भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स दोन सत्रात १,४०० अंशांहून अधिक घसरला. ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून अमेरिकेने जागतिक पातळीवर छेडलेल्या व्यापार युद्धाच्या धोक्यांमुळे, जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे आणि तिसऱ्या तिमाहीच्या निराशाजनक निकालांमुळे देशांतर्गत बाजारात विक्रीचा दबाव कायम आहे. मात्र बाजार का घसरत आहे, त्यामागील प्रमुख कारणे जाणून घेऊया

बाजारात किती घसरण?

देशांतर्गत भांडवली बाजारात सप्ताहाची सुरुवातच घसरणीने झाली. मंदीवाल्यांच्या उन्मादाने सलग दोन सत्रात सेन्सेक्सने सुमारे १,४०० अंश गमावले आहे. सेन्सेक्स पुन्हा एकदा ८२ हजारांच्या पातळीवर येऊन ठेपला. दुसरीकडे निफ्टी ५० ने २५,२०० अंशांची पातळी तोडली आणि इंट्राडे व्यवहारात २५,१७१.३५ पर्यंत खाली घसरला. इंडिया व्हीआयएक्स हा अस्थिरता निर्देशांक जवळपास ८ टक्क्यांनी वधारला, जो व्यापारी आणि गुंतवणूकदारांना नजीकच्या काळात बाजार अस्थिर राहण्याची अपेक्षा दर्शवतो. क्षेत्रीय पातळीवर गृहनिर्माण, ग्राहकोपयोगी वस्तू, माहिती तंत्रज्ञान, धातू, औषधी निर्माण निर्देशांक २ टक्क्यांनी घसरले. दोन सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे सुमारे १२ लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल शुक्रवारच्या जवळपास ४६८ लाख कोटी रुपयांवरून सुमारे ४५६ लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले.

व्यापारयुद्धाची भीती कितपत?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड खरीदण्याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे संकेत दिल्यानंतर, गुंतवणूकदार बदलत्या भू-राजकीय परिस्थितीबद्दल अधिकाधिक चिंतित दिसत आहेत. त्यांनी या कृतीला विरोध करणाऱ्या आठ युरोपीय देशांवर शुल्क लावण्याची धमकी दिली आहे. प्रत्युत्तरादाखल युरोपीय नेत्यांनी अमेरिकेच्या सक्तीविरोधात पर्यायांचा शोध सुरू केल्याचे बोलले जाते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, जर ट्रम्प यांनी १ फेब्रुवारी रोजी युरोपीय देशांवर १० टक्के शुल्क लावण्याच्या धमकीची अंमलबजावणी केली, तर युरोपियन युनियन १०८ अब्ज डॉलरच्या अमेरिकन वस्तूंवर शुल्क लावण्याचा विचार करण्याची शक्यता आहे. ग्रीनलँडवरून अमेरिका-युरोप यांच्यातील संघर्षाबाबत काही स्पष्टता येईपर्यंत बाजारातील अस्थिरता नजीकच्या काळात कायम राहण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूंनी भूमिका कठोर केल्यामुळे, ही अनिश्चितता काही काळ सुरू राहील, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनीतिकार व्ही.के. विजयकुमार म्हणाले.

सोने-चांदीकडे पैशांचा ओघ?

वाढलेल्या भू-राजकीय आणि भू-आर्थिक जोखमींमुळे समभाग संलग्न गुंतवणुकीकडील ओढा कमी करून सुरक्षित मालमत्तांकडे वळवला जात आहे. सोन्या-चांदीमधील विक्रमी तेजीमुळे गुंतवणूकदार समभागांमध्ये नफावसुली करून मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करत आहेत, जे भू-राजकीय अनिश्चितता, शुल्क युद्ध आणि अमेरिकेच्या फेडच्या व्याजदर कपातीच्या अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर आणखी वाढीसाठी सज्ज दिसत आहेत. यामुळे औद्योगिक मागणी असणाऱ्या चांदीने तर सोन्यापेक्षा अधिक भाव खाल्ला आहे. चांदीच्या किमतींने वायदे बाजारात ३.३५ लाखांचा नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे.

