Maida Side Effects Gut Health: “म्हणजे साधारण चहासोबत काहीच खाऊ नका म्हणताय तुम्ही?” मी होकारार्थी मान डोलावली. “चहात बुडवून खायचं काय मग? इतकी वर्ष रस्क आणि बटर खाल्लेत मी आणि आता तेच बंद करायचं?” सुमित आणि त्यांची बायको हतबल होऊन माझ्याकडे पाहत होते. मैद्याच्या अतिसेवनाने पचनसंस्थेवर होणारा आघात आणि आतड्यांचे विकार आजच्या काळात अत्यंत गंभीर विषय झाले आहेत.

मैदामय आहार आणि पचनसंस्था

सुमित आणि त्याची बायको हतबल होऊन माझ्याकडे पाहत होते. सुमितचं अपचन आणि खाण्यात फक्त मैदामय आहाराने त्याच्या पचनसंस्थेवर आक्रमण केलं होतं आणि आता त्याला मैदा खायचा नाही या विचाराने अनेक प्रश्न पडले होते. अलीकडेच एका इन्फ्लुएन्सरचा “मला मैद्याची ऍलर्जी आहे, हे मला नव्याने कळलं” असं म्हणतानाचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे.

भारतीयांच्या आहारात मैदा आला कुठून?

मैदा खाऊ नका असं म्हणल्यावर साधारण सगळ्यांची गाळण उडते. पण मग इतकी वर्ष आम्ही मैदा कसा काय पचवला आणि अचानक काय बरं चुकतंय असे अनेक प्रश्नदेखील पडतात. आजच्या लेखात हेच जाणून घेण्याचाही प्रयत्न करू. मैदा भारतीयांच्या आहारात कसा काय दाखल झाला, याचा इतिहास रंजक आहे. उखळ आणि मुसळ यात पीठ तयार करणारे भारतीय गव्हापासून त्यातील तंतुमय पदार्थ वेगळे करत नसत त्यामुळे तयार होणार पीठ कायम पौष्टिक आणि पचायला हलकं असे.

Maida Side Effects Gut Health Digestion Problems Marathi | Health risks of refined flour and wheat gluten | मैद्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम आणि आजार | पचनसंस्था आणि आतड्यांच्या समस्या मैदा सेवन
मैद्याच्या अतिसेवनाने आतड्यांचे विकार आणि पचन समस्या बळावते (Image- Gemini)

आणि मैदा अस्तित्त्वात आला

या गव्हाच्या पिठाचा रंग देखील तांबूस असे. अशी वदंता आहे की, मुघल बादशाह बाबर यांनी गव्हाची चपाती/ पोळी आवडत नसल्यामुळे साधारण सोळाव्या शतकात खास पर्शियामधून (साध्याचं इराण )आणि उझबेकिस्तान मधून केले जाणारे नान भारतात आणले. म्हणजे नान पहिल्यांदा त्यांनी तयार केले, असे अजिबात नाही. १४व्या शतकात कवी अमीर खुसरौ यांच्या काही लेखनात नानची नोंद आढळून येते. आणि त्या काळात नान तयार करताना त्यातील तंतुमय पदार्थ पूर्णपणे काढून टाकले जात नसत. साधारण १९व्या शतकात रोलर मिल (दळणाच मशीन ) तयार झालं आणि मैद्याचं पांढुरेपण वाढलं. उखळ आणि मुसळ यांच्याप्रमाणे या मशीन मधून गव्हाचं सत्त्वच काढून टाकलं गेलं आणि संपूर्णपणे कुपोषित म्हणावा असा मैदा सगळीकडेच वापरला जाऊ लागला.

मानवी आतड्यांना मैद्याचा विळखा

खरंतरं गव्हाचं पीठ करताना बाहेर आलेला भाग म्हणजे मैदा. मात्र हा मैदा घरोघरी पोहोचला आणि अनेक वर्षांनी त्याचे दुष्परिणाम सातत्याने मैदा खाणाऱ्या माणसांमध्ये दिसू लागले… पाण्यात मिसळल्यास बेमालूमपणे मिसळून चव आणि मऊसूत पीठ तयार करणे ही ग्लूटेनची खासियत! दीर्घकाळ टिकणारे आणि मऊ राहणारे धान्य म्हणून मैदा प्रसिद्ध झाला. हळूहळू हेच ग्लूटेन वाढले आणि मानवी आतड्यांनाच त्याने विळखा घातला.

