इंडिया व्हीआयएक्स इंडेक्स म्हणजे काय?
इंडिया व्हीआयएक्स हा भांडवली बाजारातील अस्थिरता मोजणारा निर्देशांक आहे, जो राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईद्वारे गणला जातो. निर्देशांकाचा उपयोग नजीकच्या कालावधीतील अस्थिरता आणि बाजारातील चढ-उतारांसाठी शक्यता मोजण्यासाठी केला जाते. हा निर्देशांक एनएसईने प्रथम वर्ष २००३ मध्ये सादर केला होता. मात्र, अस्थिरता दर्शवण्याऱ्या या निर्देशांकाची मूळ संकल्पना वर्ष १९९३ पूर्वीची आहे, जी शिकागो बोर्ड ऑप्शन्स एक्सचेंजने सादर केली होती. जेव्हा बाजारात सतत चढ-उतार होत असतात आणि शेअर वर-खाली होत असतो, तेव्हा त्यानुसार या निर्देशांकात मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहू शकतो. त्याचप्रमाणे, जेव्हा बाजार अधिक स्थिर असतो तेव्हा व्हीआयएक्स निर्देशांक उच्चांकी पातळीवर असतो आणि स्थैर्य कमी असते, तेव्हा व्हीआयएक्स निर्देशांकात घसरण होते. हा निर्देशांक नजीकच्या कालावधीतील म्हणजेच पुढील ३० दिवसांमध्ये बाजाराबद्दल गुंतवणूकदारांची धारणा दर्शवतो.
इंडिया व्हीआयएक्स कसा मोजला जातो?
इंडिया व्हीआयएक्स निर्देशांकातील वाढ आणि घसरण बाजाराची अस्थिरता ठरवते. गुंतवणूकदारांना त्यांनी बाजारात आगामी मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा त्यांनी पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा मागोवा घेण्यास आणि बाजारातील परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतो. इंडिया व्हीआयएक्स निर्देशांक हा निफ्टी निर्देशांकाप्रमाणे नाही. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, निफ्टी हा त्यात सहभागी असलेल्या कंपन्यांच्या किमतीवरून गणला जातो, तर अस्थिर निर्देशांक म्हणजेच इंडिया व्हीआयएक्स हा लोकप्रिय ‘ब्लॅक अँड स्कोल्स’ मॉडेलवर आधारित आहे. हा निर्देशांक पाच अचल घटक म्हणजेच व्हेरिएबल्सवर, ज्यात स्ट्राइक किंमत, शेअरचा बाजारभाव (स्पॉट प्राईस), करार मुदत समाप्ती, जोखीम मुक्त दर आणि अस्थिरता यावर अवलंबून आहे. व्हीआयएक्स मूल्याचा अस्थिरतेशी थेट संबंध आहे. याचे मूल्य जितके जास्त असेल तितकी अस्थिरता जास्त असते. तर, मूल्य कमी असल्यास बाजारातील अस्थिरता कमी होईल असे समजले जाते.
भारतीय शेअर बाजारात अतीव अस्थिरताच?
व्हीआयएक्स निर्देशांक सध्या १३.२२ वर आहे आणि वरचा अडथळा पार केल्यावर तो लवकरच २० गुणांकावर पोहोचू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या दोन सत्रात तो १२ टक्क्यांनी वधारला आहे. विद्यमान आठवड्यात सलग तीन सत्रांत शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले. इंडिया निर्देशांक सध्या १४.४३ गुणांकापर्यंत वधारला आहे. बाजार विश्लेषकांच्या मते, त्याचा वरच्या दिशेने प्रवास सुरू राहणार आहे. म्हणजे येत्या महिन्याभरात बाजारातील अस्थिरता आणखी वाढण्याची शक्यता आहे. भू-राजकीय तणाव देखील शेअर बाजारावर भार टाकत राहिला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड ताब्यात घेण्याबाबत आणि युरोपियन युनियनविरुद्धच्या आयात शुल्क वाढीबाबत कारवाई पुन्हा सुरू करण्याबाबत केलेल्या विधानांनंतर जागतिक व्यापारात पुन्हा व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे जगभरातील भांडवली बाजारात चिंतेचे वातावरण आहे आणि हेच व्हीआयएक्सच्या वाढीला सध्या चालना देणारे सध्याचे प्राथमिक घटक आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात तो २० गुणांकावर पोहोचण्याची दाट शक्यता आहे.
