पावसाळा सुरू झाला की वातावरण आल्हाददायी वाटू लागते, पण त्याचबरोबर पावसाळ्यात डासांमुळे पसरणारे आजार देखील डोके वर काढतात. पावसामुळे डासांच्या प्रजननासाठी उपयुक्त ठरणारी स्थिती निर्माण होते. मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया या तिन्ही आजारांची सुरुवातीची लक्षणे जवळपास सारखीच असल्याने अनेकदा गोंधळ उडतो. डोकेदुखी, थंडी वाजणे किंवा अचानक आलेला ताप ही लक्षणे या आजारांत आढळतात पण अनेकांना नेमका कोणता आजार झाला आहे, याचा अंदाजच येत नाही. मात्र हे तिन्ही आजार वेगवेगळ्या डासांमुळे होतात, त्यांची कारणे आणि उपचारही वेगळे असतात. त्यामुळे या आजारांमधील फरक ओळखणे आणि योग्य वेळी उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
हे आजार नेमके कशामुळे होतात?
मलेरिया
मलेरिया हा प्लास्मोडियम (Plasmodium) नावाच्या परजीवीमुळे होतो. हा परजीवी संक्रमित मादी ॲनोफिलीस (Anopheles) या डासाच्या चाव्यामुळे शरीरात प्रवेश करतो. हा आजार डेंग्यू आणि चिकनगुनियापेक्षा वेगळा आहे, म्हणजेच तो विषाणूजन्य नसून परजीवीमुळे होणारा आजार आहे. वेळेत उपचार न मिळाल्यास तो गंभीर ठरू शकतो.
डेंग्यू
डेंग्यू हा डेंग्यू विषाणूमुळे (Virus) होणारा आजार आहे. संक्रमित एडीस (Aedes) डास चावल्यानंतर हा आजार होतो. हे डास प्रामुख्याने दिवसाच चावतात. डेंग्युने बाधित झालेले बहुतांश रुग्ण बरे होतात, मात्र काहींमध्ये गंभीर स्थिती निर्माण होऊन तातडीच्या उपचारांची गरज भासू शकते.
चिकनगुनिया
चिकनगुनियाही एडीस (Aedes) डासांमार्फत पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. या आजारात तापासोबत तीव्र सांधेदुखी हे गंभीर लक्षण असते. अनेकदा ताप उतरला तरी सांधेदुखी आठवडे किंवा काही महिन्यांपर्यंत कायम राहू शकते.
मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या लक्षणांमध्ये काय फरक आहे?
तिन्ही आजारांमध्ये ताप हे समान लक्षण असले तरी प्रत्येक आजाराची काही ठळक लक्षणे वेगळी असतात. त्यामुळे सुरुवातीची लक्षणे ओळखणे महत्त्वाचे ठरते.
मलेरियाची लक्षणे
- ताप ठराविक अंतराने पुन्हा-पुन्हा येणे हे मलेरियाचे सर्वात ठळक लक्षण मानले जाते
- ताप येण्यापूर्वी थंडी वाजणे, त्यानंतर उच्च ताप आणि मग प्रचंड घाम येणे, अशीही सहलक्षणे दिसू शकतात
- तीव्र डोकेदुखी
- अंगदुखी आणि स्नायू दुखणे
- मळमळ किंवा उलट्या
- अशक्तपणा आणि सतत थकवा जाणवणे
डेंग्यूची लक्षणे
- अचानक तीव्र ताप येणे
- तीव्र डोकेदुखी
- डोळ्यांच्या मागे वेदना होणे
- स्नायू आणि सांध्यांमध्ये तीव्र वेदना (यालाच ब्रेकबोन फीव्हर असेही म्हटले जाते)
- मळमळ किंवा उलट्या
- शरीरावर लालसर पुरळ (रॅश) येणे
- काही गंभीर रुग्णांमध्ये हिरड्यांतून किंवा नाकातून रक्तस्राव होणे, प्लेटलेट्स (रक्तपट्टिका) कमी होणे अशी लक्षणेही दिसू शकतात
डेंग्यूची धोकादायक लक्षणे कोणती?
डेंग्यूची काही प्रकरणे गंभीर स्वरूप धारण करू शकतात.
