माथेरानच्या नगराध्यक्षांनी तलावातील गाळाचे कारण पूढे करत तुडूंब भरलेल्या शार्लोट तलावातील पाणी सोडून दिले. त्यामुळे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये सध्या पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. ऐन पावसाळ्यात माथेरान मध्ये पाणीबाणी का उद्भवली त्याचा थोडक्यात आढावा.
झाले काय?
माथेरानच्या गर्द हिरवाईत वसलेला शार्लोट तलाव हा केवळ निसर्गरम्य पर्यटन स्थळ नाही, तर तो गेल्या शतकभरापासून माथेरानच्या जलव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. पाण्याने तुटूंब भरलेल्या आणि ओसंडून वाहणाऱ्या या तलावातील पाणी सोमवारी अचानक सोडून देण्यात आले. त्यामुळे १२८ दशलक्ष लीटर पाणी वाहून गेले. ऐन पावसाळ्यात तलाव रिकामा झाला. याच तलावातून माथेरानला पाणीपूरवठा केला जात असल्याने, ऐन पावसाळ्यात माथेरानमध्ये पाणी समस्या निर्माण झाली आहे. परिणामी माथेरानकरांवर नेरळमधून येणाऱ्या विस्तारीत जलपुरवठा योजनेवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.
शार्लोट तलाव का महत्वाचा? तलावाची निर्मिती कधी झाली?
शार्लोट तलाव आजही माथेरानच्या जलपुरवठ्याचा मुख्य आधार मानला जातो. ब्रिटिशकाळात पाणी समस्या लक्षात घेऊन माथेरानमध्ये जलव्यवस्थापनासाठी या तलावाच्या उभारणीचा निर्णय घेण्यात आला. पिसारनाथ परिसरातील खोऱ्यात या तलावाची उभारणी करण्याची कल्पना १८५७ साली ब्रिटीश जनरल फुलर यांनी सुचवली होती. १८८० मध्ये तलावासाठी जागा निश्चित करण्यात आली आणि तलाव बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. जनरल फुलर यांच्या पत्नी शार्लोट फुलर यांच्या नावावरून तलावाला शार्लोट असे नाव देण्यात आले. तेव्हा पासून माथेरानला पाणी पुरवठा याच तलावातून केला जाऊ लागला. १९५० ते १९५६ या कालखंडात शार्लोट तलावाचा विस्तार केला गेला. मोठा बंधारा बांधण्यात आला. ज्यामुळे तलावाची साठवण क्षमता वाढली. आजही याच तलावातील पाणी माथेरानकरांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पुरवले जाते.
पाणी कोणी आणि का सोडले?
यंदा चांगला पाऊस झाल्याने माथेरानचा शार्लोट तलावर पूर्ण क्षमतेनी भरला होता. तलावात १२८ दशलक्ष लीटरहून अधिकचा पाणी साठा झाला होता. पावसाळ्याचा उत्तरार्ध सुरू झाला असतांनाच सोमवारी माथेरानचे शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी आणि इतर काही नगरसेवकांनी परस्पर तलावाचा दरवाजा उघडून दिला. तलावातील १२८ दशलक्ष लीटर पाणी खाली वाहून गेले. तलावातील गाळ काढण्यासाठी पाणी सोडून देण्यात आल्याचे चौधरी यांनी नंतर माध्यमांशी बोलतांना सांगीतले. गेली बारा वर्ष या तलावातील गाळ काढण्याची मागणी होत होती. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या अधिकारात हा निर्णय घेतल्याचा दावा चौधरी यांनी केला आहे.
नगराध्यक्षांना पाणी सोडण्याचा अधिकार असतो का?
नगराध्यक्षांच्या या निर्णयामुळे माथेरानकरांमध्ये आणि पर्यावरणवाद्यामध्ये संतापाचे वातावरण आहे. नगराध्यक्षांना पाणी सोडण्याचा अधिकार आहे का हा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. नगराध्यक्षांनी शहराच्या दृष्टीनो धोरणात्मक निर्णय घेणे अभिप्रेत असते, त्यानी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी ही नगरपरिषदेच्या प्रशासकीय यंत्रणांनी करायची असते. मात्र माथेरानचे मुख्याधिकारी सुट्टीवर असतांना नगराध्यक्षांनी परस्पर निर्णय घेऊन तलावातील पाणी सोडल्याचे सांगितले जात आहे. महत्वाची बाब म्हणजे अशा पद्धतीने पाणी सोडण्यास माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर आणि काही विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी विरोध दर्शवला होता.
आणखी एक महत्वाची बाब म्हणजे तलावातील पाणी सोडतांना पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाप्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे अपेक्षित होते. मात्र, अशी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी स्पष्ट केले. माथेरानच्या खालील गावांनाही पाणी सोडत असल्याची पूर्वसूचनाही दिली गेली नाही. जिल्हाधिकारी यांनी तातडीने तलावाचे दरवाजे बंद करण्याचे निर्देश देऊनही हे दरवाजे बंद करण्यात आले नाहीत.
पाणी सोडल्याचे परिणाम काय ?
शार्लोट तलावातील पाणी सोडून दिल्याने त्याचे माथेरानच्या दैनदिन व्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहेत. शहरात ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. पर्यटन व्यवसाय आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांच्या रोजगारालाही याची झळ बसण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात माथेरानला नेरळ येथून वाढीव पाणी पूरवठा केला जातो. तो पाणी पूरवठा पावसाळ्यांत बंद असतो. आता तलाव कोरडा झाल्याने पुन्हा एकदा नेरळ येथून येणाऱ्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ माथेरानकरांवर येणार आहे. हा पूरवठा न झाल्यास पाणी समस्य गंभीर होण्याची शक्यता आहे.
गाळ काढण्याचे काम का वादात सापडले?
शार्लोट तलावाच्या संवर्धनासाठी अमृत योजनेतून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली असून तलावातील गाळ काढून तो पांडे मैदानावर टाकणे अपेक्षित होते. मात्र अपेक्षित गाळ काढला जात नसल्याचा आक्षेप स्थानिकांनी घेतला होता. तशा तक्रारी केल्या गेल्या होत्या. त्यामुळे गाळ काढण्याचे काम वादात सापडले होते. त्यामुळे ठेकेदाराला वाचविण्यासाठी पाणी सोडून गाळ काढण्यात आल्याची चर्चा सूरू झाली आहे.
पाणी सोडणाऱ्यांवर कोणती कारवाई होऊ शकते?
प्रशासनाची परववानगी न घेता पाणी सोडल्याने, नगराध्यक्ष आणि नगर सेवकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई केली जाऊ शकते. माथेरानची देखरेख समिती या प्रकरणात हस्तक्षेप करून संबधितांवर कारवाईचे आदेश देऊ शकते. या शिवाय सत्ताधारी पदाधिकाऱ्यांवर अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते. मात्र जिल्हाधिकारी सत्ताधारी शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या नगराध्यक्ष नगरसेवकांवर कारवाई करणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
