scorecardresearch

विश्लेषण : सहा महिने, ७० मराठी चित्रपट आणि कोटी उड्डाणे…

किमान दोन वर्षांनी आपली विस्कटलेली घडी सावरण्यासाठी कंबर कसलेल्या मराठी चित्रपट निर्मात्यांनी यावर्षी पहिल्या सहा महिन्यांतच ७० चित्रपट प्रदर्शित केले आहेत.

विश्लेषण : सहा महिने, ७० मराठी चित्रपट आणि कोटी उड्डाणे…
अनेक मराठी चित्रपट तयार असूनही प्रदर्शित झालेले नाहीत, हे वास्तव आहे.

-रेश्मा राईकवार 

हे वर्ष हिंदी चित्रपटांसाठी कितीही वाईट ठरलं असलं तरी प्रादेशिक चित्रपटांना मात्र प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळतं आहे. प्रादेशिक चित्रपटांमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांना जसा देशभरात प्रतिसाद मिळतो आहे तसंच यश सध्या मराठी चित्रपट राज्यभरात अनुभवत आहेत. करोनामुळे हिंदीप्रमाणेच किंबहुना त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक मराठी चित्रपटांची आर्थिक गणितं बिघडली. अनेक मराठी चित्रपट तयार असूनही प्रदर्शित झालेले नाहीत, हे वास्तव आहे. तरी किमान दोन वर्षांनी आपली विस्कटलेली घडी सावरण्यासाठी कंबर कसलेल्या मराठी चित्रपट निर्मात्यांनी यावर्षी पहिल्या सहा महिन्यांतच ७० चित्रपट प्रदर्शित केले आहेत. यावर्षी मराठी चित्रपट प्रदर्शनाचा हा विक्रमी आकडा ठरला असल्याचे चित्रपट व्यवसायातील तज्ज्ञ सांगतात.

सुरुवात गत नोव्हेंबरपासून…

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’पासून खरंतर मराठी चित्रपटांच्या घोडदौडीला सुरुवात झाली असं म्हणता येईल. मोठमोठे हिंदी चित्रपट प्रदर्शित होत असतानाही आपल्याला किती शो मिळतील, मुख्य शो मिळतील की नाही याची पर्वा न करता आठवड्याला दोन ते तीन या वेगाने मराठी चित्रपट प्रदर्शित होत गेले. ‘झिम्मा’, ‘पांडू’, ‘पांघरूण’, ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’, ‘झोम्बिवली’, ‘लोच्या झाला रे’, ‘पावनखिंड’ असे एकापाठोपाठ एक मराठी चित्रपट प्रदर्शित होत गेले. गेल्या सहा महिन्यांत प्रदर्शित झालेल्या ७० चित्रपटांंपैकी सगळ्याच चित्रपटांना यश मिळालं नसलं तरी किमान १० ते १२ मराठी चित्रपटांनी २ कोटींपासून ३० कोटींपल्याड कमाईपर्यंत झेप घेतली आहे.

सर्वाधिक कमाई करणारे मराठी चित्रपट कोणते?

२०२१ च्या नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांत जेव्हा काेणी निर्माते चित्रपट प्रदर्शित करायला तयार नव्हते, तेव्हा मराठीत ‘झिम्मा’ने सुरुवात केली. दाक्षिणात्य चित्रपट आणि रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’चा डंका जोरजोरात वाजत असताना प्रेक्षकांना मोठ्या संख्येने चित्रपटगृहापर्यंत आणण्याचं काम ‘झिम्मा’ने केलं. या चित्रपटानेही १४ कोटींहून अधिक कमाई केली. प्रेक्षकांची गर्दी खेचून आणण्याचा तोच कित्ता मग ‘पांडू’ चित्रपटानेही गिरवला. ‘जयंती’सारख्या वेगळ्या आशयाच्या चित्रपटाने तिकिटबारीवर मोठी कमाई केली नसली तरी प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहापर्यंत आणण्याचं काम या चित्रपटांनी चोख बजावलं. तोच यशाचा आविष्कार नव्या वर्षातही सुरू राहिला. महेश मांजरेकर यांच्या ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाला राज्यभरात चांगली प्रेक्षकसंख्या मिळाली. पाठोपाठ आलेल्या दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘पावनखिंड’ चित्रपटाने मराठीत प्रेक्षकसंख्या आणि कमाईचाही विक्रम केला. या चित्रपटाने ३० कोटींच्यावर दणदणीत कमाई केली. त्यानंतर ‘धर्मवीर’ चित्रपटाने २५ कोटींपेक्षा अधिक कमाई केली. तर प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाने १७ कोटींहून अधिक कमाई केली. ‘शेर शिवराज’, ‘टाईमपास ३्’, ‘लोच्या झाला रे’ या तीन चित्रपटांनी ५ ते १० कोटींच्या घरात कमाई केली आहे. याशिवाय, ‘टकाटक २’, ‘दे धक्का २’, ‘दगडी चाळ २’ या सिक्वलपटांनी आणि ‘चंद्रमुखी’ या चित्रपटानेही तिकीटबारीवर कोटींंची उड्डाणे घेतली.

