जर्मनीतील सुप्रसिद्ध क्लब फुटबॉल लीग बुंडेसलिगामधील पुरुष संघाच्या प्रशिक्षक म्हणून युनियन बर्लिन क्लबने मेरी लुईस एटा या महिला प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे. लीगमध्ये सध्या युनियन बर्लिन क्लबची स्थिती चांगली नाही. लीगमधील आपले स्थान टिकवून ठेवण्याचा एक प्रयत्न म्हणून क्लबने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा ऐतिहासिक निर्णय आणि मेरी लुईस एटा यांच्या कामगिरीचा आढावा…

युनियन बर्लिन क्लबचा ऐतिहासिक निर्णय

जर्मनीमधील बुंडेसलिगामधील स्थान डळमळीत असल्याच्या भीतीने युनियन बर्लिन क्लबने आपल्या संघ व्यवस्थापनात आमूलाग्र बदल केले. अखेरच्या सामन्याच हायडेनहाईम संघाकडून पराभूत झाल्यावर तर त्यांनी मुख्य प्रशिक्षकही बदलण्याचा निर्णय घेतला. मुख्य प्रशिक्षक स्टिफन बॉमगार्ट यांची हकालपट्टी करून त्यांनी ही जबाबदारी मेरी लुईस एटा या महिला प्रशिक्षकाच्या हाती सोपविली आहे. क्लबचा हा निर्णय अंतरिम असला, तरी तो सर्वात वेगळा ठरला. कारण आजपर्यंत कुठल्याही पुरुष संघासाठी महिला प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

या निर्णयामागे नेमकी भूमिका काय?

युनियन क्लबची लीगमधील सुरुवात चांगली झाली असली, तरी हंगामाचा दुसरा टप्पा त्यांच्यासाठी निराशाजनक ठरला. सध्याच्या लीग क्रमवारीकडे नजर टाकली, तर क्लबची स्थिती नाजूक आहे. लीगमधील पदावनती टाळण्यासाठी क्लबला शिल्लक पाच सामन्यात विजय आवश्यक आहे. ही सध्याची स्थिती बघितल्यास संघाच्या कामगिरीत सुधारणा होण्याची शक्यता वाटत नसल्यामुळेच क्लबने नवी सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.

प्रशिक्षकपदी महिलेच नियुक्ती का?

लीग आता अखेरच्या टप्प्यात आहे. अखेरचे पाच सामने बाकी आहेत. त्यामुळे लगेच मुख्य प्रशिक्षकपदासाठी मोठा करार करण्याचा विचार दूर ठेवून क्लबने उपलब्ध पर्यायांचा विचार केला. अशा वेळी क्लबची कार्यपद्धती आणि खेळाडूंची चांगली ओळख असलेली व्यक्ती गरजेची होती. मेरी लुईस आधीपासून क्लबशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांनी क्लबच्या १९ वर्षांखालील मुलांच्या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद समर्थपणे सांभाळले होते. नव्या हंगामात त्यांच्यावर यापूर्वीच क्लबच्या महिला संघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. म्हणूनच क्लबशी असलेले नाते आणि खेळाडूंशी असलेली जवळीक यामुळे क्लबने मेरी यांच्यावर क्लबच्या पुरुष संघाच्या हंगामी प्रशिक्षकाची जबाबदारी सोपविली.

मेरी लुईस यांना प्रशिक्षकपदाचा अनुभव किती?

मेरी लुईस यांनी वयाच्या २६व्या वर्षीत व्यावसायिक पुटबॉलमधून निवृत्ती घेतली. तेव्हाच त्यांनी प्रशिक्षक बनण्याचा निर्धार केला होता. वेर्डर ब्रेमेन क्लबच्या १५ वर्षांखालील मुलांच्या संघापासून त्यांनी आपल्या प्रशिक्षकाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर जर्मनीच्या विविध वयोगटासाठी मुलींच्या संघाचे सहायक प्रशिक्षक म्हणून काम केले. जर्मन फुटबॉल संघटनेच्या अकादमीतून त्यांनी प्रो कोचिंग कार्यक्रम पूर्ण केला आहे. युनियन क्लबच्याच १९ वर्षांखालील मुलांच्या संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे. त्यानंतर त्यांनी बुंडेसलिगामधील पहिल्या महिला सहायक प्रशिक्षक होण्याचा मान मिळविला. तत्कालीन प्रशिक्षक नेनाद बजेलिका यांच्या निलंबनामुळे २०२४ मध्ये त्यांनी डार्मस्टॅडविरुद्ध युनियन बर्लिन संघाचे नेतृत्व केले. हा सामना युनियन क्बने जिंकला. तेव्हा बुंडेसलीगामध्ये टचलाईनवरून संघ चालवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. आता त्यांच्यावर क्लबच्या पुरुष संघाची हंगामी जबाबदारी असली, तरी त्या नव्या हंगामात क्लबच्या महिला व्यावसायिक संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळणार आहेत.

