Mango Juice GST Reform & Totapuri Pulp Tax Benefit: एरेटेड ड्रिंक नको म्हणून आपण अगदी आवडीने थंडगार ‘मँगो ज्यूस’ पितो, हो ना? पण जरा थांबा! समजून घ्या, तुम्ही पीत असलेल्या या ज्यूसमध्ये खरोखरच आंब्याचा रस वापरला जातो की केवळ कृत्रिम प्रक्रियेने तयार केलेलं गोड पाणी? कारण- आता मँगो ज्यूसमध्ये आंब्याच्या रसाची सत्यता किती यावरून या ड्रिंकची किंमत आणि त्यावर लागणारा GST ठरणार आहे.
केंद्र सरकार एक नवीन योजना घेऊन आलं आहे. जर मँगो ज्यूसमध्ये खरा आंब्याचा रस असेल, तर त्यावर कमी कर (फक्त ५% GST) लागेल. पण, जर नावापुरतं ‘मँगो’ आणि आत केवळ केमिकल किंवा फ्लेवर असेल, तर कंपन्यांना जास्त कर भरावा लागण्याची शक्यता आहे.
या निर्णयामुळे फायदा काय?
- ग्राहकांना रासायनिक द्रव्याऐवजी खऱ्या आंब्याचा चविष्ट रस प्यायला मिळेल.
- दक्षिण भारतातील अडचणीत सापडलेल्या ‘तोतापुरी’ आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंब्याला मोठी मागणी आणि चांगला भाव मिळेल.
नक्की काय आहे ५% GST चा नवीन नियम?
केंद्र सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने केलेल्या सोप्या मागण्या खालीलप्रमाणे:
- ज्या मँगो ज्यूसमध्ये २२% ते २५% अस्सल नैसर्गिक तोतापुरी आंब्याचा रस असेल, त्यांनाच ५% या सवलतीच्या कराचा फायदा मिळेल.
- ज्या ज्यूसमध्ये आंब्याचा रस या ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी असेल, त्यांच्यावर अधिक GST आकारला जाईल.
हा अहवाल ICAR-CISH (लखनऊ)चे संचालक डॉ. टी. दामोदरन यांच्या समितीने तयार केला असून, तो केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना सोपविण्यात आला आहे. आता कृषी, वित्त, अन्न प्रक्रिया, आरोग्य मंत्रालय, FSSAI आणि GST परिषद एकत्र येऊन, यावर अंतिम निर्णय घेणार आहेत.
तोतापुरी आंब्याचे भाव अचानक का घसरले?
आंध्र प्रदेश, तमिळनाडू व कर्नाटक या राज्यांमध्ये यंदा तोतापुरी आंब्याचे भाव खूप खाली आले होते. तिरुपती व चित्तूर या भागांत जाऊन पाहणी केल्यानंतर समितीला या घसरणीमागे आढळलेली तीन मुख्य कारणं खालीलप्रमाणे:
- अनियमित खरेदी : बाजारात एकाच वेळी खूप आंबा येतो; पण रस बनविणारे कारखाने वेळेवर खरेदी करीत नाहीत. त्यामुळे आंब्याचे भाव घसरतात.
- ज्युसमध्ये अस्सल आंब्याच्या रसाचं प्रमाण कमी : बाजारात मिळणाऱ्या ज्युसमध्ये खऱ्या आंब्याचा रस खूप कमी प्रमाणात वापरला जातो.
- जागतिक बाजारातील बदल: आंतरराष्ट्रीय बाजारात आंब्याच्या रसाच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत असतात.
शेतकऱ्यांचा फायदा होण्याच्या दृष्टीने सुचवलेले ५ महत्त्वपूर्ण उपाय
तोतापुरी उत्पादक शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी समितीने सुचविलेले ५ उपाय खालीलप्रमाणे:
- आधीच ठरणार आंब्याचा भाव:
आंध्र प्रदेश, तमिळनाडू व कर्नाटकसाठी एक विशेष समिती स्थापन केली जाईल. ही समिती आंबा हंगाम सुरू होण्याआधीच पिकाचा अंदाज घेऊन आंब्याचा एक योग्य भाव ठरवेल. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होणार नाही. - जुन्या झाडांवर नवीन महागड्या आंब्यांची कलमे (Top-Working):
आंध्र प्रदेशातील चित्तूर, तिरुपती, अन्नामय्या व कडापा या चार जिल्ह्यांमध्ये तोतापुरी आंब्याची झाडे जुनी झाल्यामुळे त्यांचे उत्पन्न घटले आहे. आता या जुन्या झाडांवर हापूस, नीलम, हिमायत व बंगनपल्ली या जास्त भाव मिळणाऱ्या आंब्यांची कलमे जोडली जातील.
त्यामुळे अवघ्या दोन ते तीन वर्षांत शेतकऱ्यांना भरपूर उत्पन्न देणारे आंबे मिळू लागतील. - फळांना खास संरक्षण (Fruit Covering):
या चार जिल्ह्यांतील २३,३३३ हेक्टर क्षेत्रावरील आंब्यांना कीड लागण्यापासून वाचवण्यासाठी खास ‘कव्हर’ घातलं जाईल. त्यामुळे आंब्याचा रंग व दर्जा उत्तम राहील आणि बाजारात चांगला भाव मिळेल. - आंब्याच्या कोयीपासून नवीन पदार्थ:
आंब्याचा रस काढून झाल्यावर उरणाऱ्या कोयींपासून (Seed) ‘मँगो बटर’ आणि इतर उत्पादनं तयार केली जातील. त्यासाठी शेतकरी कंपन्यांना (FPO) नवीन तंत्रज्ञान आणि प्रोत्साहन दिले जाईल. - जहाजाने होणार निर्यात:
‘अपेडा’ (APEDA) आणि कृषी संशोधन संस्था मिळून तोतापुरी आंब्याची परदेशात निर्यात वाढवणार आहेत. विमानाऐवजी समुद्री मार्गाने माल पाठविला जाईल, ज्यामुळे वाहतूक खर्च कमी होईल आणि भारतीय आंबा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल.
असं जर झालं, तर तुम्ही ज्याचा लज्जतीने आस्वाद घेणार आहात, तो मँगो ज्युस आता फक्त तुमची तहान भागवणार नाही, तर तो आपल्या शेतकरी भावांच्या आयुष्यातही गोडवा आणणारा ठरेल.
