Maldives Scuba Diving Accident Oxygen Toxicity in Scuba Diving Causes : मालदीवमधील एका स्कूबा डायव्हिंग मोहिमेदरम्यान पाच इटालियन पर्यटकांना आपले प्राण गमावावे लागले. समुद्रसपाटीपासून सुमारे १६० फूट खोल पाण्याखाली घडलेल्या या दुर्घटनेमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. या पाचही पर्यटकांचा मृत्यूंमागे ‘ऑक्सिजन विषबाधा’ हेच प्रमुख कारण असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याविषयी…

इटालियन पर्यटकांचा मृत्यू कशामुळे

१४ मे २०२६ रोजी मालदीवच्या अलिमाथा बेटाजवळील पाण्याखालील गुहांचा शोध घेण्यासाठी पाच इटालियन पर्यटकांनी अंदाजे १६० फूट खोल समुद्रात डायव्हिंग केले. मात्र, ठरलेल्या वेळेत ते पुन्हा पाण्याच्या पृष्ठभागावर परतलेच नाहीत. शोध मोहिमेदरम्यान एका पर्यटकाचा मृतदेह गुहेच्या आत सापडला असून, इतर पर्यटक सुमारे ६० मीटरपर्यंत पसरलेल्या त्याच गुहांच्या जाळ्यात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेतील मृतांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामध्ये इटलीतील प्रसिद्ध महिला सागरी जीवशास्त्रज्ञ मोनिका मोंटेफाल्कोन आणि त्यांच्या २० वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. त्याशिवाय रिसर्च फेलो मुरिएल ओडेनिओ, सागरी जीवशास्त्राचे पदवीधर फेडरिको ग्वाल्टिएरी आणि बोट ऑपरेशन्स मॅनेजर व डायव्हिंग इन्स्ट्रक्टर जियानलूका बेनेडेटी यांनाही आपले प्राण गमावावे लागले आहे. या दुर्घटनेमुळे खोल समुद्रात डायव्हिंग करताना उद्भवणाऱ्या अत्यंत घातक अशा ऑक्सिजन विषबाधेच्या धोक्याकडे पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधले गेले आहे.

‘ऑक्सिजन विषबाधा’ म्हणजे काय?

तज्ज्ञांच्या मते, जीवनासाठी अत्यावश्यक असलेला ऑक्सिजन काही विशिष्ट परिस्थितींमध्ये विषारी ठरू शकतो. सामान्यतः हवेमध्ये सुमारे २१ टक्के ऑक्सिजन असतो. मात्र, समुद्राच्या खोल पाण्यात ही परिस्थिती पूर्णपणे बदलते. डायव्हर्स (समुद्रात सूर मारणारे) जितके खोल जातात, तितका पाण्याचा दाब वाढतो. त्यामुळे ते श्वासाद्वारे घेत असलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण शरीरात कमालीची वाढते. हा अतिप्रमाणातील ऑक्सिजन पचवणे मानवी शरीराच्या क्षमतेबाहेर जाते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, पाण्याच्या दाबाखाली जास्त प्रमाणात ऑक्सिजनचा संपर्क आल्यास शरीरात हानिकारक ‘फ्री रॅडिकल्स’ तयार होतात. हे घटक शरीरातील ऊती आणि अवयवांना गंभीर नुकसान करू शकतात. त्यामुळे खोल समुद्रात जाणाऱ्या व्यक्तींना ऑक्सिजन विषबाधा होऊ शकते. या विषबाधेचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात. त्यातील ‘पल्मोनरी ऑक्सिजन विषबाधा’ ही दीर्घकाळ जास्त ऑक्सिजनच्या संपर्कामुळे डायव्हर्सच्या फुफ्फुसांवर परिणाम करते. त्यामुळे सूज येणे, छातीत वेदना, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसू शकतात. दुसरा आणि सर्वात धोकादायक प्रकार हा सेंट्रल नर्व्हस सिस्टिम ऑक्सिजन विषबाधेचा आहे. कारण, त्याचे परिणाम अचानक दिसून येतात. यामध्ये डोळ्यांसमोर अंधारी येणे, कानात आवाज येणे, चक्कर येणे, मळमळणे, स्नायू आकुंचन पावणे, संभ्रमावस्था निर्माण होणे आणि सर्वात धोकादायक म्हणजे झटके येणे या लक्षणांचा समावेश होतो.

समुद्रतळाशी झटके येणे घातक का ठरते?

