डॉ. शशांक सामक आणि डॉ. जेसिका सामक
Workoholic, Marriage, Relationship and Sex:
महाभारतात युधिष्ठिराला यक्षाने विचारलेल्या प्रश्नांमध्ये एक प्रश्न होता : ‘देवाने पुरुषासाठी निर्माण केलेला उत्तम मित्र कोण?’ युधिष्ठिराने त्याचे उत्तर दिले होते : ‘त्याची बायको’. हजारो वर्षांपूर्वीच युधिष्ठिराने दिलेले हे उत्तर सध्याच्या काळातही मान्य करून जगल्यास पती-पत्नी नातेसंबंधांना मित्रत्वाचे परिमाण लाभेल, घटस्फोट घटून समाजस्वास्थ्य सुधारायलाही मदत होईल.

प्रेम- प्रेमभंग आणि लग्न समीकरण

प्रेम आणि प्रेमभंग यांचे नाते नाण्याच्या दोन बाजूंसारखे असते. प्रेम आणि विवाह हे जणू विरुद्धअर्थीच शब्द असल्यासारखा अनुभव बऱ्याच जणांना येत असतो. संपूर्ण आयुष्य ढवळून टाकणारा हा अनुभव असतो. परंतु प्रेम, प्रेमभंग आणि लग्न यांची समीकरणे जर नीट जाणून घ्यायची असतील तर या संज्ञांचे अर्थ व त्यांना खोली देणाऱ्या भावना नीट अभ्यासल्या पाहिजेत.

विरुद्धलिंगी आकर्षण हे शृंगारिक प्रेमच

प्रेम म्हणजे प्रेम असले तरी प्रत्येकाचे ते सेम नसते. वैद्यकीय दृष्टीने कुठलेही विरुद्धलिंगी आकर्षण हे शृंगारिक प्रेमच असते. कारण मेंदूमध्ये त्याची प्रक्रिया ही हायपोथॅलॅमस भागाशीच निगडित असते. इथेच सेक्सच्या आकर्षणाचे केंद्र असते आणि त्याचा संबंध ‘टेस्टोस्टेरॉन’ व ‘ऑक्सिटोसीन’ या हॉर्मोनशी असतो. अपेक्षापूर्ती ही तर गृहीत गोष्ट मानली जाऊन प्रेमपूर्तीचे साध्य प्रेमविवाह मानले जाते. पण बहुतेक जण जरी प्रेम करीत असले तरी त्यातील फारच कमी जणांच्या नशिबी अशी इच्छापूर्ती होत असते.

Love-marriage-relationship
प्रेम, विवाह आणि वैवाहिक जीवन यांचं नातं समजून घ्यायला हवं (Photo- AI)

प्रेमाची कला व शास्त्र

म्हणजेच प्रेम करणे सोपे, पण प्रेमविवाह करणे कठीण आणि तो टिकवणे तर महाकठीण. प्रेमाला वास्तववादाची जोड न दिल्याने आणि प्रेमविवाहाला आदर्शवादाची जोड दिल्यानेच अपेक्षा पूर्ण न होऊन प्रेमभंग व प्रेमविवाहभंग घडत असतो. वास्तवाचा चष्मा नसल्यानेच प्रेमाला आंधळे म्हटले गेले आहे. आणि रोमँटिकपणाचा गुलाबी चष्मा सतत न वापरल्यानेच प्रेमविवाह निभावणे कठीण वाटत असते. एखाद्या करण्याच्या क्रियेला कृती म्हटले जाते, आणि कुठलीही कृती समाधानकारक करण्यासाठी जी तत्त्वप्रणाली वापरली जाते त्याला कला म्हणतात. आणि कुठलीही कला शिकण्यासाठी जी नियमबद्ध पद्धत वापरतात तिला त्या कलेचे शास्त्र म्हणतात. प्रेम जर करण्याची गोष्ट असेल तर प्रेमाचीही कला व शास्त्र हे असू शकते. आणि शास्त्र हे तर विचार व अनुभव यांचे अपत्य असते.

