scorecardresearch

विश्लेषण: नागपूरचा मारबत उत्सव! काय असते याचे वेगळेपण?

भोसले राजघराण्यातील बकाबाई या महिलेने इंग्रजांसोबत हातमिळवणी केली होती. तिच्या पतीने याला विरोध केला नव्हता. म्हणून त्याच्या पुतळ्याची  मिरवणूक काढून निषेध करण्यात आला होता.

Kali Pili Marbat procession Nagpur
देशातील एकमेव असे मारबत मिरवणुकीचे शहर म्हणूनही नागपूर ओळखले जाते.

-राम भाकरे  

नागपूरची ओळख ही संत्रीनगरी, झिरो माईल्सचे शहर आणि आताच्या काळात सर्वाधिक वेगाने प्रगत होणारे शहर अशी असली तरी कित्येक वर्षे देशातील एकमेव असे मारबत मिरवणुकीचे शहर म्हणूनही ओळखले जाते. त्याला राज्य पर्यटन विकास मंडळानेही मान्यता दिली आहे. त्यामुळे काय आहे ही मारबत आणि त्याचा पौराणिक इतिहास. हे जाणून घेऊ या. 

काळी-पिवळी मारबत म्हणजे काय? 

इंग्रजांच्या राजवटीत देशात नागरिकांना एकत्र येण्यासाठी टिळकांनी पुण्यात गणेशोत्सव सुरू केला, त्याआधीपासूनच नागपूर येथे मारबत उत्सव सुरू झाला. प्राचीन काळातील मानवजातीसाठी घातक ठरणाऱ्या रुढी-परंपरांचे प्रतीक म्हणजे ‘काळी मारबत’! तर चांगल्या परंपरांचे प्रतीक म्हणजे ‘पिवळी मारबत’. काळ्या मारबतीला १४१ वर्षांचा तर पिवळ्या मारबतीला १३७ वर्षांचा इतिहास आहे. समाजातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने तान्हा पोळ्याच्या दिवशी चांगल्या आणि वाईट प्रतीकांची मिरवणूक काढली जाते, ती  म्हणजेच काळी व पिवळी मारबत मिरवणूक. शंभर वर्षांच्या काळात अनेक परंपरा लोप पावत असताना नागपूरने त्यांची मारबत मिरवणुकीची ऐतिहासिक पंरपरा कायम ठेवली. अपवाद होता तो फक्त करोना काळातील दोन वर्षांचा. 

PHOTOS : “घेऊन जा रे मारबत…इडा पिडा घेऊन जा रे बडग्या…”; अन् नागपुरकरांची तुफान गर्दी

मारबतीचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व काय? 

या उत्सवाचा संबंध महाभारतापर्यंत जोडला जातो. त्याकाळात मायावी राक्षसाने श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी स्त्रीचे रूप धारण केले होते. पण श्रीकृष्णाने तिला ठार मारले. त्यानंतर गावकऱ्यांनी तिला गावाबाहेर नेऊन जाळले. तेव्हापासून मारबत हा उत्सव सुरू झाल्याची दंतकथा सांगितली जाते. हा उत्सव साजरा केल्याने गावावरचे संकट टळते, असे सांगतात.  

काय आहे मारबतीची परंपरा? 

नागपूरने शेकडो वर्षांपासून जपलेल्या बडग्या-मारबत परंपरेमुळे नागपूरला वेगळी ओळख मिळाली. दरवर्षी तान्हा पोळ्याच्या (लाकडी बैलांचा पोळा) दिवशी मिरवणूक काढली जाते. त्यात सध्याच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे पुतळ्यांचे देखावे (बडगे) तयार केले जातात. मिरवणुकीच्या समारोपाला त्याचे दहन केले जाते. जुन्या नागपुरातून निघणाऱ्या या मिरवणुकीत लाखो नागपूरकरांसह विदर्भातील नागरिक सहभागी होतात. ती एक जत्राच असते.  

‘बडगे’ शब्दाची उत्पत्ती कशी झाली?

मिरवणुकीच्या निमित्ताने तयार करण्यात आलेले देखावेरूपी पुतळे म्हणजेच ‘बडगे’. हा भोसलेकालीन शब्द आहे. भोसले राजघराण्यातील बकाबाई या महिलेने इंग्रजांसोबत हातमिळवणी केली होती. तिच्या पतीने याला विरोध केला नव्हता. म्हणून त्याच्या पुतळ्याची  मिरवणूक काढून निषेध करण्यात आला होता. या पुतळ्याला ‘बडगे’ संबोधण्यात आले होते, असे सांगण्यात येते. हेच बडगे मारबत मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण असते. दरवर्षी कोणाचा बडगा तयार करणार याबाबत उत्सुकता असते. एकप्रकारे हा बडग्याचा उत्सव असतो. त्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी जनतेच्या मनातला प्रशासनाच्या विरोधात राग आणि संताप व्यक्त होतो. दरवर्षी वर्षभरातील चर्चेचा विषय घेऊन बडगे तयार केले जाते. 

कशी केली जाते पूर्वतयारी? 

बांबू, तरट, फाटके कपडे आदीपासून मारबती व बडगे तयार केले जाते. एक सांगाडा तयार करून त्यावर कापड गुंडाळले जाते. विविध रंगांनी त्याला सजवले जाते. मारबतबरोबर जो प्रमुख बडग्या असतो त्याच्या गळ्यात तुटलेले झाडू, फुटके डबे, टायरच्या माळा अडकवलेल्या असतात. बडग्याच्या हातात मुसळ व कमरेला उखळ बांधलेले असते. 

या उत्सवाला राज्यशासनाचे पाठबळ आहे का? 

नागपुरातील मारबत मिरवणुकीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन २०१३मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मारबत उत्सवाला मान्यता दिली. त्यामुळे हा उत्सव देश-विदेशात पोहचला. मारबत उत्सव जाणून घेण्यासाठी अनेक विदेशी पर्यटक दरवर्षी नागपुरात येतात. तान्हा पोळ्याच्या दिवशी निघणाऱ्या मिरवणुकीच्या निमित्ताने अनेकांना रोजगार मिळतो. बँड पथक, ढोलताशे, डीजे, कारागीर, हातठेलेसह छोट्या विक्रेत्यांना रोजगार मिळतो. लाखो लोकांची गर्दी मिरवणुकीच्या मार्गाने होत असल्याने त्या मार्गावर विविध खाद्यपदार्थांची दुकाने लागतात. इतक्या वर्षानंतरही या उत्सावाने आपले महत्त्व टिकवून ठेवले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-08-2022 at 07:39 IST