नासाच्या ‘क्युरिऑसिटी रोव्हर’ या यानाने मंगळावरील एका दरीत प्रवेश करून तेथील भूभागाचे छायाचित्र जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेत पाठवले आहेत. हा भूभाग मधमाश्यांच्या पोळ्यासारखा दिसत आहे. हा प्रदेश नक्की काय आहे, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
मंगळावर मधमाश्यांच्या पोळ्यासारखा दिसणारा प्रदेश कुठे आहे?
नासाचे ‘क्युरिऑसिटी रोव्हर’ हे यान ‘व्हॅले ग्रांदे’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या मंगळावरील एका दरीतून वर चढत असताना त्याला मधमाश्यांच्या पोळ्यासारखा दिसणारा एक भूप्रदेश आढळला. रोव्हरने पाठवलेल्या प्रतिमांमध्ये जमीन मधमाशीच्या पोळ्यासारख्या नमुन्यांनी झाकलेली दिसत आहे. या प्रत्येक भेगेचा व्यास सुमारे १.५ ते ३ इंच (४ ते ८ सेंटिमीटर) आहे. ‘क्युरिऑसिटी रोव्हर’ यानाने यापूर्वीही समान भौमितिक आकारांचे छोटे समूह पाहिले होते, परंतु ते ‘व्हॅले ग्रांदे’मध्ये दिसणाऱ्या या क्षेत्राएवढे नव्हते.
मधमाश्यांच्या पोळ्यासारखा भूप्रदेश किती व्यापक आहे?
नासाच्या ‘क्युरिऑसिटी रोव्हर’ यानाने या मंगळावरील मोहिमेच्या ४,९३१ व्या दिवशी (१९ आणि २० जून) ३६०-अंश पॅनोरामामध्ये टिपलेल्या छायाचित्रात मधमाश्यांच्या पोळ्यासारख्या दिसणाऱ्या भूरचनेचा संपूर्ण विस्तार दिसतो. हे बहुभुजाकृती आकार सर्व दिशांना पसरलेले आहेत. हे आकार ‘मिराफ्लोरेस’ असे टोपणनाव असलेल्या टेकडीच्या उतारावरही दिसून आले. मधमाश्यांच्या पोळ्यासारखी दिसणारी ही रचना सभोवतालच्या भूभागापेक्षा २० फूट (६ मीटर) उंच आहे आणि तिच्यावर वाळूचा एक जाड थर आहे. दक्षिण कॅलिफोर्नियातील नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीचे या मोहिमेचे प्रकल्प शास्त्रज्ञ अश्विन वासवदा यांनी सांगितले की, क्युरिऑसिटी रोव्हर यानाने आतापर्यंत अनेक आकर्षक भूदृश्ये पाठविली आहेत. मात्र आताचे बहुभुजाकृती भूभागाचे दृश्य श्वास रोखून ठेवणारे आहे. वासवदा यांनी या भूभागाच्या आकाराचे आणि रासायनिक रचनेचे काळजीपूर्वक मोजमाप केले आहे. लवकरच भूभागावर मधमाश्यांच्या पोळ्याची रचना कशी तयार झाली याबद्दल माहिती मिळेल, अशी शक्यता वर्तवली आहे.
मधमाश्यांच्या पोळ्यासारखा भूप्रदेश कसा तयार झाला?
शास्त्रज्ञांच्या मते क्युरिऑसिटीने पूर्वी पाठवलेल्या भूभागांच्या छायाचित्रांमधील काही बहुभुजी रचना चिखलातील भेगांच्या स्वरूपातील होत्या. तथापि, अनेक प्रक्रियांद्वारे अशा प्रकारचा मधमाशीच्या पोळ्यासारखा भूभाग दिसू शकतो, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. वारंवार होणाऱ्या तापमानातील बदलामुळेही जमिनीवर भेगा पडू शकतात. अनेकदा पृष्ठभागाखाली असलेले पाणी भूगर्भातून बाहेर ढकलले गेल्याने, दाबामुळे देखील अशाच प्रकारच्या रचना तयार होऊ शकतात, असेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सध्या शास्त्रज्ञ वरीलपैकी कोणत्या प्रक्रियेने किंवा कोणत्या प्रक्रियांच्या संयोगाने मधमाशीच्या पोळ्यासारखा भूभाग तयार झाला, याचा अभ्यास करत आहेत.
चौदा वर्षांच्या प्रवासात ‘क्युरिऑसिटी रोव्हर’ला काय आढळले?
क्युरिऑसिटी रोव्हर यान १४ वर्षांपूर्वी म्हणजेच ५ ऑगस्ट २०१२ रोजी मंगळावर उतरले. तेव्हापासून या यानाचा मंगळावर प्रवास सुरू आहे. या प्रवासादरम्यान, यानाला मंगळावर गंधकाचे स्फटिक, परावर्तित होणारे उल्कापिंड आणि इतर अनेक असामान्य भूवैज्ञानिक वैशिष्ट्ये आढळली आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, क्युरिऑसिटी रोव्हर याने मंगळावर एकेकाळी पाणी, उपयुक्त रसायनशास्त्र आणि सूक्ष्मजीवांच्या जीवनाला आधार देऊ शकणारी पोषक तत्त्वे होती, हे दाखवून शास्त्रज्ञांच्या मते अब्जावधी वर्षांपूर्वी, मंगळावरील ‘माउंट शार्प’या डोंगराच्या पायथ्याशी तलाव आणि झरे विखुरलेले होते. माउंट शार्प हा ३ मैल (५ किलोमीटर) उंच पर्वत असून, क्युरिऑसिटी रोव्हर यान २०१४ पासून त्यावर चढाई करत आहे. या काळात अनेक रासायनिक खुणा यानाला सापडल्या आहेत, ज्यामध्ये कार्बन-आधारित रेणूंचा समावेश आहे. हे रेणू आनुवंशिक माहिती वाहून नेणाऱ्या आरएनए (RNA) आणि डीएनए (DNA) या दोन न्यूक्लिक आम्लांचे पूर्वसूचक असल्याचे मानले जाते. ते सेंद्रिय रेणू जैविक प्रक्रियेतून तयार झाले की भूवैज्ञानिक प्रक्रियेतून, हे शास्त्रज्ञ अद्याप निश्चित करू शकलेले नाहीत. दोन्ही स्पष्टीकरणे शक्य आहेत. असे असले तरी, या शोधाने पुन्हा एकदा पुष्टी केली की मंगळावर जीवसृष्टीला आधार देण्यासाठी आवश्यक असलेले रासायनिक घटक होते.
dharmesh.shinde@expressindia.com