फुटबॉलमध्ये सध्या महिला प्रशिक्षक किती आहेत?

फुटबॉलमध्ये मुळात प्रशिक्षक म्हणून महिलांची संख्या कमी आहे. अशा वेळी पुरुषांच्या व्यावसायिक फुटबॉलमध्ये मुख्य प्रशिक्षकपदी महिलांची निवड अपेक्षितच नाही. यानंतरही काही महिला प्रशिक्षक आहेत की ज्यांनी अशी जबाबदारी सांभाळली आहे. एप्रिल २०२६ पर्यंतच्या माहितीनुसार ही संख्या खूप कमी आहे. पुरुष आणि महिला दोन्ही संघांमधील एकूण प्रशिक्षकांमध्ये केवळ ५ टक्के महिला आहेत. शिखर संघटना फिफाने गेल्या वर्षी घेतलेल्या माहितीनुसार जगभरातील ८६ महिला लीगमध्ये २२ टक्के मुख्य प्रशिक्षक महिला आहेत. परंतु पुरुष संघांच्या बाबतीत हे प्रमाण अजूनही कमीच आहे.

महिला प्रशिक्षकांबाबत नियम आहेत का?

शिखर संघटना या नात्याने फिफा नेहमीच फुटबॉलच्या सर्व कोनातून विकास होण्याचा विचार करत असते. पुरुषांबरोबर महिलांमध्ये फुटबॉल रुजवल्यानंतर आता त्यांनी आपला मोहरा महिला प्रशिक्षकांकडे वळवला आहे. यासाठी फिफाने उच्च स्तरावर महिला प्रशिक्षकांची संख्या वाढवण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. त्यानुसार फिफाच्या महिला स्पर्धांमध्ये प्रत्येक संघाच्या तांत्रिक साहाय्यकांमध्ये किमान एक महिला प्रशिक्षक असणे अनिवार्य केले आहे. तसेच महिला प्रशिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण उपक्रम देखील फिफाकडून राबवले जातात. फिफाने २०२१ पासून ७९५ महिला प्रशिक्षकांना शिष्यवृत्ती देऊन प्रगत प्रशिक्षणासाठी पाठबळ दिले आहे.

यापूर्वी किती महिला पुरुष संघाच्या प्रशिक्षक?

मेरी लुईस एटा या युरोपमधील पहिल्या सर्वोत्तम पाच लीगमध्ये पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळणाऱ्या पहिल्या महिला प्रशिक्षक बनल्या आहेत. मात्र, यापूर्वीही काही महिलांनी ही जबाबदारी सांभाळली आहे. साब्रिना विटमॅन या जर्मनीमधील तृतीय श्रेणी फुटबॉलमध्ये खेळणाऱ्या एफसी इंगोलस्टॅड ४ या पुरुष व्यावसायिक संघाच्या पहिल्या मुख्य प्रशिक्षक आहेत. हॅना डिंगले यांनी २०२३ मध्ये इंग्लिश व्यावसायिक लीगमधील फॉरेस्ट ग्रीन रोव्हर्स या संघाच्या काळजीवाहू व्यवस्थापक (केअरटेकर) म्हणून पदभार स्वीकारला होता. कोरीन डियाक्रे यांनी २०१४ ते २०१७ या कालावधी फ्रान्सच्या क्लेरमोंट फूट या पुरुष व्यावसायिक संघाचे सलग तीन हंगाम प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. फैझा हैदर यांची २०२० मध्ये इजिप्तमधील आयडीयल गोल्डी फुटबॉल क्लब या व्यावसायिक पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली होती.

भारतात महिला प्रशिक्षक किती?

भारताची फुटबॉल विश्वातील ओळख फारच कमी असली, तरी भारतात अशा महिला प्रशिक्षक आहेत ज्यांनी स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. यामध्ये केरळच्या प्रिया पी. व्ही. यांचे नाव अग्रेसर असून, त्या भारतातील पहिल्या महिला अ श्रेणी दर्जा प्राप्त प्रशिक्षक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळम केरळ एफसी संघाने भारतीय महिला लीगचे विजेतेपद मिळविले आहे. मेमोल रॉकी या भारतीय वरिष्ठ महिला संघाच्या प्रशिक्षक म्हणून २०१७ ते २०२१ चार वर्षे काम पाहिले. सध्या त्या विविध तांत्रिक भूमिकांमध्ये सक्रिय आहेत. लंगम चाओबा देवी या २०२४ मध्ये भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक होत्या. माजी खेळाडू ओईनाम बेमबेम देवी सध्या प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. भारतीय फुटबॉल महासंघाच्या तांत्रिक समितीने मुख्य प्रशिक्षकपदी त्यांच्या नावाचाही विचार केला होता. थोडक्यात सांगायचे तर, भारतीय महिला फुटबॉलमध्ये प्रशिक्षक म्हणून महिलांचा सहभाग वाढत आहे, परंतु राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी भारतीय आणि परदेशी प्रशिक्षकांमध्ये सतत बदल होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.