Marital Rape Legal Analysis : ‘विवाहसंबंधात पतीकडून होणारा बलात्कार’ हा गुन्हा ठरविण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम ६३ मधील अपवाद क्रमांक २ (Exception 2)ला आव्हान देण्यात आलं आहे. याच तरतुदीचा संदर्भ यापूर्वी भारतीय दंड संहितेतील (IPC) कलम ३७५ मध्येदेखील होता. केंद्र सरकारने आपली भूमिका कायम ठेवत म्हटले आहे की, पतीकडून बलात्कार हा गुन्हा ठरवायचा की नाही, हा निर्णय संसदेच्या अधिकारक्षेत्रातील विषय आहे, न्यायालयाने कायद्यात हस्तक्षेप करून तो बदलू नये.

केंद्र सरकारची चिंता केवळ कायद्यातील या एका तरतुदीपुरती मर्यादित नाही. ‘विवाहसंबंधांत पतीकडून होणाऱ्या बलात्काराला’ गुन्ह्याच्या कक्षेखाली आणल्यास विवाहसंस्था, तक्रारींची चौकशी, पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रिया यावर काय परिणाम होईल, याचाही सरकार विचार करते, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

याचिकाकर्त्यांचा मुख्य आक्षेप असा आहे की, लग्न झाल्यानंतरही महिलेचे शरीर आणि लैंगिक संबंधांबाबतचा निर्णय यांवर तिचा अधिकार कायम राहायला हवा. त्यांच्या मते, वैवाहिक बलात्काराला गुन्ह्याच्या कक्षेबाहेर ठेवणारी ही तरतूद विवाहित महिलांच्या शारीरिक स्वायत्ततेवर (bodily autonomy) मर्यादा आणते.

विवाहसंस्थेची सामाजिक रचना कायम ठेवण्याचा सरकारचा युक्तिवाद

सरकारच्या भूमिकेचा मुख्य आधार असा आहे की, भारतातील विवाहसंस्थेला एक वेगळं सामाजिक आणि सांस्कृतिक स्थान आहे. त्यामुळे तिच्याकडे केवळ व्यक्तीच्या अधिकारांच्या दृष्टिकोनातून पाहता येणार नाही, असं सरकारचं म्हणणं आहे.

वैवाहिक हक्क आणि बलात्काराचा गुन्हा

केंद्र सरकारच्या मते, विवाहामुळे पती-पत्नीला एकमेकांशी संबंधित काही सामाजिक आणि नागरी हक्क मिळतात. अशा विवाहाच्या नात्यात बलात्कारासारखा गंभीर गुन्हा लागू केल्यास, ज्यासाठी दीर्घकाळ तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, त्याचा विवाहसंस्थेवर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बलात्कारासारख्या गुन्ह्याची नोंद झाल्यास समेटाला प्रोत्साहन मिळण्याऐवजी विवाहसंस्थाच पूर्णपणे तुटण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, असा सरकारचा युक्तिवाद आहे.

पाश्चात्त्य कायदे लागू करता येत नाहीत

केंद्र सरकारने दाखल केलेल्या अधिकृत प्रतिज्ञापत्रांमध्ये आणखी एक मुद्दा मांडला आहे. पाश्चात्त्य देशांमधील कायदेशीर पद्धती भारतात तशाच लागू करता येणार नाहीत. भारतातील कुटुंबव्यवस्था, आर्थिक परस्परावलंबित्व आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेणे गरजेचे आहे. या बाबी लक्षात घेऊनच कायदेशीर बदलांचा विचार करायला हवा, अशी सरकारची भूमिका आहे.

पुरावे सादर करण्यातील अडचणी आणि खोट्या खटल्यांची चिंता

कायदेतज्ज्ञ आणि सरकारच्या प्रतिनिधींच्या मते, वैवाहिक बलात्काराच्या प्रकरणांमध्ये पुरावे सादर करण्यास काही गंभीर अडचणी निर्माण होऊ शकतात. वैवाहिक नात्यात पतीकडून होणारा लैंगिक अत्याचार आणि अविवाहितेवर लैंगिक अत्याचार या दोन्ही गुन्ह्यांसंबंधी वेगळ्या तरतुदी आहेत, असंही तज्ज्ञ सांगतात.

चार भिंतींच्या आत संमती होती की नाही, हे कसं ठरवणार?
पती-पत्नी एकत्र राहत असताना लैंगिक संबंधांसाठी महिलेची संमती होती की नव्हती, हे न्यायालयात सिद्ध करणं मोठं आव्हान ठरू शकतं. त्यामुळे दोषसिद्धीचं प्रमाण कमी राहू शकतं किंवा प्रकरणांची न्यायालयीन लढाई दीर्घकाळ सुरू राहू शकते.

कायद्याच्या गैरवापराबाबतही चिंता
पती-पत्नीमधील वादातून एकमेकांविरोधात गंभीर आरोप केले जाऊ शकतात आणि त्यातून फौजदारी कारवाई सुरू होण्याची शक्यता असू शकते. अशा वेळी काही फौजदारी कायद्यांचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते. त्यासाठी घरगुती हिंसाचाराशी संबंधित कलम ४९८ए आणि हुंडाविरोधी कायद्यांचा दाखलाही दिला जातो. या कायद्यांचा गैरवापर होत असल्याचे आरोप यापूर्वी करण्यात आले आहेत.

केंद्राची भूमिका काय

सर्वोच्च न्यायालयाने पतीकडून होणाऱ्या बलात्काराबाबत कायद्यातील अपवाद रद्द करू नये, अशी स्पष्ट भूमिका केंद्र सरकारने मांडली आहे. अशा प्रकारचा कायदा किंवा सुधारणा करण्याचा अंतिम अधिकार न्यायालयाऐवजी संसदेकडेच असावा, असा केंद्र सरकारचा पवित्रा आहे.

सरकारच्या कायदा अधिकाऱ्यांच्या मते, बलात्कारासारखा गंभीर गुन्हा वैवाहिक नात्यातही लागू करण्यासाठी मोठा कायदेशीर बदल करावा लागेल. असा बदल करण्यापूर्वी देशभरातील संबंधित घटकांशी चर्चा, संसदेत सविस्तर चर्चा आणि कायद्याचा गैरवापर होऊ नये यासाठी योग्य तरतुदी करणे आवश्यक आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रकियेऐवजी संसदेत कायदा करून अशा सुधारित तरतुदी करण्यात याव्यात, असं सरकारचं म्हणणं आहे.

संसद भारतीय न्याय संहितेत बदल करण्याचा निर्णय घेत नाही, तोपर्यंत सध्याचे कायदेच पीडित पती-पत्नीला कायदेशीर मदत देण्यासाठी पुरेसे आहेत, असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. घरगुती हिंसाचार, छळ आणि शारीरिक मारहाणीविरोधात सध्याच्या कायद्यांमध्ये तरतुदी आहेत. त्यामुळे बलात्काराची सध्याची कायदेशीर व्याख्या बदलण्याची गरज नाही, अशी सरकारची भूमिका आहे.