Meerut snakebite murder case reveals shocking conspiracy involving poisonous Common Krait snake: उत्तर प्रदेशातील मेरठ झालेला अतुल पन्वरचा मृत्यू केवळ सर्पदंशाने झालेला असावा, असे पोलिसांना सुरुवातीस वाटले खरे. पण नंतर तपासात समोर आलेल्या धक्कादायक माहितीमुळे हे प्रकरण देशभर चर्चेचा विषय ठरले. प्रेमविवाहाचा शेवट विषारी सापाच्या दंशाने झाला, पण तो घडवून आणलेला मृत्यू होता, त्यासाठी झोपेच्या गोळ्यांचाही वापर झाला आणि नजर होती ती २० लाख रुपयांच्या जीवनविमा पॉलिसीवर. हे सारे ‘ती’ने घडवून आणले ते प्रियकराच्या साथीने. महाराष्ट्रात झालेल्या सिंहगड प्रकरणानंतर आता हेही प्रकरण देशभर चर्चेत आहे.
नेमके घडले काय?
मेरठ जिल्ह्यातील हस्तिनापूर परिसरात राहणारे अतुल पन्वर (वय ३५) आणि दामिनी (वय ३०) यांनी २०१९ मध्ये प्रेमविवाह केला होता, त्यांना सहा वर्षांचा मुलगाही आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी खासगी शाळा सुरू करून आयुष्याची नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र १८ जुलैच्या सकाळी अतुल आपल्या घरात मृतावस्थेत आढळला. त्याच्या पत्नीने शेजाऱ्यांना सांगितले की, रात्री झोपेत असताना विषारी सापाने त्याला दंश केला. घरात साप होता, हेही काही शेजाऱ्यांनी पाहिले. त्यामुळे सर्पदंशामुळे अपघाती मृत्यू अशी या प्रकरणाची नोंद पोलिसांनीही केली. मात्र, अतुलच्या वडिलांनी मुलाच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत शवविच्छेदनाची मागणी केली आणि यानंतर तपासाची दिशा पूर्णपणे बदलली.
तपासात काय समोर आले?
पोलीस तपासादरम्यान कॉल रेकॉर्ड, मोबाईल लोकेशन यांची जुळवाजुळव करत पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. या तपासात शाळेतील गाडी चालक तुषार उर्फ निक्की दामिनीशी सातत्याने संपर्कात होता, असे पोलिसांना लक्षात आले. यानंतर अधिकच्या चौकशीत दामिनी कोसळली आणि तिने गुन्ह्याची कबुली देत तुषारच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचल्याचे सांगितले. या प्रकरणात तुषारसह सोनू आणि उदय कुमार या साप पकडणाऱ्यां दोघांनाही अटक करण्यात आली.

पोलिसांचा दावा काय?
पोलिसांनी न्यायालयासमोर सादर केलेल्या प्राथमिक तपासानुसार, घटनेच्या आदल्या रात्री दामिनीने अतुलच्या दुधात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. गाढ झोपल्यानंतर तिने तुषारला घरी बोलावले. साप पकडणाऱ्या दोघांना घेऊन तुषार तिच्या घरी आला, तेव्हा त्यांच्याकडे विषारी साप होता. पलंगावर सोडलेल्या सापाने अतुलला दंश केला. मृतदेहाशेजारीच साप असल्याने अकस्मात मृत्यूचे चित्र पाहाणाऱ्यांच्या नजरेसमोर उभे राहिले. त्यात शंका येण्यासारखे काहीही नव्हते. योजना ठरल्याबरहुकूम वठलेली होती.
या कटामागील हेतू?
पोलीस तपासानुसार, दामिनी आणि तुषार यांच्यामध्ये विवाहबाह्य प्रेमसंबंध होते आणि अतुलचा काटा काढण्यासाठी त्यांनी खून घडवून आणला. शिवाय अतुलच्या नावावरील सुमारे २० लाख रुपयांची जीवनविमा पॉलिसी होती, ते पैसेही मिळवण्याचा हेतू या हत्येमागे होता. विम्याची रक्कम मिळाल्यानंतर त्यातील पाच लाख रुपये साप पुरविणाऱ्या दोघांना देण्याचे ठरले होते. त्यासाठी त्यांना १५ हजार रुपये आगाऊ देण्यात आले होते.
यापूर्वीही हत्येचा प्रयत्न?
महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी एक धक्कादायक दावा केला आहे. पुण्यातील गाजलेल्या सिंहगड प्रकरणाप्रमाणेत या घटनेच्या आधीही अतुलची हत्या करण्याचा एक प्रयत्न झाला होता. मृत्यूच्या सुमारे २० दिवस आधी तुषारने अतुलच्या मोटारसायकलला कारची धडक देऊन अपघात घडवून आणला होता. खरे तर तो हत्येचाच कट होता. मात्र, अतुलने हेल्मेट घातल्यामुळे त्याचा जीव वाचला. अपघातानंतर दामिनीने तक्रार करू नकोस, असे म्हणत अतुलला पोलिसांकडे जाण्यापासून रोखले होते.