तिसऱ्या तिमाहीचे निकाल 

नवीन कामगार कायद्यांच्या एक-वेळच्या परिणामामुळे तिसऱ्या तिमाहीचे निकाल आतापर्यंत संमिश्र राहिले आहेत. तज्ज्ञांच्या मते, कमाईची आकडेवारी मोठ्या प्रमाणात स्थिर राहिली आहे. नवीन कामगार कायद्यांच्या माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी क्षेत्रातील  कंपन्यांच्या नफ्यावर सर्वाधिक परिणाम झाला आहे, ज्यामुळे भू-राजकीय चिंतांमुळे आधीच दबावाखाली असलेल्या बाजारात काही कंपन्यांचे सकारात्मक निकाल चैतन्यमय वातावरण राखू शकले नाहीत. मात्र वाहन निर्मिती अर्थात ऑटो कंपन्यांचे निकाल येऊ लागल्यावर ही परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे, कारण या क्षेत्राची तिसऱ्या तिमाहीत चांगली कामगिरी झाली आहे आणि या क्षेत्रात वाढीची गती कायम आहे हे दिलासादायक आहे.

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री

परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (एफआयआय) देशांतर्गत भांडवली बाजारात सातत्याने समभाग विक्री करत आहेत. भारत-अमेरिका व्यापार कराराबाबतची सततची अनिश्चितता, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आणि कमाई-मूल्यांकनातील विसंगती यामुळे त्यांनी जानेवारी महिन्यात आतापर्यंत रोख विभागात २९,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याचे समभाग विकले आहेत. शिवाय अनेक परदेशी गुंतवणूकदार जागतिक पातळीवरील घडामोडींचा अंदाज घेऊन गुंतवणुकीचा हात आखडता घेत आहेत. विद्यमान महिन्यात २ जानेवारीच्या किरकोळ खरेदीचा अपवाद वगळता, सलग १० व्या सत्रात निधीचे निर्गमन झाले आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या विक्रीमुळे प्रमुख निर्देशांकांवर दबाव वाढला आहे आणि खरेदीचा उत्साह मर्यादित राहिला आहे.

अर्थसंकल्पापूर्वी सावध 

येत्या १ फेब्रुवारीला रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पापूर्वी बाजारात गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. केंद्र सरकार आर्थिक वाढ, रोजगार निर्मिती आणि ग्राहकांची मागणी वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याची अपेक्षा आहे. एकीकडे सरकारी खर्चात सतत होणारी वाढ आणि दुसरीकडे वित्तीय तूट करण्याचे प्रयत्न यामध्ये संतुलन राखण्यासाठी केंद्र प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारकडून भांडवली खर्चात कपात होण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदार सावध आहेत.

दांडग्या डॉलरपुढे रुपयाची नांगी

धातू आयातदारांकडून डॉलरची जोरदार मागणी आणि परदेशी निधीचा सततचे निर्गमन यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण कायम आहे. मंगळवार, २० जानेवारी रोजी रुपया ९०.९७ च्या विक्रमी नीचांकी पातळीवर बंद झाला, ज्याने पुन्हा एकदा प्रति डॉलर ९१ रुपयांची पातळी ओलांडल्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेच्या विस्तारवादी धोरणांच्या नवीन संकेतांसह वाढलेल्या भू-राजकीय अनिश्चिततेमुळे जोखीम टाळण्याची प्रवृत्ती वाढली आहे आणि उदयोन्मुख बाजारपेठेतील चलनांवर दबाव कायम आहे. चिंतेत भर घालणारी बाब म्हणजे, बाजारातील अस्थिरतेचे मापक असलेला इंडिया व्हीआयएक्स निर्देशांक ८ टक्क्यांहून अधिक वाढून १२.७३ वर पोहोचला, जो गुंतवणूकदारांमध्ये वाढलेली भीती दर्शवतो.