Heart attack prevention आज कमी वयातील व्यक्तींनाही हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यापैकी अनेक घटनांसाठी शरीरातील अनियंत्रित कोलेस्ट्रॉलची पातळी कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे सांगणे आहे. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचेही तज्ज्ञ सांगतात. त्यासाठी दररोज गोळ्या घेणे, सतत आहाराचा मागोवा घेणे किंवा डोस चुकणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे असते.

आता ‘द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका चाचणीनुसार CRISPR नावाच्या जीन-एडिटिंग तंत्रज्ञानाचा वापर माणसांवर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे केवळ एकाच उपचाराने खराब कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसेराइड्सची पातळी लक्षणीयरीत्या कमी झाली आहे, असे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. याचा अर्थ काय? ही उपचार पद्धती नक्की काय आहे? औषधांशिवाय हार्ट अटॅकचा धोका टळणार का? जाणून घेऊयात…

नव्या संशोधनातून काय समोर आले?

द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या नुकत्याच एका चाचणीनुसार, CRISPR नावाच्या जीन-एडिटिंग तंत्रज्ञानाचा वापर मनुष्यांमध्ये करण्यात आला आहे. या उपचार पद्धतीमुळे खराब कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसेराइड्सची पातळी लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष ८ नोव्हेंबर २०२५ रोजी ( शनिवार) अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या वार्षिक बैठकीत सादर करण्यात आले. विज्ञान काय सांगते आणि तुम्ही तुमच्या हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यावर कसे नियंत्रण ठेवू शकता, त्याविषयी या अहवालात सांगण्यात आले आहे.

या चाचणीमध्ये प्रौढांचा एक छोटा गट समाविष्ट होता, ज्यांचे कोलेस्ट्रॉल उपचारांनंतरही उच्च होते. संशोधकांनी CRISPR वापरून ANGPTL3 नावाच्या यकृतातील एका जनुकाला लक्ष्य केले. या अभ्यासामध्ये काही आठवड्यांतच खराब कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसेराइड्सची पातळी सुमारे ५० टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळून आले.

याचा निष्कर्ष असा आहे की, एकदा केलेल्या जीन संपादनामुळे (जीन-एडिटिंग) काही लोकांची दररोज औषध घेण्याची गरज टाळण्यास मदत होऊ शकते. आजाराचे व्यवस्थापन करण्याऐवजी, मुळापासून त्याला नष्ट करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. परंतु, ही चाचणी प्राथमिक टप्प्यात असल्याने, सुरक्षिततेचे निरीक्षण करणे आवश्यक आहे आणि हे तंत्रज्ञान अद्याप सार्वजनिकरीत्या उपलब्ध नाही.

दैनंदिन जीवनासाठी याचे महत्त्व काय?

कोलेस्ट्रॉल हे मेणासारखे असते, जे शिरांमध्ये साचत जाते. कोलेस्ट्रॉलचे एकूण दोन प्रकार असतात, एक म्हणजे लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन (एलडीएल) किंवा वाईट कोलेस्ट्रॉल आणि हाय-डेन्सिटी लिपोप्रोटीन (एचडीएल) किंवा चांगले कोलेस्ट्रॉल. रक्तात एलडीएलची पातळी जास्त असल्यास धमन्यांमध्ये (Arteries) ‘प्लेक’ जमा होण्याचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. जीन एडिटिंग ही उपचार पद्धती अद्याप सर्वांसाठी उपलब्ध नसली तरी या संशोधनातून तुमच्या जीवनशैलीसाठी तीन मोठे संदेश मिळतात. तंत्रज्ञान प्रगती करत आहे, परंतु निरोगी जीवनशैली अजूनही आधारस्तंभ मानली जाते. त्यात दैनंदिन पोषण, शारीरिक हालचाल आणि ताणाचे व्यवस्थापन आवश्यक आहे.

हृदयाचे आरोग्य वाढवणारे दैनंदिन उपाय

  • सूर्यप्रकाश आणि दररोज चालण्याचे महत्त्व : बाहेर फिरायला जाण्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारते. सूर्यप्रकाश आणि बाहेर फिरायला जाणे दोन्ही हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. नॅशनल हार्ट, लंग अँड ब्लड इन्स्टिट्यूटनुसार, “दररोज चालणे हृदयविकार, स्ट्रोक, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि टाइप २ मधुमेहाचा धोका कमी करून हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारते.”
  • आतड्याच्या आरोग्यावर (गट हेल्थ) लक्ष केंद्रित करणे : उदयोन्मुख विज्ञान ओळखते की आतड्यांचे आरोग्य लिपिड मेटाबोलीझमवर परिणाम करते. त्यासाठी फायबर-समृद्ध संपूर्ण अन्न, शेंगा, भाज्या आणि आंबवलेल्या पदार्थांचे सेवन योग्य असते. आतडे केवळ पचनासाठी नाहीत, ते तुमच्या शरीरात चरबी कशी हाताळली जाते याच्याशी जोडलेले आहेत; ज्याचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो. .
  • ताण आणि झोप : दीर्घकाळचा ताण आणि झोप नीट न झाल्यास शरीरात सूज येते (इन्फ्लेमेशन), ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. यासाठी आनंदी राहणे, झोपण्यापूर्वी स्क्रीनचा वापर टाळणे आणि नियमित झोप घेणे फायदेशीर ठरते. खराब झोप आणि ताण यामुळे इन्फ्लेमेशन वाढते; ज्यामुळे रक्तदाब वाढतो आणि लिपिड प्रोफाइल खराब होतात. हे सर्व हृदयासाठी हानिकारक आहे. त्यांचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे..

औषध, जीवनशैली आणि नवीन उपचार पद्धती

हृदयरोगतज्ज्ञांनी नमूद केल्याप्रमाणे सामान्य रोगांसाठी जीन एडिटिंग ही ‘प्रगतिशील क्रांती’ आहे, परंतु क्रांती एका रात्रीत होत नाही. याचा अर्थ, जीन एडिटिंग ही उपचार पद्धती सर्वांना वापरता यावी यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. भविष्यातील उपचार हृदयविकाराविरुद्धचा लढा सोपा करू शकतात, परंतु तुमच्या दैनंदिन सवयी तुमच्या हातात आहेत. साध्या जीवनशैलीतील बदलांचा तुमच्या हृदय आरोग्यावर मोठा परिणाम होतो. प्रत्येक भाजी, प्रत्येक हालचाल, प्रत्येक तासाची चांगली झोप प्रतिकारशक्ती निर्माण करते.