सेक्स आणि रिलेशनशिप

सेक्स आणि रिलेशनशिप समस्यांना व्यवसाय रूपात अभ्यासून गेली तीस वर्षांपेक्षा जास्त काळ या क्षेत्रातील मिळालेला अनुभव व ज्ञान सूत्रबद्ध करून कित्येक दाम्पत्यांना त्यांचा वास्तविक जीवनातील वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये सहजपणे वापर करता येईल असे माझ्या लक्षात आले.

प्रेमसूत्रे जाणून घ्या

ही प्रेमसूत्रे जाणून घेतली तर तणावाच्या परिस्थितींवरही पती-पत्नींना मात करता येईल. त्यामुळे त्यांचे नाते दृढ होऊन समाज सुदृढ होण्यास मदतच होईल. अ‍ॅरेंज्ड मॅरेजला लवमॅरेज करण्यासाठी व लवमॅरेजला समृद्ध करण्यासाठी पती-पत्नी दाम्पत्यांनी प्रेमशास्त्राच्या पूर्वतयारीची तीन सूत्रे ध्यानात ठेवली पाहिजेत.

  • अ. उत्तिष्ठत जाग्रत : उठा, जागे व्हा. तुमच्यात पती-पत्नी नाते आहे याबद्दल जागरूक व्हा. धकाधकीच्या जीवनशैलीमुळे, नात्यातील तणावामुळे याकडे अजाणतेपणाने किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले असेल तर ‘पुनश्च हरिओम’साठी तयारी करा.
  • ब. ड्रॉप कर्टन मेथड : आजवरच्या दाम्पत्य जीवनातील त्रासदायक व निगेटिव्ह भूतकाळावर पडदा टाका. अगदी ‘लोखंडी’ पडदा. भूतकाळ बदलता येणार नाही. भूतकाळातील नुकसानकारक, दु:खदायक घटनांतून बोध घेऊन वर्तमानकाळ जगा नाहीतर भविष्यकाळ तुम्हाला माफ करणार नाही.
  • क. पॉझिटिव्ह नेक्स्ट स्टेप : यापुढील काळापासून दाम्पत्य जीवनात सकारात्मक, पॉझिटिव्ह राहा. वारंवार निगेटिव्ह भूतकाळात शिरून त्याचा उल्लेख करायचे टाळा.
  • पती-पत्नी नात्यामधील माधुर्य हे त्यांच्यातील मित्रत्वाच्या नात्यानेच फुलत असते. म्हणूनच पती-पत्नी नात्यातील मैत्रीची चार प्रेमसूत्रे आत्मसात करणे आवश्यक आहे.

जोडीदाराकडे लक्ष द्या

तसे बऱ्याचदा तुम्ही जोडीदाराकडे बारकाईने लक्ष ठेवून असताच, पण काळजीपूर्वक लक्ष द्यायला शिका. कारण तुम्ही जर तसे केले नाही तर दुसरा कोणीतरी टपलेलाच असतो हे जाणून घ्या. यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. तुमची जीवनाविषयीची मानसिकता बदलणे आणि तुमची वैवाहिक जीवनाविषयीची मानसिकता बदलणे. आयुष्यात आपण कष्ट घेत असतो ते उद्याचा दिवस आनंदात जावा म्हणून. पण जेव्हा तो उद्याचा दिवस उगवतो तेव्हा तो आनंदात न घालवता आपण पुन्हा एकदा कष्ट घ्यायला लागतो तो पुढचा ‘उद्या’ आनंदात जावा म्हणून! अशा व्यक्तींना आपण ‘वर्कोहोलिक’ म्हणतो.

