Maulana Barkatullah: मध्य प्रदेशातील भोपाळमधील बरकतुल्ला विद्यापीठाचे नाव बदलून ‘वाग्देवी भोजपाल विद्यापीठ’ करण्याचा प्रस्ताव विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मंजूर केला आहे. भोपाळमधील विद्यापीठाला सध्याचे बरकतुल्ला विद्यापीठ हे नाव १९८८ मध्ये देण्यात आले होते. त्यापूर्वी विद्यापीठ ‘भोपाळ विद्यापीठ’ नावाने ओळखले जात होते. बरकतुल्ला विद्यापीठाला ज्यांचे नाव देण्यात आले होते, ते मौलाना बरकतुल्ला भोपाळी एक स्वातंत्र्यसैनिक होते. तसेच ते ‘स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान’ होते. बरकतुल्ला यांनी राजा महेंद्र प्रताप आणि काही सहकाऱ्यांबरोबर मिळून १९१५ मध्ये काबूल येथे भारताचे पहिले ‘निर्वासित सरकार’ (Government in Exile) स्थापन केले होते. निर्वासित सरकार म्हणजे अशी राजकीय संघटना किंवा गट, जो स्वतःला एखाद्या देशाचे कायदेशीर सरकार असल्याचा दावा करतो. परंतु, काही कारणांमुळे देशात राहू शकत नाही. परदेशातून काम करतो. मौलाना बरकतुल्ला भोपाळी हे ‘भारताचे पहिले पंतप्रधान’ कसे ठरले जाणून घेऊयात.

“मौलाना बरकतुल्ला यांनी आपले संपूर्ण आयुष्य परदेशात राहून भारताच्या स्वातंत्र्यासाठी काम करण्यात समर्पित केले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी जनजागृती निर्माण करणे आणि मित्रराष्ट्र जोडणे या उद्देशाने त्यांनी जपान, इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, रशिया, अफगाणिस्तान अशा अनेक देशांचा प्रवास केला. १९२७ मध्ये त्यांचे अमेरिकेत निधन झाले. बहुतेक याच कारणामुळे त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान भारतातील लोकांना त्यावेळी फारसे परिचित नव्हते. १९८८ मध्ये त्यांच्या मूळ गावी असलेल्या एका विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आले. दीर्घकाळानंतर त्यांना मान मिळाला होता”, असे नवी दिल्लीतील ‘भगतसिंग आर्काइव्हज अँड रिसोर्स सेंटर’चे सल्लागार आणि जेएनयूचे निवृत्त प्राध्यापक चमन लाल यांनी सांगितले. विद्यापीठाचे नाव बदलण्याऐवजी बरकतुल्ला यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत, असे चमन लाल म्हणाले.

मौलाना बरकतुल्ला यांचे विचार व धोरण

मौलाना बरकतुल्ला यांचा जन्म ७ जुलै १८५४ रोजी भोपाळमध्ये झाल्याचे मानले जाते. हुशार विद्यार्थी असल्याने ते शिक्षणासाठी प्रथम मुंबईला आणि नंतर लंडनला गेले. त्यानंतर त्यांनी लिव्हरपूलमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली. लिव्हरपूल येथे बरकतुल्ला हे भारतीय क्रांतिकारकांच्या संपर्कात आले. बरकतुल्ला हे त्यांच्या लेखांमुळे आणि भाषणांमुळे ब्रिटिश सरकारच्या रडारवर आले. त्यानंतर १८९९ मध्ये ते अमेरिकेला रवाना झाले. येथे त्यांनी स्वातंत्र्यसैनिक मौलाना हसरत मोहानी (ज्यांनी ‘इन्कलाब जिंदाबाद’ ही घोषणा दिली होती) यांच्याशी पत्रव्यवहार केला. या पत्रांवरून त्यांच्या विचारांची स्पष्ट कल्पना येते.

‘प्रोसीडिंग्ज ऑफ द इंडियन हिस्ट्री काँग्रेस’, खंड ६६ (२००५-२००६) मध्ये प्रसिद्ध झालेल्या इक्बाल हुसेन यांच्या एका लेखात या पत्रांपैकी एका पत्राचा हवाला देण्यात आला आहे. त्या पत्रात बरकतुल्ला यांनी लिहिले, “जवळपास २ कोटी लोक उपासमार आणि भुकेमुळे मृत्युमुखी पडले आहेत. हे गरिबीने त्रासलेले लोक हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे होते. केवळ भुकेमुळे संपूर्ण देश नष्ट झाला आहे.” हिंदू आणि मुस्लिमांनी खांद्याला खांदा लावून लढा दिला आणि ब्रिटिशांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीला प्रतिकार केला, तरच त्यांना भारतातून हाकलून लावता येईल, असा बरकतुल्ला यांचा ठाम विश्वास होता.

“बरकतुल्ला यांचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील सर्व समुदाय एकत्र आल्यावरच देशाला स्वातंत्र्य मिळू शकते यावर त्यांचा असलेला ठाम विश्वास. त्यांनी हिंदू, मुस्लिम, शीख आणि प्रत्येक भागातील लोकांसोबत मिळून एकत्र काम केले”, असे ‘इंडियन हिस्ट्री काँग्रेस’चे सचिव आणि अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचे (AMU) इतिहासाचे प्राध्यापक अली नदीम रेझवी यांनी सांगितले.