- पोटात तीव्र आणि सतत दुखणे
- वारंवार उलट्या होणे
- हिरड्या किंवा नाकातून रक्तस्राव होणे
- उलटी किंवा शौचातून रक्त येणे
- श्वास घेण्यास त्रास होणे
- खूप अशक्तपणा, चक्कर आल्यासारखे वाटणे
- चिकनगुनियाची लक्षणे
- अचानक तीव्र ताप येणे
- हात, मनगट, घोटे आणि पायांच्या सांध्यांमध्ये तीव्र वेदना होणे हे या आजाराचे सर्वात ठळक लक्षण आहे
- स्नायू दुखणे
- डोकेदुखी
- शरीरावर लालसर पुरळ येणे
- सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे
चिकनगुनियामध्ये ताप काही दिवसांत कमी होतो. मात्र, सांधेदुखी अनेक आठवडे कायम राहू शकते, त्यामुळे दैनंदिन कामे करणेही कठीण होऊ शकते.
मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियामध्ये नेमका फरक काय?
तिन्ही आजार डासांमुळे पसरत असले तरी त्यांची कारणे, लक्षणे आणि परिणाम वेगवेगळे असतात.
- मलेरिया हा परजीवीमुळे (Plasmodium) होणारा आजार आहे, तर डेंग्यू आणि चिकनगुनिया हे दोन्ही विषाणूजन्य (Viral) आजार आहेत
- मलेरिया हा ॲनोफिलीस (Anopheles) डास चावल्यामुळे होतो. तर डेंग्यू आणि चिकनगुनिया हे दोन्ही एडीस (Aedes) डासांमुळे पसरतात. एडीस डास हे प्रामुख्याने दिवसा चावतात
- चिकनगुनियामध्ये सांधेदुखी हे सर्वात ठळक लक्षण मानले जाते. ताप कमी झाल्यानंतरही हात, पाय, मनगट आणि घोट्यांमधील वेदना अनेक आठवड्यांपर्यंत राहू शकतात
- डेंग्यूमध्ये डोळ्यांच्या मागे तीव्र वेदना, शरीरावर पुरळ आणि रक्तस्राव होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे हा आजार गंभीर ठरू शकतो
- मलेरियामध्ये वारंवार ताप येणे, तापापूर्वी थंडी वाजणे आणि नंतर प्रचंड घाम येणे ही लक्षणे इतर दोन आजारांपेक्षा अधिक आढळतात
या आजारांपासून बचाव कसा कराल?
डासांमुळे हे तिन्ही आजार होतात. त्यामुळे डासांपासून स्वतःचे संरक्षण करणे आणि त्यांच्या प्रजननाला आळा घालणे हा सर्वोत्तम उपाय आहे.
- डासांपासून संरक्षण करणारे डासप्रतिबंधक औषध (Mosquito Repellent) चा वापर करावा
- शक्यतो पूर्ण बाह्यांचे कपडे आणि पूर्ण लांबीची पँटच अंगावर घालावी
- झोपताना मच्छरदाणीचा वापर करा
- घराच्या खिडक्या आणि दरवाजांना जाळी लावावी किंवा शक्य असल्यास वातानुकूलित (AC) खोलीचा वापर करावा
- कूलर, फुलांची कुंडी, बादल्या, टायर आणि इतर भांड्यांमध्ये पाणी साचू देऊ नये, कारण अशा ठिकाणी डासांची पैदास होते
- घरातील पाण्याच्या टाक्या आणि पाणी साठवण्याची भांडी नेहमी झाकून ठेवावीत
- आपल्या परिसरात डासांची पैदास होऊ नये यासाठी स्वच्छता राखणे आणि साचलेले पाणी तातडीने हटवणे ही दक्षता पाळल्याने आजाराचा धोका टळू शकतो.
डॉक्टरांकडे उपचारासाठी कधी जावे?
खालीलपैकी कोणतेही लक्षण दिसल्यास घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता त्वरित उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात
- दोन दिवसांपेक्षा जास्त काळ तीव्र ताप कायम राहणे
- शरीरात किंवा सांध्यांमध्ये तीव्र वेदना होणे
- सतत उलट्या होणे
- श्वास घेण्यास त्रास होणे
- नाक किंवा हिरड्यांतून रक्तस्राव होणे
- गोंधळ उडणे, जास्त झोप येणे किंवा झटके (फिट्स) येणे
आजार निश्चित करण्यासाठी डॉक्टर रक्त तपासणी करण्याचा सल्ला देऊ शकतात. कारण या तिन्ही आजारांचे उपचार वेगवेगळे असल्याने योग्य निदान आणि वेळेवर उपचार घेणेच पुढील गुंतागुंत टाळण्याचा योग्य मार्ग आहे.
