US Secretary Marco Rubio Taj Mahal Visit and Persian History Connection of Taj Mahal: २८ फेब्रुवारी रोजी ‘अमेरिका-इराण युद्ध’ सुरू झाल्यापासून तेहरान दोन आघाड्यांवर लढाई लढत आहे. एक प्रत्यक्ष युद्धभूमीवरील लढाई आणि दुसरी ऑनलाईन माध्यमांवरील डिजिटल लढाई. अमेरिकेला आणि तिथल्या नेतृत्वाला ट्रोल करण्याची एकही संधी इस्लामिक प्रजासत्ताक (इराण) सोडत नाहीये. काही दिवसांपूर्वी ट्रम्प आणि पीट हेगसेथ यांच्यासारखी दिसणारी ‘लेगो’ खेळण्यांची बाहुली वापरून इराणने व्हिडिओ तयार केले होते. त्यात रॅप गाण्यांद्वारे त्यांची उघडपणे थट्टा केली होती.

ट्रम्प प्रशासनावरील सुरू असलेल्या ऑनलाईन हल्ल्याचाच एक भाग म्हणून, सोमवारी हैदराबादमधील इराणच्या महावाणिज्य दूतावासाने (Consulate General of Iran) अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री (Secretary of State) मार्को रुबिओ यांना ट्रोल करण्याची आणखी एक संधी साधली. रुबिओ त्यांच्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यात पत्नी जेनेट रुबिओ यांच्यासह आग्र्यातील ताजमहालाला भेट दिली.

रुबिओ यांनी या भेटीचे सुंदर, पोस्टकार्डवर शोभतील असे फोटो पोस्ट केल्यानंतर लगेचच इराणी नागरिकांनी आणि प्रशासनाने अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांना टीकेचे लक्ष्य केले. रुबिओ यांना “इतिहास किंवा वास्तुकलेची माहिती असती, तर त्यांनी येथे फोटो काढण्यासाठी अशी पोझ दिली नसती,” असे म्हणत त्यांनी रुबिओ यांची खिल्ली उडवली.

रुबिओ यांची ताजमहाल भेट आणि इराणचा प्रहार

सोमवारी, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी आग्र्यातील ताजमहालला भेट दिली आणि मुघलकालीन ऐतिहासिक वास्तूच्या समोर पत्नी जेनेट रुबिओ यांच्याबरोबर फोटो काढले. रुबिओ आणि त्यांच्या पत्नीचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. त्यानंतर हैदराबादमधील इराणच्या महावाणिज्य दूतावासाने (Consulate General of Iran) एक पोस्ट शेअर केली.

युनेस्कोच्या (UNESCO) या जागतिक वारसा स्थळावर काढलेल्या रुबिओ दाम्पत्याच्या फोटोवर प्रतिक्रिया देताना इराणी दूतावासाने ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले, “जर रुबिओ यांना इतिहास किंवा वास्तुकलेची समज असती, तर त्यांनी येथे फोटोसाठी अशी पोझ दिली नसती. हे स्मारक मुघल सम्राटाने त्याच्या इराणी वंशाच्या पत्नीवरील प्रेमाखातर बांधले होते, या वास्तूची रचना इराणी वास्तुविशारदांच्या अफाट बुद्धिमत्तेतून साकारली गेली होती आणि दुसरीकडे, त्यांचे (रुबिओ यांचे) सरकार आज इराणी संस्कृती नष्ट करण्याची धमकी देत आहे आणि इतर संस्कृतींचा अपमान करत आहे.”

इराणी दूतावासाच्या या पोस्टचा दुसरा भाग डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी संस्कृती नष्ट करण्याबाबत दिलेल्या धमकीच्या संदर्भाला उद्देशून आहे.

ताजमहालचे पर्शियन (इराणी) कनेक्शन

मुघल सम्राट शाहजहानने आपली पत्नी मुमताज महल हिच्या आठवणीत ताजमहालची निर्मिती केली होती. मुमताज महल ही मूळची पर्शियन वंशाची होती. इतिहास सांगतो की, मुमताज इराणमधील एका नामांकित खानदानी (उमराव) कुटुंबातील होती आणि तिचे वडील अब्दुल हसन आसफ खान हे मुघल दरबारात उच्च पदावर असलेले पर्शियन अमीर होते. असे म्हटले जाते की, तिचे आजोबा मिर्झा गियास बेग हे मूळचे तेहरानचे होते आणि ते १५७७ साली अकबराच्या दरबारात सामील होण्यासाठी भारतात आले होते. एवढेच नव्हे तर, मुमताजची आई दिवाणजी बेगम ही देखील काझ्विन (Qazvin) येथील एका अत्यंत प्रतिष्ठित पर्शियन अमीर ‘ख्वाजा गियासुद्दीन’ यांची कन्या होती.