पाण्याखाली असताना अचानक झटके आल्यास, ती परिस्थिती काही मिनिटांतच जीवघेणी ठरू शकते. कारण, त्यामुळे डायव्हर्सचा श्वसन उपकरणावरचा ताबा सुटू शकतो किंवा शुद्ध हरपल्यामुळे दिशाभूल होऊन त्यांचा बुडून मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. साधारणत: स्कूबा डायव्हिंग करणाऱ्या अनेकांच्या पाठीवर ऑक्सिजनचा सिलिंडर असतो आणि त्यातील ऑक्सिजन हा पृथ्वीवरील सर्वसामान्य हवेसारखाच असतो. मात्र, समुद्राच्या खोलवर गेल्यानंतर ही सामान्य हवादेखील अधिक धोकादायक ठरू शकते. अनेक अनुभवी डायव्हर्स अधिक वेळ पाण्याखाली राहण्यासाठी जास्त ऑक्सिजन असलेल्या मिश्रणाचे सिलिंडर वापरतात. समुद्राच्या खोलीवर हा वायू फायदेशीर ठरत असला, तरी गणित थोडेही चुकल्यास हेच मिश्रण अत्यंत विषारी ठरते. समुद्रतळाशी असलेल्या ठिकाणांचा शोध घेताना हे धोके आणखीनच वाढतात. तिथे असणारी कमी दृश्यमानता, चिखल आणि वाळूमुळे डायव्हर्सची स्थिती बिकट होते. अशा वेळी भीतीपोटी किंवा पॅनिक झाल्यामुळे श्वासाचा वेग वाढतो, ज्यामुळे शरीरात अधिक प्रमाणात ऑक्सिजन घेतला जातो. मालदीवमधील घटनेमागे ‘ऑक्सिजन विषबाधा’ आणि ‘तीव्र भीती’ हे दोन्ही घटक कारणीभूत असावेत, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

दुर्घटनेला कोणते घटक ठरले कारणीभूत?

मालदीवमधील इटालियन पर्यटकांच्या मृत्यूमागे हवामानाची परिस्थितीही महत्त्वाची ठरली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही अहवालांनुसार, या मोहिमेच्या वेळी समुद्रात सोसाट्याचा वारा आणि तीव्र लाटा उसळत होत्या. पाण्याच्या खालील गुहांमध्ये आधीच अंधार असतो, त्यातच डायव्हर्सच्या हालचालींमुळे तळातील गाळ किंवा वाळू उडाल्यास दृश्यमानता पूर्णपणे नाहीशी होते. अशा स्थितीत अनुभवी डायव्हर्सचाही गोंधळ उडू शकतो. डायव्हिंग क्षेत्रातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, शरीराचा थकवा, मानसिक ताण, पाण्याचे अतिथंड तापमान आणि शरीरातील कार्बन डायऑक्साइडची वाढलेली पातळी या घटकांमुळे खोल पाण्यात ऑक्सिजन विषबाधेचा धोका कित्येक पटीने वाढतो. अशा दुर्घटना टाळण्यासाठी अत्यंत काटेकोर नियोजनावर भर देणे गरजेचे आहे. डायव्हिंगची खोली लक्षात घेऊन वायू मिश्रण निश्चित करणे आणि ऑक्सिजनच्या संपर्काचा कालावधी मर्यादित ठेवणे अत्यंत आवश्यक असते. तांत्रिक आणि गुहा डायव्हिंगसाठी विशेष प्रशिक्षण, अतिरिक्त सुरक्षात्मक उपकरणे आणि सततच्या देखरेखीची गरज असते.

दुर्घटनेनंतर कडक नियमांची मागणी

मालदीवमधील दुर्घटनेतील इटालियन पर्यटकांचा गट ‘ड्युक ऑफ यॉर्क’ या अत्याधुनिक जहाजावर होता आणि त्यात सागरी क्षेत्रातील उच्चशिक्षित व अनुभवी तज्ज्ञांचा समावेश होता. परंतु, तज्ज्ञांच्या मते, कितीही अनुभवी व्यक्ती असली तरी उपकरणांमधील अचानक झालेला बिघाड, पाण्याचा अनपेक्षित प्रवाह किंवा गॅस व्यवस्थापनातील त्रुटी अशा अदृश्य आव्हानांमुळे दुर्घटना घडू शकते. या भीषण दुर्घटनेमुळे लोकप्रिय पर्यटन स्थळांवर होणाऱ्या खोल समुद्रातील आणि गुहांमधील डायव्हिंगवर अधिक कडक नियंत्रण व देखरेख ठेवण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. मालदीव हे जागतिक दर्जाच्या डायव्हिंगसाठी प्रसिद्ध असले, तरी तेथील दुर्गम बेट समूह आणि बदलणारे हवामान लक्षात घेता पर्यटकांना सुरक्षेची अभूतपूर्व पूर्वतयारी करावी लागते, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. या दुर्घटनेमागचे नेमके काय कारण होते, याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे.