रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी शिकण्याकरिता अवधी हवा म्हणून राज्यात आता थेट १५ ऑगस्टपर्यंत सक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. अमराठी नागरिकांच्या हातात आता तब्बल १०७ दिवस आहेत. अमराठी नागरिकांना मराठी शिकण्यासाठी सध्या कोणती साधनं उपलब्ध आहेत? यापूर्वी असे प्रयत्न झाले होते का आदी प्रश्नांचा आढावा…
भाषा केवळ संवादाचे माध्यम?
भाषा हे संवादाचे माध्यम असते; पण केवळ माध्यम असण्यापलीकडेही भाषा समाजाची सांस्कृतिक ओळख असते. ती लोकांना जोडायचे काम करते, तसेच ती त्या समाजातील संस्कृती, सभ्यतेचे अनेक पैलू दाखवते. म्हणूनच संवादापलीकडेही भाषेचा विचार होणं आवश्यक आहे. भाषा तोवरच जगते, जोवर ती चलनात राहते. युनेस्कोने दिलेल्या माहितीनुसार- सध्या सात हजारहून अधिक भाषा ऱ्हास होण्याच्या मार्गावर आहेत. अद्याप मराठीची परिस्थिती वाईट नसली तरी मुंबईसारख्या महाराष्ट्राची राजधानी असलेल्या शहरात मराठी भाषेची आणि भाषकांची परिस्थिती पाहता, भाषासक्तीचा निर्णय घ्यावा लागणे, दुर्दैवी आहे.
भाषा शिकण्यासाठी पोषक वातावरण आहे का?
परराज्यांतून स्थलांतरित होऊन आलेल्या नागरिकांना ‘मराठी येत नाही’ हे म्हणणं सोपं आहे; पण मराठीची गोडी लागेल असं वातावरण आपण तयार करतो का? मराठीचे अभ्यासक सुशांत देवळेकर याविषयी सांगतात की, मराठी भाषकच मराठीचा वापर करीत नाहीत. आपलाच हिंदीतून बोलण्याचा आग्रह असतो. अशा वेळी समोरचा माणूस मराठीतून उत्तर तरी का देईल? अमराठींनी मराठी शिकण्यापूर्वी ज्यांची भाषा मराठी आहे, त्यांनी निग्रहाने मातृभाषेचा, निजभाषेचा वापर करणं गरजेचं आहे. त्यानंतर इतरांकडे वळता येईल.
अमराठींमध्ये सकारात्मकता निर्माण करा
देवळेकर सांगतात, “मराठी भाषा अमराठी नागरिकांनी शिकण्यासाठी सर्वप्रथम त्यांना ती भाषा आपली वाटणं आवश्यक आहे. त्यांना ती सहज व लवकरात लवकर शिकता येईल असा विश्वास वाटायला हवा, तो निर्माण करणं मातृभाषकांचं काम आहे. अमराठींच्या प्रयत्नांचं कौतुक करणं आणि त्यांना प्रोत्साहन देऊन हे सहज साध्य करता येऊ शकेल यासाठी आग्रह असावा; पण दुराग्रह नको.”
अमराठींसाठीचे उपक्रम
‘मायमराठी’
मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागातील प्रमुख डाॅ. विभा सुराणा यांनी २०१२ सालीच या उपक्रमाचे काम सुरू केले. पुढे राज्य मराठी विकास संस्थेचे आर्थिक सहकार्य लाभून ‘मायमराठी’ नावाचा उपक्रम मुंबई विद्यापीठातील जर्मन विभाग आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केला.
या अभ्यासक्रमासाठी अमराठी भाषकांच्या गरजांचा विचार करून, ‘श्रमिकांसाठी मराठी’, ‘परिचारिकांसाठी (नर्सेस) मराठी’, ‘रिक्षाचालक व टॅक्सीचालकांसाठी मराठी’, ‘बँक कर्मचार्यांसाठी मराठी’, ‘शासन व्यवहारातील मराठी’ असे लघु अभ्यासक्रम तयार केले. सध्या हा अभ्यासक्रम केवळ पीडीएफ स्वरूपात आणि श्रुतिकांच्या रूपात उपलब्ध आहे. तो शिकवण्यासाठी कोणीही उपलब्ध नसल्यामुळे सध्या तरी या अभ्यासक्रमाची साधनसामग्रीच संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या अभ्यासक्रमातून संस्थेने अनेक विद्यार्थी घडवले.
१.) २०१५ साली मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनच्या अमराठी अधिकारी आणि कर्मचार्यांना मराठी भाषेचे प्रशिक्षण दिले.
२.) मुंबई विद्यापीठ व तेल अवीव विद्यापीठाच्या करारानुसार २०१६ साली तेल अवीवमधील इस्रायलींसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठीचे वर्ग आयोजित करण्यात आले.