अस्थिरता वाढीची कारणे काय?
ट्रम्प यांच्या ग्रीनलँड धोरणामुळे, आठ युरोपीय देशांवर लादलेल्या धोक्याच्या आयात शुल्कामुळे आणि युरोपच्या ट्रम्पविरोधी भूमिकेमुळे जागतिक बाजारपेठेत आता जोखीममुक्तीची भावना निर्माण झाली आहे. ही परिस्थिती नेमक्या कोणत्या बाजूने पुढे सरकते या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर जागतिक शेअर बाजारदेखील कमकुवत झाले आहेत आणि गुंतवणूकदार सुरक्षित-आश्रयस्थान असलेल्या सोने-चांदी यांसारख्या मालमत्तेकडे वळले आहेत. आता सर्व घडामोडींचा
बाजारावर काय परिणाम होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय परदेशी गुंतवणूकदारांनीदेखील भांडवली बाजारात समभाग विक्रीचा सपाटा सुरूच ठेवला आहे. व्हीआयएक्स निर्देशांक पुन्हा १० गुणांक पातळीच्या खाली सरकण्यात अयशस्वी झाल्यास बाजारात समभाग विक्रीचा अधिक दबाव दिसून येईल. परिणामी बाजारात मूळ मुद्दल बचतीकडे सर्वांचे लक्ष असेल.
आकडेवारी काय सांगते?
इंडिया व्हीआयएक्स निर्देशांकात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. तो गुणांक सध्या १३ ते १५ या श्रेणीत आहे. देशात लोकसभा निवडणुकीच्या काळात देखील तो १७ वर पोहोचला होता. व्हीआयएक्समध्ये सध्या आणखी वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र इंडिया व्हीआयएक्सने याआधी २०१४ मध्ये ३९.९० गुणांकाचा उच्चांक गाठला होता. तर २०१९ मध्ये ३० गुणांकावर पोहोचला होता. वर्ष २००८ मध्ये ज्यावेळी शेअर बाजार कोसळला होता त्यावेळी भारताचा व्हीआयएक्स ९२ च्या पातळीवर गेला होता, तर २०२० मध्ये करोना महासाथीचा उद्रेक झाल्यानंतर तो ८६.६३ च्या शिखरावर पोहोचला. आता मात्र अजूनही तो १५ च्या आतल्या मर्यादित पातळीत मार्गक्रमण करत आहे.
रुपया नीचांकी तळाला
डॉलरची सततची मागणी आणि सावध जागतिक भावना यामुळे रुपया बुधवारच्या सत्रात ३१ पैशांनी घसरून ९१.२८ या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला. वाढती भू-राजकीय अनिश्चितता आणि देशांतर्गत शेअर बाजारांमधून सतत होणाऱ्या परकीय भांडवलाच्या निर्गमनामुळे उदयोन्मुख बाजारातील चलनांवर दबाव निर्माण झाला आहे, असे फॉरेक्स व्यापाऱ्यांनी सांगितले. आंतरबँक परकीय चलन बाजारात, रुपयाने ९१.०५ पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली आणि ९१.२८ या नीचांकी पातळीवर जाऊन पोहोचला त्यात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.
जागतिक घटनांचा देशांतर्गत परिणाम
देशांतर्गत आघाडीवर बाजार घसरणीचे नेतृत्व बँक निफ्टीने केले, परिणामी त्याने एकंदर निफ्टीला खाली खेचले. अमेरिकी डॉलर इंडेक्स वधारला, ज्यामुळे भारतासह उदयोन्मुख बाजारपेठांवर दबाव आला आणि परदेशी गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले. मजबूत डॉलरसह बुलियन म्हणजेच सोने आणि तेल आणि ऊर्जेशी निगडित कमॉडिटीचे भाव वधारले. म्हणजेच गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातून दुसऱ्या गुंतवणूक साधनांमध्ये पैसा वळवण्यास सुरुवात केली आहे. गुंतवणुकीमध्ये विविधता आणत ते उच्च परतावा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयादेखील घसरला आहे, त्याचादेखील भांडवली बाजारावर दबाव दिसून येतो आहे. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजारभांडवल कमी झाले आहे. सोने आणि चांदीने नवीन उच्चांक गाठले आहेत. खनिज तेलाचे भावदेखील आता वाढत आहेत.
