Why ‘94’ Is Written on the Ashes at Kashi’s Manikarnika Ghat: हिंदू धर्मात महास्मशान म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाराणसीच्या मणिकर्णिका घाटाच्या पुनर्विकास आणि सुशोभिकरणाच्या प्रकल्पावरून नवीन वर्षाच्या सुरुवातीसच वादाचे मोहोळ उठले. या प्रकल्पाच्या माध्यमातून आधुनिकीकरणाच्या नावाखाली प्राचीन धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा नष्ट केला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि विरोधी पक्षाने केला आहे. तसेच त्याविरोधात निदर्शनेही करण्यात आली. राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा १०० वर्षे जुना पुतळा आणि काही मंदिरे पाडल्याचे काही व्हिडिओज व्हायरल झाल्यानंतर या वादाला वाचा फुटली.

समाजमाध्यमांवर बनावट व्हिडिओ?

परंतु, या संदर्भातील समाजमाध्यमांवर फिरणारे अनेक फोटो आणि व्हिडिओ AI (Artificial Intelligence) द्वारे तयार केलेले किंवा बनावट असल्याचा दावा उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांनी केला आहे. कोणत्याही प्राचीन मंदिराचे किंवा मूर्तीचे नुकसान झालेले नाही. अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा आणि इतर पुरातन वास्तू सांस्कृतिक विभागाकडे आहेत आणि काम पूर्ण झाल्यावर त्या पुन्हा सन्मानाने स्थापित केल्या जातील, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले. याशिवाय भावना भडकवणारी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याबद्दल काही राजकीय नेत्यांवर गुन्हे (FIR) देखील दाखल करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनकर्णिका घाटाच्या इतिहासाचा तसेच अनभिज्ञ पैलूंचा आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.

वाराणसी हे वेगवेगळ्या घाटांसाठी प्रसिद्ध आहे. येथील प्रत्येक घाटाला स्वतःचा स्वतंत्र इतिहास व महत्त्व आहे. या सर्व घाटांमध्ये मणिकर्णिका घाट हा सर्वात पवित्र मानला जातो. या घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो, असे मानले जाते. मणिकर्णिका घाटाशी संबंधित अनेक कथा, दंतकथा आणि रहस्ये प्रचलित आहेत. ‘मणी’ म्हणजे कुंडल आणि ‘कर्ण’ म्हणजे कान. विष्णूंनी येथे शिव आणि देवी पार्वती यांच्या स्नानासाठी एक कुंड खोदले होते. हे कुंड पुढे मणिकर्णिका कुंड म्हणून ओळखले जाऊ लागले. एकदा भगवान शंकर या कुंडात स्नान करत असताना त्यांच्या कानातील एक कुंडल (मणी) त्या कुंडात पडले. त्या घटनेनंतर या स्थळाला ‘मणिकर्णिका’ असे नाव पडले, अशी पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. मणिकर्णिका कुंड पुढे गंगानदीत विलीन झाले. या लोकमान्यतेमुळे मणिकर्णिका घाटाला विशेष महत्त्व आहे.

भगवान शिव स्वतः तारक मंत्र सांगतात…

काशी खंडात म्हटले आहे की, काशीत देहत्याग करणाऱ्याच्या कानात भगवान शिव स्वतः तारक मंत्र सांगतात. हा मंत्र ऐकल्यानंतर त्या व्यक्तीच्या आत्म्याला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्ती मिळते, असे मानले जाते. एखादी व्यक्ती आयुष्यात कितीही पापी किंवा दुष्ट असली तरी, तिचा मृत्यू काशीत झाला तर तिला मोक्ष प्राप्त होतो, अशी दृढ श्रद्धा आहे.

मणिकर्णिका घाटाला स्मशानभूमी का म्हटले जाते?

काशीतील मणिकर्णिका घाटावर चोवीस तास अंत्यसंस्कारांची अग्निचिता अखंड पेटलेली असते आणि ती कधीही विझत नाही, अशी श्रद्धा आहे. याच कारणामुळे काशीतील या घाटाला ‘महास्मशान’ असे संबोधले जाते. मणिकर्णिका घाट केवळ अंत्यसंस्कारांचे ठिकाण नसून, तो अनेक धार्मिक समजुती, दंतकथा आणि रहस्यांनी वेढलेला आहे. येथे मृत्यूला भय न मानता, त्याकडे मोक्षाचा मार्ग म्हणून पाहिले जाते, त्यामुळेच हा घाट हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो.

