मुंबई आणि पुण्यात मध्यंतरी धो-धो पाऊस पडत होता. पण मराठवाडा अजूनही कोरडाच आहे. लागवडीयोग्य क्षेत्राच्या ५८ टक्केच भागावर पेरणी झाली आहे. ज्या भागात पेरणी झाली, त्यातील काही भागांत निकृष्ट बियाणे असल्याने उगवण झाली नाही. काही ठिकाणी शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढला आहे. धरणांमध्ये पाणी वाढले नाही की, मराठवाड्यातून पिण्याच्या पाण्याचे टँकर हटले नाहीत. मराठवाड्यावर कोरडी आभाळमाया दिसते आहे. आता ऊन पडले आहे. पाऊस कधी येईल माहीत नाही. हा प्रवास दुष्काळकडे जाईल का…?

आतापर्यंत किती पाऊस?

मराठवाड्यात सुमारे साडेआठ हजारांहून अधिक गावे. सरासरी पर्जन्यमान ६७९ मिलीमीटर. लागवडीयोग्य क्षेत्र ५४.५१ लाख हेक्टर होते. पण ते गेल्या काही वर्षांत घटले. गेल्या पाच वर्षांत मराठवाड्यात ४९.७२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. तसा प्रदेश दुष्काळी. त्यामुळे मोठे सिंचन प्रकल्प केवळ ११. या प्रकल्पाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता ५१४३ दशलक्ष घनमीटर. ७५ मध्यम प्रकल्प आणि ७५८ लघु प्रकल्प. याशिवाय गोदावरील १५ उच्च पातळी बंधारे अशी पाणी साठवून ठेवण्याची क्षमता. जुलै महिन्याच्या १० तारखेपर्यंत यातील पाणीसाठा केवळ ३४.३४ एवढाच. एक दिलासादायक बाब एवढीच की, नाशिकमध्ये पडलेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू आहे. २८ टक्क्यांवर धरणाची पातळी आता ३१ टक्क्यांवर गेली आहे. पावसाची एकूण टक्केवारी तशी ८४.३ एवढी. पण अनेक भागांत पाऊस पडलाच नाही. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या भागात अनेक गावांत पुरेसा पाऊस नाही. परिणामी पेरण्या रखडल्या आहेत. सर्वदूर पाऊस न झाल्याने अजूनही पिण्याच्या पाण्याची ओरड कायम आहे.

पावसाचा अलीकडचा इतिहास काय सांगतो?

मराठवाड्यात गेल्या पाच वर्षांत २०२३ मध्ये सरासरीच्या ७९ टक्के पाऊस पडला. तेवढे एक कमी पावसाचे वर्ष वगळता मराठवाड्यात सलग अधिक पाऊस नोंदवला जात होता. २०२१ मध्ये सर्वाधिक १४६ टक्के नोंदविण्यात आला. गेल्या वर्षी म्हणजे २०२५ मध्ये तो १३८ टक्के एवढा होता. अनेक भागांत पूर आले. अगदी दुष्काळी पट्ट्यात पडलेल्या पावसाने गाळ वाहून विहिरी बुजल्या. तत्पूर्वी २०१२ मध्ये ६९ टक्के, आणि २०१४ मध्ये सर्वात कमी म्हणजे ५३ टक्के नोंदविण्यात आला. हवामान बदलाचा मोठा फटका सहन करणाऱ्या मराठवाड्यात गेल्या वर्षी गोदावरी, पूर्णा, दुधना, सिंदफणा, पैनगंगा, मांजरा, तेरणा नद्यांना पूर आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एका दिवसात ६८ मंडळात ११० मिलीमीटर एकूण चार तालुक्यात १६ गावे बाधित झाली हाेती. नांदेड जिल्ह्यात तर अनेक गावांतून जमीन खरवडून गेली. धाराशिवमधील परंडा आणि बीडमधील आष्टी या दुष्काळी पट्ट्यातील गावांमध्ये पूर आला होता. आता पाऊस गायब झाल्याने हे वर्षे अवर्षणाचे असेल असे चित्र दिसून येत आहे. २०१४ ते २०१५ मध्ये मराठवाड्यात सर्वाधिक ४०१५ पिण्यासाठी टँकर मागवावे लागले होते. लातूरला पिण्यासाठी रेल्वेने पाणी आणावे लागले होते. हवामान बदलाचा मोठा फटका नेहमीच मराठवाड्याला बसत असल्याचे दिसून येत आहे.

पीक रचनेत बदल होतील का?

मराठवाड्यात ४९ लाख ७२ हजार हेक्टरवर पेरणी होईल असे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात अनेक भागांत पाऊस एवढा कमी आहे की, शेतकऱ्यांनी अजूनही पेरणी केलीच नाही. धाराशिव, लातूरसारख्या जिल्ह्यात कर्नाटकातून आलेल्या पावसामुळे पेरण्या लवकर झाल्या. पण अनेक ठिकाणी निकृष्ट सोयाबीन बियाणामुळे उगवणच झाली नाही. काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अजूनही ४० टक्के पेरणी बाकी आहे. जूनमध्ये पाऊस न पडल्याने मूग, उडीद या पिकांचा पेरा कमी झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मका हे पीक वाढते आहे. जसजसा पाऊस कमी होईल तसतसे पीकरचनेत बदल करावे लागतील असे प्रयोग सुचविण्यात आले आहेत. जालन्याच्या जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी रेशीम शेती, चिया सीड्स, अश्वगंधा, सफेद मुसळी अशा औषधी वनस्पतीचा पर्याय काही शेतकऱ्यांना दिला. मात्र, पाऊस कमी झाल्याने सर्वात मोठा फटका साखर कारखान्यांना बसण्याची शक्यता आहे. अधिक पाणी लागणारे पीक कमी करून कमी पावसाची पिके घेण्याचा कल वाढावा, असे प्रयत्न सुरू आहेत. यात तुती लागवड आणि बांबू लागवड करावी असेही सांगण्यात येत आहे. मात्र, हे प्रयोग सरसकट सर्वत्र केले जाणे अवघड आहे. त्यामुळे पीकरचनेत मोठे बदल होणार नाहीत. मात्र, पाऊस वाढला तर अजूनही पीक वाढीची आशा संपलेली नाही.

हवामान बदलावर उपाययोजना कोणत्या?

ढगाची स्थिती आणि पाऊस याची अचूक माहिती मिळावी म्हणून डॉप्लर रडार नावाची यंत्रणा १० वर्षापूर्वी मंजूर करण्यात आली. पण हे रडार कोठे बसवायचे याचा निर्णय काही अधिकाऱ्यांनी वेळेत घेतला नाही. शेवटी खुलताबादजवळ रडार बसवले जाईल असे सांगण्यात आले. पण ते अजूनही बसलेले नाही. पीकरचनेतील बदलाची चर्चाही तशी केली जात नाही. शेतकरी नवे मार्ग शोधत राहतात. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दुष्काळछाया अधिक गडद होत आहे.