एआय स्टार्टअप क्षेत्रात नाव कमावण्यासाठी अनेक जण आपले नशीब आजमावत आहेत. अशाच एका तंत्रज्ञानस्नेही भारतीय तरुणाने मेटा मधील १४ वर्षांची नोकरी सोडून स्वत:चा एआय स्टार्टअप सुरू केला. मनोहर पालुरी यांनी AI आणि रोबोटिक्सच्या मदतीने औषधांचा शोध घेण्यासाठी ‘वॉर्प सायन्सेस’ या कंपनीची सह-स्थापना केली.

वॉर्प सायन्सेसने सुरुवातीलाच गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. कंपनीने ‘सीरिज ए’ फंडिंगच्या माध्यमातून २१५ दशलक्ष डॉलर (सुमारे १,८०० कोटी रुपये) उभे केले आहेत. या गुंतवणूक फेरीचे नेतृत्व व्हेंचर कॅपिटल कंपनी लाइटस्पीडने केले. प्रेमजी इन्व्हेस्ट, मेफिल्ड, IVP, लक्स कॅपिटल व मेनलो व्हेंचर्स यांनीही या स्टार्टअपसाठी निधी पुरवला आहे. लिंक्डइनचे सह-संस्थापक रीड हॉफमन, कॉइनबेसचे सीईओ ब्रायन आर्मस्ट्राँग आणि फिग्माचे सह-संस्थापक डिलन फील्ड यांसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांचाही या स्टार्टअपला पाठिंबा आहे.

या कंपनीची धुरा तंत्रज्ञान आणि डेटा क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींच्या हातात आहे. ओपनएआयचे माजी मुख्य उत्पादन अधिकारी केविन वेल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत, तर व्हाइट हाऊसचे पहिले मुख्य डेटा वैज्ञानिक डी. जे. पाटील मुख्य परिचालन अधिकारी (COO) म्हणून काम पाहतात. टेरेमोटो बायोसायन्सेसचे माजी कार्यकारी सोलोमन रीसबर्ग हेही सह-संस्थापक आहेत. यांच्या सहकार्यानेच मनोहर पालुरी यांनी एआय क्षेत्रात उतरले आहेत.

मनोहर पालुरी कोण आहेत?

मनोहर पालुरी हे हैदराबादच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे (IIIT) माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी या संस्थेतून बी.टेक. पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी ‘सार्नॉफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी’पासून त्यांच्या व्यावसायिक करिअरची सुरुवात केली. तिथे वस्तूंचा मागोवा घेणे, व्हिडीओचे विश्लेषण करणे आणि स्वयंचलित सिनेमॅटोग्राफ अशा कॉम्प्युटर व्हिजन प्रकल्पांवर त्यांनी काम केले, पुढे उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी २०११ मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. या काळात त्यांनी कॉम्प्युटर व्हिजन आणि रोबोटिक्स या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले. त्याशिवाय त्यांनी IBM वॉटसन लॅब्समध्ये रिसर्च इंटर्न म्हणून काम केले आहे आणि गूगलमधील इंटर्नशिपदरम्यान 3D मॅपिंगच्या कामाचादेखील अनुभव घेतला.

२०१२ मध्ये पालुरी यांनी फेसबुकमध्ये कॉम्प्युटर व्हिजन संशोधक म्हणून प्रवेश केला. पुढे २०१५ मध्ये ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाचे संचालक झाले. २०२१ मध्ये त्यांना वरिष्ठ संचालकपद, तर २०२४ मध्ये उपाध्यक्षपद मिळाले. या काळात त्यांनी फेसबुक AI रिसर्च (FAIR) ची स्थापना केली. तसेच या प्रोजेक्टसाठी प्रतिमा व व्हिडीओ समजून घेण्यासाठी कंपनीची आकलन क्षमता विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

पालुरी यांनी मेटाच्या ‘लामा’ या AI मॉडेलशी संबंधित टीमचेदेखील नेतृत्वही केले आहे. त्यानंतर मेटाच्या ‘सुपर इंटेलिजन्स लॅब्स’मधील ‘मीडिया अप्लाइड रिसर्च’ विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. या विभागात मजकूर, प्रतिमा आणि व्हिडीओ यांसारख्या वेगवेगळ्या माध्यमांतील माहिती समजून घेणे आणि त्यातून नवी सामग्री तयार करणाऱ्या AI तंत्रज्ञानावर संशोधन केले जात होते. मेटामधील १४ वर्षांच्या या प्रवासानंतर पालुरी यांनी आता स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचा मार्ग निवडला आहे.

औषधांचा शोध घेण्याची प्रक्रिया वेगवान कशी करणार?

‘वॉर्प सायन्सेस’ ही कंपनी एआय, रोबोटिक्स व रसायनशास्त्र यांची सांगड घालून औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. एखादं नवीन औषध विकसित करण्यासाठी संशोधकांना अनेक रासायनिक संयुगं तयार करून त्यांची चाचणी करावी लागते. त्यातून मिळालेल्या निष्कर्षांचा अभ्यास केल्यानंतर पुढे कोणत्या संयुगावर संशोधन करायचे, हे ठरवले जाते. या प्रक्रियेला हजारो संयुगांची चाचणी घ्यावी लागू शकते. त्यामुळे हे संशोधन अनेक वर्षे चालू शकते.

