नेपाळ… जगातील सर्वोच्च शिखरांचा देश. दरवर्षी हजारो गिर्यारोहक आपल्या स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी एव्हरेस्ट, अन्नपूर्णा आणि मानसलू यांसारखी शिखरं सर करतात. पण याच बर्फाच्छादित शिखरांच्या सावलीत एक भयानक खेळ गेली तीन-चार वर्षे सुरू होता. पर्यटकांच्या जीवाशी खेळ करणारा सुमारे २ कोटी डॉलर्सचा (जवळपास १६५ कोटी रुपये) विमा घोटाळा आता उघडकीस आला आहे.

षडयंत्राची सुरुवात: अन्नातून विषप्रयोग

नेपाळ पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केल्यावर समोर आलेली माहिती अंगावर काटा आणणारी होती. २०२२ ते २०२५ या काळात नेपाळमधील ट्रेकिंग गाईड्स, काही खाजगी रुग्णालये आणि हेलिकॉप्टर कंपन्यांनी मिळून एक ‘सिंडिकेट’ तयार केले होते. या टोळीचे मुख्य लक्ष्य परदेशी गिर्यारोहक आणि त्यांच्या खिशातील विमा कवच होते.

हिमालयात चढाई करताना गिर्यारोहकांना ‘हाय-ॲल्टीट्यूड सिकनेस’ (उंचीमुळे होणारा त्रास) होणे तसे नेहमीचेच. या नैसर्गिक आजाराचा फायदा घेण्यासाठी या टोळीने एक क्रूर शक्कल लढवली. बेस कॅम्प्स आणि ‘टी-हाऊसेस’ (गिर्यारोहकांचे मुक्कामाचे ठिकाण) मधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने गिर्यारोहकांच्या जेवणात किंवा पिण्याच्या पाण्यात बेकिंग सोडा (सोडियम बायकार्बोनेट) मिसळण्यात आला.

बेकिंग सोड्याच्या अधिक वापरामुळे माणसाला मळमळणे, सतत उलट्या होणे, पोटात कळा येणे आणि निर्जलीकरण (Dehydration) होणे असे त्रास सुरू होतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ही सर्व लक्षणे ‘हाय-ॲल्टीट्यूड सिकनेस’शी तंतोतंत जुळतात. जेव्हा एखादा सुदृढ गिर्यारोहक अचानक अशा त्रासाने ग्रासला जातो, तेव्हा गाईड्स त्याला मृत्यूची भीती दाखवून “हे लक्षण प्राणघातक ठरू शकतं, आपल्याला लगेच खाली जावं लागेल,” असं सांगून गिर्यारोहकाला मानसिकदृष्ट्या हतबल करत होते.

बचावकार्याचा बनाव आणि हेलिकॉप्टरचे ‘भाडे’

एकदा गिर्यारोहक घाबरला की, या रॅकेटचा दुसरा टप्पा सुरू व्हायचा. तातडीने बचावकार्यासाठी (Rescue Operation) हेलिकॉप्टर बोलावले जायचे. वास्तविक, साध्या औषधोपचाराने बरा होऊ शकणारा माणूस मुद्दाम हेलिकॉप्टरने इस्पितळात हलवला जायचा. एकाच हेलिकॉप्टरमध्ये अनेक गिर्यारोहकांना बसवले जात असे, परंतु विमा कंपन्यांना बिले पाठवताना मात्र प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र उड्डाण केल्याचे भासवले जायचे. एका उड्डाणासाठी ३००० ते ५००० डॉलर्स इतकी मोठी रक्कम आकारली जात होती. एका हेलिकॉप्टरमध्ये पाच लोक असतील, तर ही टोळी एकाच फेरीतून २५,००० डॉलर्सपर्यंतची कमाई करत होती. या प्रवासाचा खर्च गिर्यारोहकाच्या खिशातून नाही, तर त्याच्या ट्रॅव्हल इन्शुरन्स कंपनीकडून वसूल केला जात असे.

रुग्णालयांचे ‘फेक’ अहवाल

या घोटाळ्यातील सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे काही खाजगी रुग्णालये त्यात सहभागी होती. तपासात स्वाकॉन आंतरराष्ट्रीय रुग्णालय, श्रीधी आंतरराष्ट्रीय रुग्णालय आणि एरा आंतरराष्ट्रीय रुग्णालय यांसारख्या मोठ्या संस्थांची नावे समोर आली आहेत. ही रुग्णालये गिर्यारोहकांच्या नावाने बनावट वैद्यकीय अहवाल तयार करत असत. ज्या व्यक्तीला फक्त बेकिंग सोड्यामुळे उलट्या होत होत्या, तिला गंभीर आजारी असल्याचे भासवून महागडे उपचार, चाचण्या आणि अनेक दिवसांचा रुग्णालयाचा खर्च दाखवला जात असे. ही सर्व बनावट बिले आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांकडे पाठवण्यात येत होती.

कमिशनची ‘साखळी’ आणि २० कोटींचा टप्पा

तपासातून निष्पन्न झाले की, ही लाचखोरीवर आधारलेली एक शिस्तबद्ध व्यवस्था होती. या लुटीच्या रकमेचे वाटप खालीलप्रमाणे होत असे:

१. ट्रेकिंग एजन्सीज् आणि हेलिकॉप्टर कंपन्या: २० ते २५ टक्के कमिशन.

२. रुग्णालये: उपचारांच्या बिलांमधील मोठा हिस्सा.

३. ट्रेकिंग गाईड्स: सर्वात महत्त्वाचा दुवा असलेल्या गाईड्सना विम्याच्या रकमेतून तब्बल २५ टक्के कमिशन दिले जात होते.

तपास अधिकाऱ्यांच्या मते, १९.६९ दशलक्ष डॉलर्सचे बनावट दावे करण्यात आले आहेत. यात एका ऑपरेटरने तर एकट्याने १० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त रकमेचा गंडा घातला आहे.

जागतिक स्तरावर नेपाळची बदनामी

या घोटाळ्यामुळे आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांनी आता नेपाळमधील ‘रेस्क्यू ऑपरेशन्स’वर संशय घेण्यास सुरुवात केली आहे. काही कंपन्यांनी तर नेपाळमधील गिर्यारोहकांसाठी विमा प्रीमियम वाढवण्याचे किंवा विमा नाकारण्याचे संकेत दिले आहेत. नेपाळच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला गिरिपर्यटन उद्योग या घोटाळ्यामुळे धोक्यात आला आहे. ज्या गाईड्सना गिर्यारोहक आपला ‘रक्षक’ मानतात, त्यांनीच केवळ पैशांच्या हव्यासापोटी गिर्यारोहकांच्या जिवाशी खेळ मांडला, ही या प्रकरणातील सर्वात क्लेशदायक बाब आहे. नेपाळ सरकार आता या दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी कायदे कडक करत असले, तरी हिमालयाच्या पवित्र शिखरांवर बसलेला हा भ्रष्टाचाराचा डाग पुसण्यासाठी बराच काळ जावा लागेल.

पर्यटकांनी आता नेपाळमध्ये जाताना केवळ हवामानाचीच नाही, तर आपल्या अन्नाची आणि स्वतःच्या गाईडचीही खात्री करून घेणे गरजेचे झाले आहे. हिमालयातील हा ‘पांढरा’ व्यवसाय आता बेकिंग सोड्याच्या ‘काळ्या’ छायेत अडकला आहे.