३.) २०१९ मध्ये तमीळ विद्यापीठ, तंजावूर येथे अन्य भाषक विद्यार्थ्यांसाठी मराठीचा वर्ग आयोजित करण्यात आला.
‘संवादात्म मराठी कौशल्ये’
दरवर्षी मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाअंतर्गत ‘संवादात्म मराठी कौशल्यांचा’ अभ्यासक्रम राबविला जातो. एक वर्षाचा हा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने शिकविला जातो. याची मर्यादित विद्यार्थी संख्या जरी ६० असली तरी विद्यार्थीसंख्या वाढल्यास आम्ही क्षमता वाढवू असे आश्वासन डॉ. सुराणा यांनी दिले.
यंदाच्या वर्षीदेखील हा अभ्यासक्रम २१ जुलै २०२६ रोजी सुरू होणार आहे. Self Financed उपक्रम असल्यामुळे, मुंबई विद्यापीठाकडून या उपक्रमासाठी विशेष अनुदान मिळत नाही. या उपक्रमाचे शुल्क ७०००/- रुपये आहे.
मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाचा अभ्यासक्रम
१९८६ सालापासून मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाने अमराठी भाषिकांसाठी ‘मराठी भाषा प्रमाणपत्र’ अभ्यासक्रम सुरू केला. २०२३ पासून हा अभ्यासक्रमदेखील ऑनलाईन शिकविला जातो. एसएससी उत्तीर्ण असणे आणि देवनागरी लिपीची ओळख असणे हीच या अभ्यासक्रमाची किमान अट आहे. या उपक्रमाची शुल्क केवळ १०१०/- रुपये आहे. विभागप्रमुख डॉ. विनोद कुमरे सांगतात, आम्ही हा उपक्रम अद्याप रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सुरू केलेला नाही, तरी विद्यापीठाच्या कुलगुरूंपुढे यासंबंधी आम्ही नक्कीच प्रस्ताव मांडू आणि अमराठींसाठीही असा अभ्यासक्रम आणण्याचा प्रयत्न जरूर करू.
‘भारतीय भाषाज्योति’ उपक्रम
सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर इंडियन लँग्वेजेस, मैसूर यांनी ‘भारतीय भाषाज्योति उपक्रमा’अंतर्गत हिंदी – मराठी पुस्तकाची निर्मिती केली आहे. हे पुस्तकदेखील सीआयआयएलच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. येथे श्रुतिका किंवा ध्वनिचित्रफीत अशी व्यवस्था उपलब्ध नाही.
तमीळ संघाचा ‘तमीळ-मराठी उपक्रम’
मुंबईमध्ये माटुंगास्थित मुंबई-तमीळ संघदेखील तमीळ लोकांना मराठी शिकता यावी यासाठी कार्यरत आहे. गेल्या कैक वर्षांपासून तमीळ-मराठीचे वर्ग येथे भरतात. मराठी न येणार्या दाक्षिणात्य मराठींसाठी ही संस्था महत्त्वाचं काम करत आहे.
‘स्पोकन मराठी क्लासेस’ची गरज
या प्रकारे महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांमध्ये मराठी शिकविण्याचे अभ्यासक्रम आहेतच; परंतु हे सारे अभ्यासक्रम पुस्तकरूपात किंवा पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत. देवळेकर सांगतात की, असे उपक्रम मौखिक असणं अपेक्षित आहे. छापील माध्यमात भरपूर साधनं उपलब्ध आहेत. त्यावरील केवळ श्रुतिकाच नाही, तर ध्वनिचित्रफितीदेखील तयार करणं आवश्यक आहे. ‘स्पोकन इंग्लिश क्लासेस’प्रमाणे ‘स्पोकन मराठी क्लासेस’ची गरज सध्या जास्त आहे, जिथे मराठी शिकविणारे शिक्षक उपलब्ध असतील.
अमराठींना मराठी शिकण्याची ‘गरज’ आहे का?
भविष्यकाळात मराठी टिकविण्यासंदर्भात सुशान्त देवळेकर म्हणाले, इंग्रजी भाषा शिकल्याशिवाय उच्च शिक्षण, नोकरी व तंत्रज्ञानापासून वंचित राहावे लागेल ही जशी समाजाची धारणा आहे, तशीच धारणा मराठीबाबतही निर्माण करावी लागेल. कॉर्पोरेट क्षेत्रातदेखील मराठीचा पर्याय ठेवणे आवश्यक आहे. शासनाने भाषेची उपयुक्तता वाढेल अशा कायद्यांची व धोरणांची अंमलबजावणी केली पाहिजे, जेणेकरून ती इतर अमराठी परभाषकांना शिकण्याची गरज निर्माण होईल. त्यासाठी मराठी भाषेत रोजगाराच्या संधी उपलब्ध होणं हादेखील महत्त्वाचा भाग आहे. तेव्हाच अमराठी लोक भविष्यात मराठी शिकतील.