मुमताजच्या पर्शियन (इराणी) संबंधांव्यतिरिक्त, खुद्द ताजमहालवरही पर्शियन संस्कृतीचा मोठा प्रभाव दिसून येतो. ‘ब्रिटानिका’मधील (Britannica) नोंदीत ताजमहालचे मुख्य मकबरे, त्या शेजारील पूरक इमारती आणि नक्षीकामाचे (सुशोभिकरण) काम पूर्ण करण्यासाठी भारत, पर्शिया आणि इतर ठिकाणांहून हजारो कामगारांना पाचारण करण्यात आले होते, असे म्हटले आहे. किंबहुना यामुळेच हे भव्य स्मारक भारत-इस्लामिक (Indo-Islamic) वास्तुकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण ठरले, अशी नोंद आहे.

Photograph of the Taj Mahal by Samuel Bourne, 1860s
Photograph of the Taj Mahal by Samuel Bourne, 1860s

ताजमहालच्या बांधकामासाठी, शाहजहानने वास्तुविशारद (Architects) आणि कारागिरांच्या चमूचे नेतृत्व करण्यासाठी ‘उस्ताद अहमद लाहोरी’ यांची नियुक्ती केली होती. स्थानिक परवानाधारक टुरिस्ट गाईड बी. के. जैन यांनी फर्स्टपोस्टशी बोलताना संगितले की, लाहोरी हे एक प्रसिद्ध पर्शियन वास्तुविशारद होते. वास्तविक पाहता, ताजमहालची अनेक ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण अंगे पर्शियन वास्तुकलेतूनच घेण्यात आली आहेत. उदाहरणार्थ, त्याचा वरचा मोठा गोलाकार दुहेरी घुमट (Bulbous double dome), संगमरवरावरील बारीक नक्षीकाम (Marble inlay work) आणि त्याची अचूक सममिती (Strict symmetry – सर्व बाजूंनी सारखेपणा).

ताजमहालच्या संगमरवरी भिंतींवर कुराणमधील वचने (आयात) कोरलेली आहेत. इराणच्या शिराज (Shiraz) येथील रहिवासी असलेले पर्शियन सुलेखनकार (Calligrapher) ‘अब्दुल हक’ यांनी या वचनांची निवड केली होती आणि ती भिंतींवर कोरली होती. त्यांच्या या उत्कृष्ट कामासाठी शाहजहानने त्यांना ‘अमानत खान’ ही पदवी देऊन गौरविले होते.

Photo Credit: Wikipedia

ताजमहालमधील बागा (उद्याने) हे पर्शियन प्रभावाचे आणखी एक उत्तम उदाहरण आहे. या विस्तीर्ण परिसराची रचना पारंपारिक पर्शियन ‘चारबाग’ (Charbagh) पद्धतीनुसार करण्यात आली आहे. या पद्धतीत पाण्याचे पाट (जलवाहिन्या) वापरून बागेचे चार समान भाग केले जातात. हे पाण्याचे पाट स्वर्गातील चार नद्यांचे प्रतीक मानले जातात.

इराणचा अमेरिकेवर प्रहार…

२३ मे रोजी जेव्हा मार्को रुबिओ भारतात आले, तेव्हा इराणने ट्रम्प प्रशासनाच्या या अधिकाऱ्यावर ‘सभ्यता’ (sabhyata) शब्द वापरून जोरदार टीका केली. रुबिओ यांचे भारतात आगमन होताच इराणच्या मुंबईतील महावाणिज्य दूतावासाने (Mumbai consulate) ‘X’ वर एक पोस्ट लिहीत म्हटले होते, “थोडा सीख लो यार… “सभ्यता का क्रॅश कोर्स” फ्री में मिल जायेगा!” (मित्रा, थोडे शिकून घे… “सभ्यतेचा क्रॅश कोर्स” मोफत मिळेल!) ‘सभ्यता’ हा हिंदी शब्द असून त्याचा अर्थ संथपणा, संस्कृती किंवा सुसंस्कृतपणा असा होतो. याआधीही, सुरू असलेल्या युद्धाच्या दरम्यान इराणने सोशल मीडियावर काही अत्यंत चपखल, बुद्धिवान आणि उपरोधिक वन-लाइनर्स (one-liners) वापरून डोनाल्ड ट्रम्प यांना ट्रोल केले.