वर्कोहोलिजम दांम्पत्य जीवनावर परिणाम करतो

‘वर्कोहोलिक’ हेही एक दाम्पत्य जीवनावर दुष्परिणाम करणारे व्यसनच असते. अशा व्यक्ती आपल्या जोडीदारापेक्षा आपल्या बॉसचाच चेहरा जास्त काळ बघण्यात वेळ घालवतात किंवा जोडीदाराबरोबर असतानाही त्यांचे ‘मोबाइल ऑफिस’ चालूच असते. जर हे वारंवार घडत असेल तर ते पती-पत्नी नातेसंबंधाला घातकच ठरते.

टार्गेट ओरिएंटेड… घातक

‘टार्गेट ओरिएंटेड’ आयुष्य जगणाऱ्यांनी लक्षात ठेवावे तुमची कंपनी तुमच्याशिवायही चालू राहत असते, पण तुमचे वैवाहिक जीवन नाही! माझ्या माहितीतील एक पस्तिशीतील मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह अशा ‘टार्गेट’ पूर्ण करण्याच्या धकाधकीच्या प्रयत्नांमध्ये हार्ट अ‍ॅटॅक येऊन वारला तेव्हा दुसऱ्या दिवशी त्याच्या कंपनीने त्याला दोन मिनिटांची श्रद्धांजली वाहून कामकाज पुढे सुरू केले, पण त्याची गरोदर पत्नी मात्र उद्ध्वस्त झाली होती.

दिवसाचे चार कप्पे

म्हणून दिवसाचे चार कप्पे करा. एक कप्पा स्वत:साठीचा, जो तुम्ही व्यायाम, छंद यासाठी वापरा. दुसरा कप्पा करिअरचा. तिसरा फॅमिलीसाठी आणि चौथा जोडीदारासाठीचा. यामध्ये कामजीवन, सहजीवन यासाठीचा वेळ तुम्ही काढू शकता. प्रत्येक कप्प्यासाठीचा वेळ हा कितीही कमी-जास्त ठरवू शकता. पण रोज हे चार कप्पे जगायचेच असे ठरवा. यामुळे तुम्ही धर्म, अर्थ व काम या तीनही जबाबदाऱ्या पार पाडू शकाल.

ग्रीड सायकॉलॉजी बदला…

आपल्याला हव्याहव्याशा वाटणाऱ्या गोष्टी नेहमीच एकतर महाग असतात, बेकायदेशीर असतात, आरोग्याला हानिकारक असतात नाहीतर दुसऱ्याशी लग्न झालेल्या असतात. वैवाहिक जीवनात मात्र ही हव्यास-मानसिकता, ग्रीड सायकॉलॉजी बदलणे समाधानी दाम्पत्य जीवनासाठी आवश्यक असते. कित्येकांना आपल्या जोडीदारापेक्षा इतरत्रच आकर्षण वाटत असल्याने वैवाहिक जीवनातील बंध कमजोर होत राहतात.

भेट- गुणांचा संबंध कामजीवनाशी असतो

छोट्या छोट्या रोमँटिक भेटवस्तूंनी वैवाहिक जीवनाचे आयुष्य वाढत असते. प्रत्येक रोमँटिक भेटवस्तूच्या भेट-गुणाची नोंद बायकोच्या मेंदूत होत असते हे नवऱ्याने लक्षात ठेवावे आणि आश्चर्य म्हणजे ती भेटवस्तू किती मोठी, किती महाग याचा संबंध न ठेवता तिच्याकडून प्रत्येकी एक भेट-गुण दिला जात असतो. म्हणजे एक गुलाब दिला तरी एक भेट-गुण व गुलाबांचा गुच्छ दिला तरी एकच गुण! दागदागिने, गाडी यांसारख्या भेटवस्तूंनीही प्रत्येकी एकाच भेट-गुणाची नोंद तिच्या मेंदूत होत असते. फक्त छोट्या भेटवस्तूपेक्षा अशा गोष्टीचा ‘परिणाम काळ’ हा जरा जास्त असतो इतकेच. नोंद केल्या गेलेल्या भेट-गुणांचा संबंध नंतरच्या कामजीवनाशी जोडला जातो हेही पुरुषाने लक्षात ठेवले पाहिजे.