बरकतुल्ला ‘भारताचे पहिले पंतप्रधान’ कसे ठरले?

१९१५ मध्ये काबूल येथे स्थापन झालेले भारताचे निर्वासित सरकार हे याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. बरकतुल्ला यांनी एका हिंदू घराण्यातील राजे राजा महेंद्र प्रताप आणि एक इस्लामिक विचारवंत मौलाना उबैदुल्ला सिंधी यांच्यासोबत मिळून परदेशात हे निर्वासित सरकार स्थापन केले होते. त्यात राजा महेंद्र प्रताप हे राष्ट्रपती झाले आणि बरकतउल्ला हे पंतप्रधान झाले. ब्रिटिशांच्या नियंत्रणाबाहेर भारतीयांनी स्वतःची स्वतंत्र राजकीय संस्था स्थापन करण्याची ही पहिलीच वेळ होती. दरम्यान, ब्रिटिशांना आव्हान देणारी ही घडामोड महत्त्वाची होती. तसेच देशात वेगवेगळ्या धर्माचे लोक एका समान ध्येयासाठी खांद्याला खांदा लावून लढल्याचेही प्रतिक होती. हातरसचे राजे असलेल्या महेंद्र प्रताप यांनी ‘अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी’च्या (AMU) स्थापनेसाठी मोठे परिश्रम घेतले होते आणि या कॉलेजसाठी जमीनही दान दिली होती.

काबूलमध्ये सरकार, लेनिनबरोबर बैठक

पहिल्या महायुद्धादरम्यान बरकतुल्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी जर्मनीचा दौरा केला. जर्मन सैनिकांनी पकडलेल्या भारतीय सैनिकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी सैन्य तयार करण्यास त्यांनी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. १९१३ मध्ये लाला हरदयाल यांनी स्थापन केलेल्या ‘गदर पार्टी’साठीही बरकतुल्ला यांनी काम केले. लाला हर दयाल यांना सशस्त्र लढा उभारून भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे होते.

त्यानंतर १ डिसेंबर १९१५ रोजी काबूलमध्ये ‘भारताचे निर्वासित सरकार’ स्थापन करण्यात आले. चार वर्षांनंतर या सरकारमधील नेत्यांनी सोव्हिएत रशियामधील सरकारचे प्रमुख व्लादिमीर लेनिन यांची भेट घेण्यासाठी मॉस्कोचा दौरा केला. रशियामध्ये बरकतुल्ला म्हणाले, “मी कम्युनिस्ट नाही आणि सोशलिस्ट (समाजवादी) देखील नाही, परंतु, ब्रिटिशांना आशियातून हाकलणे हे माझ्या राजकीय उद्दीष्टांमध्ये समाविष्ट आहे. युरोपद्वारे आशियाचे जे भांडवलीकरण केले जात आहे, त्याचा मी कट्टर विरोधक आहे. या बाबतीत मी कम्युनिस्टांच्या जवळ जाणारा आहे आणि या दृष्टीने आपण नैसर्गिक मित्र आहोत.” बरकतुल्ला यांच्या या भाषणाचा उल्लेख ‘इंडियन हिस्ट्री काँग्रेस’च्या जर्नलमध्ये आढळतो. पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांचा विजय झाल्यानंतर भारतीय क्रांतिकारकांच्या पुढील नियोजनाला मोठा धक्का बसला होता. असे असूनही बरकतुल्ला यांनी आपल्या ध्येयासाठी काम करत ब्रुसेल्स, स्वित्झर्लंड, फ्रान्स इत्यादी देशांचा प्रवास सुरूच ठेवला होता.

“देशात वास्तव्य करून लढा देणाऱ्या इतर अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या उलट बरकतुल्ला यांनी आयुष्यातील बहुतांश काळ परदेशात घालवला. त्यांनी जगभरातील वसाहतवादविरोधी चळवळींशी संपर्क साधला आणि ते त्यांच्या काळातील सर्वात प्रख्यात भारतीय क्रांतिकारकांपैकी एक बनले. बरकतुल्ला यांनी मुस्लिम जगातील विरोधकांच्या चळवळींपासून प्रेरणा घेतली होती. ‘न्याय’ हे एक जागतिक उद्दिष्ट असून भारताचे स्वातंत्र्य हा त्याच मोठ्या लढ्याचा एक भाग आहे, असा त्यांचा ठाम विश्वास होता”, असे रेझवी यांनी सांगितले.

कॅलिफोर्नियात निधन

१९२७ मध्ये प्रकृती खालावलेली असतानाही बरकतुल्ला हे गदर पार्टीच्या एका कार्यक्रमासाठी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे गेले होते. कॅलिफोर्नियातच सप्टेंबर, १९२७ मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजा महेंद्र प्रताप शेवटपर्यंत त्यांच्या सोबत होते. केंद्र सरकार राजा महेंद्र प्रताप यांचा वारसा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सध्या प्रयत्न करत आहे. राजा महेंद्र प्रताप यांचे जवळचे सहकारी असलेले बरकतुल्ला यांनाही तसाच सन्मान मिळायला हवा, अशी भावना रेझवी आणि चमन लाल या दोघांनीही व्यक्त केली आहे.