मणिकर्णिका घाट: अग्नी, त्याग आणि शक्तीची कथा

काशीतील मणिकर्णिका घाट केवळ अंत्यसंस्कारांचे स्थळ नाही, तर तो एका गहन पौराणिक स्मृतीचा साक्षीदार मानला जातो. या घाटाचा संबंध आदिशक्तीच्या सती अवताराशी जोडला जातो. वडिलांनी आयोजित केलेल्या यज्ञ समारंभात झालेल्या अपमानामुळे सतीदेवीने यज्ञकुंडातील अग्नीत स्वतःला अर्पण केले होते. हा आघात सहन न होऊन भगवान शंकरांनी तिचे जळते पार्थिव खांद्यावर उचलले आणि विमनस्क अवस्थेत हिमालयाकडे प्रस्थान केले. भगवान शंकरांचा हा अनावर शोक पाहून, सृष्टीचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र चालवले. त्या चक्रामुळे सतीदेवीचे पार्थिव ५१ तुकड्यांमध्ये विभक्त झाले. हे तुकडे ज्या ठिकाणी पृथ्वीवर पडले, ती स्थाने पुढे शक्तीपीठे म्हणून ओळखली जाऊ लागली. याच कथेतून मणिकर्णिका घाटाचे वेगळेपण अधोरेखित होते. सतीदेवीचे कानातले कुंडल ‘मणी’ याच ठिकाणी पडले. त्यामुळे हा घाट शक्तीपीठ म्हणून प्रतिष्ठित झाला, असेही मानले जाते.

मणिकर्णिका घाटावर चितेच्या राखेवर ‘94’ का लिहिले जाते?

अलीकडे काशीच्या मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कारानंतर राखेवर लिहिलेला गूढ अंक ‘94’ Quora आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यामुळे अनेकांमध्ये कुतूहल, प्रश्न आणि आध्यात्मिक चर्चा सुरू झाल्या. या पवित्र घाटावर पाळल्या जाणाऱ्या असंख्य विधींमधला हा एक छोटा, पण गूढ विधी आजही अनेकांना कुतूहलात टाकतो. गंगेत अस्थी विसर्जन करण्यापूर्वी राखेवर ‘94’ हा अंक लिहिण्याची प्रथा आहे. ही परंपरा प्राचीन असल्याचे स्थानिक सांगतात. अंत्यसंस्काराची चिता शांत झाल्यानंतर आणि राख गोळा केल्यावर, पुजारी किंवा डोम म्हणजेच स्मशानाचा परंपरागत रक्षक उरलेल्या राखेवर ‘94’ हा अंक लिहितो.

यामागचं स्पष्टीकरण देताना स्थानिक सांगतात, आयुष्य १०० कर्मांवर आधारलेले असते, यापैकी ९४ कर्मे आपल्या हातात असतात. म्हणजे आपण काय करतो, कसे वागतो, योग्य-अयोग्य निवडतो, धर्माच्या मार्गावर चालतो की नाही, हे सगळे या कर्मांवर ठरते. मात्र उरलेल्या ६ गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात. जन्म कधी घ्यायचा, मृत्यू कधी यायचा, मान-अपमान, फायदा-तोटा… या सगळ्या गोष्टी ईश्वराच्या, म्हणजेच ब्रह्मदेवाच्या इच्छेवर अवलंबून असतात. म्हणूनच मणिकर्णिका घाटावर राखेवर ‘94’ लिहिण्याची प्रथा आहे. याचा अर्थ असा की, माणसाच्या हातातील सर्व कर्मे इथे संपतात आणि उरलेले सर्व काही ईश्वरावर सोपवले जाते.

अंतिम विधी : पाण्याच्या मडक्याचा संस्कार

राखेवर ‘94’ लिहिल्यानंतर, अंत्यविधी पाहणारे पुजारी किंवा गुरु एक अंतिम विधी करतात. चितेवर पाण्याने भरलेल मातीच मडकं फोडलं जातं. या विधीला कपाल क्रिया म्हणतात. हा संस्कार सर्व भौतिक बंधनांचा पूर्णतः त्याग दर्शवतो. ज्या क्षणी मडकं फुटतं आणि पाणी वाहू लागते, त्या क्षणी आत्मा भौतिक आसक्तीच्या पलीकडे जाऊन मुक्तीकडे वाटचाल करतो, अशी श्रद्धा आहे. काही साधूंच्या मते, ‘94’ हा अंक स्वतःच एक मुक्ती मंत्र आहे.

परंतु, 94 हा आकडा इंग्रजीत लिहिण्यात येतो का? आणि जर इंग्रजीतच लिहिला जातो तर ही प्राचीन प्रथा कशी याचे समर्पक उत्तर कोणाकडेही नाही.