर्फिन्स तयार होत असतात, या एझोर्फिन्सचा प्रभाव हा थेट अंमली पदार्थांप्रमाणे होत असतो. या एक्झोर्फिन्समुळेच आपल्या चवीवर आणि आहारावर परिणाम होतो. आपण हळूहळू मैदा असलेल्या किंवा ग्लुटेन जास्त असणाऱ्या पदार्थांच्या आहारी जातो. अनेकदा हा परिणाम थेट होत नाही, तर रक्तातील पोषणतत्व वाहून नेणाऱ्या क्षमतेच्या कमकुवतपणामुळे होतो. हा कमकुवतपणा तयार होण्यासाठी अतिरेकी मैद्याचं सेवन कारणीभूत ठरतं.

आळस येतो तो कशापायी?

मैद्याच्या अतिसेवनामुळे आतड्याच्या आतील स्तराचं नुकसान होतं. शिवाय विविध व्हिटॅमिन्सचं शरीरातलं प्रमाणसुद्धा कमी होतं. यात जीवनसत्त्व ड , ब, क ,कॅल्शिअम यांचा समावेश आहे. यां जीवनसत्त्वांचं शरीरातलं कमी प्रमाण हळूहळू मेंदूच्या क्षमतेवर दुष्परिणाम दाखवू लागतं. यातून मानसिक ताण वाढतो. रोगप्रतिकारशक्ती कमी होते. दैनंदिन गोष्टी करण्यासाठीसुद्धा आळस वाटू शकतो.

मैद्याला पर्याय काय?

अनेकदा ५०-६० टक्के लठ्ठ व्यक्ती मैद्याच्या आहारी गेलेल्या आढळून येतात. लठ्ठपणा असणाऱ्या अनेक जणांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो. त्यांना आहारातील मैद्याचं प्रमाण कमी करून पोषक आहाराचं प्रमाण वाढल्यावर शारीरिक तंदुरुस्तीचे उत्तम परिणाम दिसून येतात. सुरुवातीला मैद्याचं प्रमाण कमी करत हळूहळू ते शून्यावर आणताना मैद्याऐवजी वेगवगेळी धान्यं , कडधान्यं आहारात समाविष्ट करणं गरजेचं ठरतं.

मैद्याचं आक्रमण कसं थोपवावं?

आहारतज्ज्ञ म्हणून काम करताना मैद्याचं भारतीय घरातलं आक्रमण थोपवणं, हे अनेकदा चॅलेंज म्हणून समोर येतं. मुळात, पिझ्झा ,पास्ता किंवा कोणतेही मैद्याचे पदार्थ खाताना आपण अतिरिक्त रसायनांचा मारा केलेलं का बरं खातोय, याचा विचार सर्वांनी करावा. मैद्याचे पदार्थ चहासोबत खाताना आपण दिवसाची सुरुवातच अत्यंत निकस पदार्थांनी करतोय, याच भान राखावं. मैद्याला रामराम ठोकताना आपण आनंदी शरीरच नव्हे, तर आनंदी मनाला देखील जोपासतोय, हे मुख्यतः लक्षात ठेवावं!