विषारी कॉमन क्रेट
अतुलला मारण्यासाठी कॉमन क्रेट (Common Krait- Bungarus caeruleus) या विषारी सापाचा वापर करण्यात आला. भारतात आढळणाऱ्या चार सर्वाधिक विषारी सापांमध्ये त्याचा समावेश होतो. इतर तीन विषारी सापांमध्ये नाग (Indian Cobra), रसेल वायपर आणि सॉ-स्केल्ड वायपर यांचा समावेश होतो. कॉमन क्रेट प्रामुख्याने रात्री सक्रिय असतो. त्याचा दंश अनेकदा वेदनारहित असल्यामुळे सुरुवातीला रुग्णाला काहीच लक्षात येत नाही. मात्र त्याचे न्यूरोटॉक्सिक विष मज्जासंस्थेवर परिणाम करते.
कॉमन क्रेटच्या दंशाची लक्षणे
- पापण्या सतत मिटणे
- बोलताना अडखळणे, त्रास होणे
- गिळताना त्रास
- श्वास घेण्यास अडथळा
- संपूर्ण शरीरात पक्षाघात
सर्पदंशावरील लस अँटी-स्नेक व्हेनम (ASV) वेळीच मिळाली नाही किंवा कृत्रिम श्वसनाची सुविधा लगेचच उपलब्ध झाली नाही तर प्रसंगी मृत्यू होऊ शकतो.
भारतात सर्पदंशामुळे किती मृत्यू होतात?
भारतात दरवर्षी जगातील सर्वाधिक सर्पदंशाच्या घटना घडतात. The Lancet मध्ये प्रसिद्ध झालेल्या Million Death Study नुसार, भारतात दरवर्षी सुमारे ५८ हजार लोकांचा मृत्यू सर्पदंशामुळे होतो. यापैकी बहुतांश मृत्यू ग्रामीण भागात होतात. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सर्पदंशाला Neglected Tropical Disease म्हणून घोषित केले आहे.
सापाचा वापर करून खून करणे किती दुर्मीळ?
भारतात सापाचा वापर करून खून झाल्याचे आरोप यापूर्वीही समोर आले आहेत. सर्वाधिक चर्चेत आलेले उदाहरण म्हणजे केरळमधील उथरा हत्या प्रकरण. २०२० साली पती सूरजने पत्नीच्या हत्येसाठी नाग व इतर विषारी सापांचा वापर केला. त्याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप न्यायालयात सिद्ध झाले आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यावेळेसही सापाचा वापर करून हत्या करण्याच्या शक्यतेबाबत देशभर चर्चा झाली होती. मात्र, मेरठमधील प्रकरणाचे स्वरूप वेगळे आहे. इथे पोलिसांच्या मते, कॉमन क्रेटचा वापर करून मृत्यू अपघाती असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
न्यायालयीन प्रक्रिया काय असेल?
या प्रकरणात पोलिसांनी केलेले सर्व दावे अद्याप आरोपांच्या स्वरूपात आहेत. न्यायालयात पुरावे, फोरेन्सिक अहवाल, शवविच्छेदन अहवाल, विषतज्ज्ञांचे मत, मोबाईल डेटा आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे अंतिम निर्णय होईल.
अलीकडे वाढलेल्या घटनांमुळे अधिक चर्चा
मेरठमधील प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडालेली असली, तरी प्रेमसंबंध, आर्थिक स्वार्थ किंवा वैवाहिक वादातून पतीच्या हत्येचे कथित कट रचल्याची ही काही पहिलीच घटना नाही. गेल्या काही वर्षांत अशा स्वरूपाची काही गाजलेली प्रकरणे समोर आली आहेत. प्रत्येक प्रकरणाची पार्श्वभूमी वेगळी असली, तरी त्यामध्ये विवाहबाह्य संबंध, आर्थिक हितसंबंध, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आणि तपासात डिजिटल तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका असे काही समान धागे दिसून येतात.
सिंहगड हत्या प्रकरण
महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चा झाली ती पुण्यातील सिंहगड हत्या प्रकरणानंतर. या प्रकरणात कथित प्रियकराच्या मदतीने भावी पतीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. सुरुवातीस बेपत्ता सांगून आणि नंतर अपघाती मृत्यूचा कट रचण्यात आला. मात्र तपास जसजसा पुढे सरकत गेला, तसतसे मोबाईल फोनचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), लोकेशन डेटा, सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित व्यक्तींच्या जबाबांमधून कट उघडकीस आला. या प्रकरणाने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडवली. कारण आरोपींनी गुन्हा लपविण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. तपासात डिजिटल पुरावे किती निर्णायक ठरू शकतात, याचे हे महत्त्वाचे उदाहरण मानले जाते. या प्रकरणातील आरोपांवर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.