आतड्यांचे विकार भारत आणि चीनमध्ये सर्वाधिक

अनेक जणांमध्ये शारीरिक आणि मानसिक आजारांसाठी मैदा कारणीभूत ठरू लागला. प्रत्येक एक ग्राम ग्लूटेन ६-७% आतड्याचे आतले कवच कमकुवत करण्याची शक्यता वाढवते. आणि याचा त्रास भारतीयांना होतो आहे. या आजारावर झालेल्या संशोधनानुसार जगभरात सिलियाक (आतड्याच्या आतील भाग कमकुवत होणे) विकार शंभरातील एका माणसाला होतो आणि साधारण २ अब्ज लोकांना या आजाराची जाणीवच नसते. २०१९ मध्ये केल्या गेलेल्या संशोधनानुसार आतड्याच्या विकारात भारत आणि चीन हे दोन्ही देश आघाडीवर आहेत.

ब्लिचिंग एजंट्स पचनशक्तीसाठी मारक

मैदा तयार करताना वापरले जाणारे ब्लिचिंग एजंट्स प्रामुख्याने पचनशक्तीसाठी मारक ठरतात. अमेरिकेत २०च्या शतकात जेव्हा मैदा तयार करण्यासाठी नायट्रोजन ट्रायक्लोराइड म्हणजे अजीन नावाचं पदार्थ वापरला जात असे तेव्हा, १९४८ साली एका पोषणतज्ज्ञाने असं शोधून काढलं की, या ब्लिचिंग एजंटमुळे तिच्या कुत्र्याला फिट्स येऊ लागल्या. त्या फिटस् मानवांमध्ये होणाऱ्या अपस्माराच्या फिटस् सारख्या होत्या.

वाढलेला ग्लायसेमिक इंडेक्स आणि मधुमेह

बेकिंग व्यवसायात यानंतर क्लोरीन डायॉक्साईड नावाचं ब्लिचिंग एजंट वापरलं जाऊ लागलं. यातून तयार होणाऱ्या अलोक्झेन (alloxan ) या द्रव्यामुळे आतड्यातील बीटा पेशींचं नुकसान होऊ लागलं; तसेच वाढत्या ग्लायसेमिक इंडेक्समुळे मानवी शरीरातील इन्सुलिनच्या कार्यावर विपरीत परिणाम होऊ लागले. परिणामी मधुमेहींचं प्रमाण वाढू लागलं. सध्या भारत मधुमेहींच्या सर्वाधिक प्रमाण असणारा देश आहे.

मायग्रेनला मैदाही कारणीभूत

मैद्यात असलेल्या अलेक्झानीस मुळे हृदयविकाराचे प्रमाणदेखील वाढते. मैद्यातील ग्लूटेन आतड्यात एखाद्या चिकट द्रव्याप्रमाणे काम करते, त्यामुळे पचनसंस्थेवर आघात होतो. पोषकततत्त्वांचे पचन बिघडते आणि हळूहळू माणसाला वेगेवेगळे विकार सुरू होतात. आणि केवळ पचनाशी निगडित असणारा आजार हळूहळू पेशींवर मारा करतो आणि अनेकविध शारीरिक पीडा सुरु होतात. अवाजवी वजन, कमी न होणारे अतिरिक्त वजन, डोकेदुखी, मानसिक ताण, मायग्रेन यासारखे विकार मूळ धरून वाढू लागतात.

मैदा मानसिक आजारांचेही कारण

मैदा हा अम्लांश जास्त असणारा पदार्थ आहे. मैद्याचे नियमित सेवन शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण हळूहळू कमी करते आणि याचा थेट परिणाम हाडांच्या घनतेवर देखील होऊ लागतो. मैद्यामुळे शरीरावर होणारा ग्लूटेनचा मारा केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आजारांसाठीदेखील कारणीभूत ठरतो. त्याबद्दल पुढच्या लेखात जाणून घेऊ.