AI Doomsday In 2028 कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयमुळे मोठ्या प्रमाणात नोकरकपात होणार असल्याची चर्चा आहे. अशात एक नवे संशोधन समोर आले आहे, ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत आणि आयटी क्षेत्रात भीती पसरली आहे. ‘सिट्रीनी रिसर्च’ने द २०२८ ग्लोबल इंटेलिजन्स क्रायसिस या नावाने एक विश्लेषण प्रसिद्ध केले आहे.
हा अहवाल एक काल्पनिक वैचारिक प्रयोग असल्याचे सांगितले जात आहे. या अहवालात जून २०२८ पर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जागतिक अर्थव्यवस्थेत कशी अस्थिरता येऊ शकते, याचा वेध यात घेण्यात आला आहे. या अहवालातून नक्की काय समोर आले? २०२८ मध्ये मोठ्या नोकरकपातीची लाट येणार का? जाणून घेऊयात…
२०२८ मधील धोके
- घोस्ट जीडीपी : घोस्ट जीडीपी म्हणजे जिथे एआयमुळे उत्पादकता आणि कॉर्पोरेट नफा वाढतो; परंतु प्रत्यक्षात व्हाईट-कॉलर नोकऱ्या गेल्यामुळे घरगुती उत्पन्न आणि वेतनवाढ कोलमडते.
- इंटेलिजन्स डिस्प्लेसमेंट स्पायरल : इंटेलिजन्स डिस्प्लेसमेंट स्पायरल हे एक चक्र आहे, जिथे कंपन्या ऑटोमेशनद्वारे कर्मचाऱ्यांवरील खर्च कमी करतात. त्यामुळे ग्राहकांची खर्च करण्याची क्षमता कमी होते. परिणामी कंपन्यांना पुन्हा खर्चात कपात करावी लागते आणि एआयमध्ये अधिक गुंतवणूक करावी लागते.
- ‘सॉफ्टवेअर-एज-अ-सर्व्हिस’चा अंत : अहवालानुसार, एआय एजंट्स कंपन्यांना स्वतःचे सॉफ्टवेअर स्वतःच तयार करण्याची सुविधा देतील. त्यामुळे पारंपरिक ‘सॉफ्टवेअर-एज-अ-सर्व्हिस’ कंपन्यांचे उत्पन्न आणि व्यवसाय मॉडेल धोक्यात येईल.
- बाजारपेठेवर परिणाम : या अंदाजानुसार, ऑक्टोबर २०२६ च्या उच्चांकावरून S&P 500 स्टॉक्समध्ये ३८ टक्के घसरण होऊ शकते आणि २०२८ पर्यंत बेरोजगारीचा दर १०.२ टक्क्यांवर पोहोचू शकतो.
कोणत्या क्षेत्रांना सर्वाधिक धोका?
- भारतातील आयटी क्षेत्र : टीसीएस, इन्फोसिस व विप्रो यांसारख्या कंपन्यांसाठी हा काळ कठीण असेल. एआय कोडिंग एजंट्सचा खर्च कमी झाल्यामुळे या कंपन्यांची मोठी कंत्राटे रद्द होऊ शकतात.
- पेमेंट कंपन्यांना धोका: व्हिसा व मास्टरकार्ड यांसारख्या पेमेंट कंपन्यांना धोका आहे. कारण- एआय एजंट्स ‘स्टेबलकॉइन्स’सारख्या स्वस्त पर्यायांचा वापर करून पारंपरिक शुल्क टाळतील.
- प्रादेशिक लाभार्थी: अमेरिकन सॉफ्टवेअर क्षेत्रात मंदीची लाट असताना आशिया (विशेषतः कोरिया आणि तैवान) फायद्यात असण्याची शक्यता आहे. सॅमसंग, एसके हाइनिक्स व टीएसएमसी यांसारख्या हार्डवेअर पुरवठादार कंपन्यांमुळे या क्षेत्राचा दबदबा कायम राहील, असे या अहवालात सांगण्यात आले आहे.
एआय आणि नोकऱ्यांचे भविष्य
या अभ्यासात म्हटले आहे, “एआयने नवीन नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. त्यात प्रॉम्प्ट इंजिनीयर्स, एआय सुरक्षा संशोधक व पायाभूत सुविधा तंत्रज्ञ यांसारख्या नोकऱ्यांचा समावेश आहे. मात्र, एआयने निर्माण केलेल्या प्रत्येक नवीन भूमिकेसाठी कित्येक जुन्या नोकऱ्या मोडीत निघाल्या आहेत. नवीन नोकऱ्यांचा पगार जुन्या नोकऱ्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे.”
भारताबाबत हा अहवाल काय सांगतो?
एआयमुळे कोडिंग व्यवसायात बदल झाल्याने भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रावरील अवलंबित्व कमी होईल. २०२७ पर्यंत टीसीएस, इन्फोसिस व विप्रोच्या कंत्राट रद्दीकरणात वाढ होईल. तसेच, पुढील दोन वर्षांत रुपयाचे मूल्य आणखी घसरेल. “भारताच्या परकीय खात्यांना आधार देणारा सेवा क्षेत्रातील नफा संपुष्टात आल्याने चार महिन्यांत डॉलरच्या तुलनेत रुपया १८ टक्क्यांनी घसरला,” असे ‘सिट्रीनी रिसर्च’ने नमूद केले आहे.
संशोधन करणारी ही कंपनी कोणती?
वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, सिट्रीनी हा २०२३ मध्ये स्थापन झालेला एक छोटा संशोधन गट आहे. त्याचे संस्थापक जेम्स व्हॅन गीलेन आहेत. त्यांनी स्वतःची हेल्थकेअर कंपनी विकल्यानंतर स्टॉक रिसर्च लिहायला सुरुवात केली. या अहवालाचे सह-लेखक आलाप शाह आहेत. ते न्यूयॉर्कमधील लोटस टेक्नॉलॉजी मॅनेजमेंटमध्ये ‘लिटलबर्ड’चे मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतली असून, ते ‘सेंटिओ’ या एआय वर, आधारित आर्थिक शोध प्लॅटफॉर्मचे सह-संस्थापकदेखील होते.
अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, ही एक भविष्यवाणी नसून केवळ एक ‘केस स्टडी’ आहे. “हे जे काही पुढे मांडले आहे, ती एक केस स्टडी आहे; भविष्यवाणी नाही. एआयचा सध्याचा प्रसार असाच सुरू राहिला, तर काय घडू शकते, याचे हे एक मॉडेलिंग आहे,” असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर आयबीएमने २५ वर्षांतील आपला सर्वांत वाईट ट्रेडिंग दिवस अनुभवला. भारतीय आयटी शेअर्समध्ये मोठी विक्री झाली आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय रुपयावर दबाव निर्माण झाला.