वॉर्प सायन्सेस AI प्रणाली, रसायनशास्त्रातील तज्ज्ञ आणि स्वयंचलित प्रयोगशाळा उपकरणांचा मेळ साधून संशोधन कमी वेळात पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. कमी वेळात संभाव्य औषधांचा वेगवान शोध घेणे शक्य होऊ शकणार आहे. कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत रसायनशास्त्रांच्या संशोधनासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत अशा प्रयोगशाळा उभारल्या जात आहेत, ज्यामध्ये संशोधनातील प्रयोग स्वयंचलित पद्धतीने केले जातील आणि त्यातून मिळणाऱ्या माहितीचे AI मॉडेल अधिक सक्षम करण्यासाठी वापर केला जाणार आहे.

वॉर्प सायन्सेस औषधनिर्मिती क्षेत्रासाठी संशोधन करणाऱ्या कंपन्यांना मदत करण्यासाठी आधुनिक प्री-क्लिनिकल कॉन्ट्रॅक्ट रिसर्च ऑर्गनायझेशन (CRO) उभारण्याच्या तयारीत आहे. या केंद्रात औषधांसाठी संभाव्य रासायनिक संयुगं तयार केली जातील आणि त्यांची चाचणीही केली जाईल. त्यामुळे औषध विकसित करणाऱ्या कंपन्यांना संशोधनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आवश्यक असलेली मदत एकाच ठिकाणी मिळू शकेल.

या उपक्रमामागची भूमिका स्पष्ट करताना वॉर्प सायन्सेसचे सीईओ केविन वेल यांनी मनीकंट्रोलला सांगितले की, AI मुळे सॉफ्टवेअर इंजिनियरिंग आणि गणिताच्या क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे; मात्र भौतिक विज्ञानाच्या क्षेत्रात एआयचा प्रभाव कमी दिसतो. रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रात एखादी गोष्ट प्रत्यक्ष तयार करून, तिची चाचणी घेऊन आणि त्यातून मिळालेल्या निष्कर्षांच्या आधारे शिकता येते. त्यामुळे विज्ञानासाठी अधिक सक्षम एआय विकसित करायचे असेल, तर मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष प्रयोगांतून मिळालेली डेटा निर्माण करणे आवश्यक आहे, असे वेल यांनी स्पष्ट केले.

वॉर्प सायन्सेसच्या प्रयोगशाळांमध्ये औषधांच्या संशोधनासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातील, कोणत्या दिशेने संशोधन करायचे, हे शास्त्रज्ञ ठरवतील. त्यानंतर AI च्या मदतीने प्रयोगांची आखणी होईल आणि रोबोटच्या साह्याने ते प्रत्यक्षात आणले जातील. प्रत्येक प्रयोगातून मिळालेल्या माहितीचा पुढच्या प्रयोगात काय बदल करावेत, हे ठरवण्यासाठी उपयोग केला जाईल. त्यामुळे संशोधनाची प्रक्रिया अधिक वेगाने पुढे नेता येईल.

कंपनीच्या मते, AI आणि रोबोटिक्समधील प्रगतीमुळे प्रयोगशाळांमध्ये २४ तास संशोधन करणे शक्य होईल. नवीन उपचार आणि नावीन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी प्रयोगांची मालिका सातत्याने सुरू ठेवता येणार आहे.

स्टार्टअपमध्ये पालुरींची भूमिका नेमकी काय आहे?

वॉर्प सायन्सेसमध्ये मनोहर पालुरी हे सहसंस्थापक व मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात औषधनिर्मितीतील एका महत्त्वाच्या प्रक्रियेवर काम करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. एखाद्या औषधासाठी उपयुक्त ठरू शकणारी रासायनिक संयुगं सापडल्यास, त्यांची परिणामकारकता सुधारून पुढील चाचण्यांसाठी त्यांना तयार केले जाणार आहे, ज्याला लीड ऑप्टिमायझेशन म्हटले जाते.

पालुरी यांनी लिंक्डइनवरील पोस्टमध्ये सांगितले की, औषधांच्या शोधासाठी काम करणाऱ्या संशोधकांना अधिक वेगाने काम करता यावे, यासाठी AI आणि रोबोटिक्सचा प्रत्यक्ष प्रयोगांमध्ये वापर केला जाणार आहे. प्रत्येक प्रयोगातून काही शिकून पुढील प्रयोग अधिक अचूक आणि परिणामकारक करतील, अशी यंत्रणा कंपनी विकसित करत आहे.

या तंत्रज्ञानाची उभारणी करताना कंपनी केवळ AI प्रणाली विकसित करण्यावर अवलंबून राहणार नाही. सुरुवातीला अनुभवी रसायनशास्त्रज्ञांसोबत प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम केलं जाईल. त्यांच्या कामाच्या पद्धती समजून घेतल्यानंतर संशोधनातील काही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने स्वयंचलित केल्या जातील. तंत्रज्ञान विकसित केले जाईल आणि ते प्रत्यक्ष संशोधनासाठी उपयुक्त ठरतं का, हे तपासण्यात शास्त्रज्ञांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. संशोधनाची दिशा कोणती असावी आणि यश कशाला म्हणायचं, याचे निर्णय मात्र शास्त्रज्ञांच्याच हातात राहतील, असे पालुरी यांनी सांगितले आहे.

AI आणि रोबोटिक्स ही प्रभावी साधनं असली तरी त्यांचा संशोधनात उपयोग करून घेण्यासाठी शास्त्रज्ञांचं ज्ञान आणि अनुभव महत्त्वाचा ठरतो, असे पालुरी यांनी नमूद केले. तर वॉर्प सायन्सेस स्वतः औषधं विकसित करण्याऐवजी औषधांच्या शोधासाठी आवश्यक असलेली संशोधनाची यंत्रणा आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार आहे, असे कंपनीचे सहकारी डी जे पाटील यांनीही स्पष्ट केले आहे.