‘बॉईज ३’ने पुन्हा यशाचे गणित जमवले…

जुलै – ऑगस्ट हे दोन महिने अनेकदा पावसामुळे चित्रपटांच्या व्यवसायावर परिणामकारक ठरतात. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्यदिन आणि त्यानिमित्ताने जोडून आलेल्या सुट्ट्यांचा फायदा घेत मोठे हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले, पण त्यांना मोठा फटका बसला. तीच बाब मराठी चित्रपटांच्या बाबतीतही म्हणता येईल. गेल्या दोन महिन्यांत मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाचा वेग काहीसा मंदावला होता. या दोन महिन्यांत आशयघन चित्रपट प्रदर्शित झाले, पण त्यांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला नाही. तो प्रतिसाद गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘बॉईज ३’ या चित्रपटाला मिळाला आणि पुन्हा एकदा मराठी चित्रपट निर्मात्यांंना हुरूप आला. दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता लवकरच हा चित्रपटही हिट चित्रपटांच्या यादीत प्रवेश करेल, असा विश्वास निर्माते, दिग्दर्शक यांनी व्यक्त केला आहे. ‘बॉईज ३’ या मराठी चित्रपटाने प्रदर्शित झाल्या झाल्या पहिल्याच आठवड्यात ४.९६ कोटींची तुफान कमाई केली आहे. एकीकडे बॉलिवूडचे मोठे चित्रपट यश मिळवण्यासाठी धडपडत असताना काही मराठी चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह प्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गुप्ते प्रस्तुत, विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज ३’ चित्रपटाच्या पहिल्या दोन शोंना तिकीट खिडकीवर चांगले यश मिळाले होते. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटगृहांमध्ये ‘बॉईज ३’च्या शोची संख्या वाढवण्यात आली आहे. या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद सुखावणारा असला तरी प्रेक्षकांचा ठरावीक शैलीतील चित्रपटांनाच मिळणारा प्रतिसाद निर्मात्यांना काहीसा कोड्यात टाकणारा ठरला आहे.

ऐतिहासिक, विनोदी, ॲक्शन, सेक्स कॉमेडीपटांना यश…

करोनानंतरच्या काळात कुटुंबासहित पाहता येईल अशा मनोरंजनात्मक चित्रपट पाहण्याकडे प्रेक्षकांचा अधिक कल असल्याचं दिसून आलं आहे. ऐतिहासिक चित्रपटांना मराठीत सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे, त्यामागचं मोठं कारण इतिहासावरचं प्रेम आणि मुळात असे चित्रपट कुटुंबाबरोबर एकत्र पाहण्याचा आनंद घेता येतो हे आहे. याशिवाय, तद्दन विनोदी सिक्वलपट किंवा ‘दगडी चाळ २’सारख्या ॲक्शनपटालाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तरुणाईने ‘टकाटक २’, ‘बॉईज ३’ सारख्या सेक्स कॉमेडीपटांबरोबरच ‘टाईमपास ३’ सारख्या चित्रपटाला पसंती दिली आहे. मात्र त्याचवेळी ‘भाऊबळी’ किंवा ‘एकदा काय झालं’ सारख्या आशयघन, सामाजिक भाष्य करणाऱ्या चित्रपटांना ठरावीक वर्गातूनच प्रतिसाद मिळतो आहे. थोड्याफार प्रमाणात हाच प्रकार हिंदी चित्रपटांच्या बाबतीतही दिसून येत असल्याचे चित्रपट व्यवसायातील जाणकारांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या