राजा रघुवंशी हत्या प्रकरण
यावर्षी देशभर चर्चेत आलेले आणखी एक प्रकरण म्हणजे इंदूरमधील राजा रघुवंशी हत्या प्रकरण. हनिमूनसाठी मेघालयात गेलेल्या राजा रघुवंशीच्या मृत्यूनंतर तपासाची दिशा बदलत गेली. पोलिसांनी पत्नी, तिचा कथित प्रियकर आणि इतर काही जणांविरुद्ध कट रचल्याचा आरोप केला. या प्रकरणात राज्यांच्या सीमा ओलांडून तपास झाला, मोबाईल डेटा, आर्थिक व्यवहार आणि डिजिटल पुरावे तपासाचे केंद्रबिंदू ठरले. या प्रकरणातही न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून आरोप अद्याप सिद्ध व्हायचे आहेत.
मेरठ प्रकरण वेगळे का ठरते?
मेरठ प्रकरणाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे विषारी साप असलेल्या कॉमन क्रेटचा वापर. भारतात सर्पदंशामुळे दरवर्षी हजारो मृत्यू होत असल्याने, अशा मृत्यूकडे सुरुवातीला नैसर्गिक किंवा अपघाती घटना म्हणून पाहिले जाण्याची शक्यता अधिक असते. त्याचाच फायदा उठवण्याचा प्रयत्न या प्रकरणात झाला.
या प्रकरणांमध्ये कोणते समान धागे दिसतात?
मेरठ, सिंहगड आणि राजा रघुवंशी या प्रकरणांची पार्श्वभूमी वेगवेगळी असली, तरी तपास यंत्रणांनी केलेल्या प्राथमिक अहवालात काही समान बाबी प्रकर्षाने लक्षात येतात.
- विवाहबाह्य संबंध किंवा वैवाहिक तणाव हा सकृतदर्शनी हेतू.
- आर्थिक लाभ किंवा विमा यांसारखा कथित आर्थिक पैलू.
- अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न.
- मोबाईल कॉल रेकॉर्ड, लोकेशन डेटा, सीसीटीव्ही, डिजिटल व्यवहार यांसारखे इलेक्ट्रॉनिक पुरावे तपासात निर्णायक ठरणे.
- संशयास्पद मृत्यूमध्ये शवविच्छेदन आणि वैज्ञानिक तपासाचे वाढते महत्त्व.
क्रिमिनोलॉजीच्या अभ्यासकांच्या मते, अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी अनेकदा Crime Staging म्हणजेच गुन्हा दुसऱ्याच कारणामुळे झाल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र आधुनिक फोरेन्सिक विज्ञान, डिजिटल पुरावे आणि जैववैद्यकीय तपासामुळे अशा कटांचा उलगडा होण्याचे प्रमाण वाढत आहे.
समाजासाठी या घटनांमधून काय धडा?
मेरठमधील कथित सर्पदंश हत्या असो, सिंहगड पायथ्यावरील प्रकरण असो किंवा राजा रघुवंशी हत्या प्रकरण; ही सर्व प्रकरणे एक गोष्ट अधोरेखित करतात. संशयास्पद मृत्यूच्या प्रत्येक घटनेत वैज्ञानिक तपास, शवविच्छेदन, फोरेन्सिक पुरावे आणि डिजिटल विश्लेषण यांना आज अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. सुरुवातीला साधा अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू वाटणाऱ्या घटनांमागेही गुन्हेगारी कट असू शकतो, हे तपास यंत्रणांना वारंवार अनुभवास येत आहे. त्याच वेळी, अलीकडे काही गाजलेल्या प्रकरणांमुळे जोडीदार आणि कथित प्रियकराच्या संगनमतातून झालेल्या हत्यांची प्रकरणे सार्वजनिक चर्चेत अधिक ठळकपणे येऊ लागली आहेत. मात्र अशा गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचा निष्कर्ष काढण्यापूर्वी अधिकृत गुन्हेगारी आकडेवारी आणि दीर्घकालीन प्रवाहाचा आधार घेणे आवश्यक आहे!
संदर्भसूची
- The Indian Express – Meerut snakebite murder investigation (जुलै २०२६)
- World Health Organization (WHO) – Snakebite Envenoming Factsheet
- The Lancet – Million Death Study: Snakebite Mortality in India
- Indian Council of Medical Research (ICMR) – Snakebite Management Guidelines
- National Centre for Disease Control (NCDC) – Guidelines for Prevention and Management of Snakebite
- Kerala Uthra Murder Case – न्यायालयीन निकाल व अधिकृत न्यायालयीन नोंदी
