मेहुल चोक्सी हे नाव कदाचित आत्तापर्यंत सर्व भारतीयांना माहिती झालं असावं. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी आणि बँकेला हजारो कोटींचा गंडा घालणारा मेहुल चोक्सी भारतात वाँटेड आहे. पण हा सगळा प्रकार उघड होऊन त्याचा शोध सुरू होण्याआधीच मेहुल चोक्सी परदेशात पळाला होता. आधी अमेरिका आणि तिथून अँटिग्वामध्ये गेलेला चोक्सी भारतात कधी परत येतोय, याचीच वाट इथल्या तपास यंत्रणा पाहात आहेत. पण आत्तापर्यंत मेहुल चोक्सी हेच नाव चर्चेत असताना या प्रकरणात आता आणखीन एका नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ते नाव म्हणजे बारबरा जराबिका (Barbara Jarabica)! या नावाची तरुणी मेहुल चोक्सीची गर्लफ्रेंड असल्याचं सांगितलं जात आहे. पण त्याउलट मेहुल चोक्सीच्या पत्नी प्रिती यांनी मात्र बारबरा जराबिका ही मेहुलच्या अपहरणाच्या कटाचा एक भाग असल्याचा दावा केला आहे! नेमकी ही बारबरा जराबिका आहे तरी कोण?

..आणि मेहुलला अटक झाली!

मेहुल चोक्सी उपचारांचं कारण पुढे करून अमेरिकेत गेला असताना तिथून बार्बुडा आणि तिथून त्यानं अँटिग्वामध्ये पलायन केलं. अँटिग्वामध्ये तो बराच काळ राहिला देखील. पण काही दिवसांपूर्वी त्याला अचानक डॉमिनिका पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त समोर आलं आणि आत्तापर्यंत तपासयंत्रणांच्या हातावर तुरी देऊन फरार होणारा चोक्सी पोलिसांच्या ताब्यात आला. २३ मे रोजी तो अँटिग्वामधून फरार झाल्याचं वृत्त आलं होतं. तर चारच दिवसांत २७ मे रोदी त्याला डोमिनिका पोलिसांनी अटक केली. पण त्याला मारहाण करून त्याचा छळ केल्याचा आरोप त्याचे वकील विजय अग्रवाल यांनी केला. तसेच, त्याचं अपहरण करून त्याला अँटिग्वामधून डोमिनिका येथे नेण्यात आल्याचा देखील वृत्तांत सांगण्यात आला. यासंदर्भातले रक्ताळलेल्या डोळ्याचे त्याचे फोटो देखील व्हायरल झाले होते.

मी कायदा पाळणारा माणूस, उपचारासाठी भारत सोडला; चोक्सीचा कोर्टात दावा

कदाचित मेहुल त्याच्या गर्लफ्रेंडसोबत आला असावा!

मेहुल चोक्सी अँटिग्वाहून डोमिनिकाला कसा पोहोचला, याचे तर्क लावले जात असताना डोमिनिकाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी एक विधान केलं की, “कदाचित मेहुल चोक्सी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत फिरण्यासाठी डोमिनिकाला आला असावा”! त्यानंतर चोक्सीच्या या कथित गर्लफ्रेंडचा शोध सुरू झाला आणि त्यातून नाव समोर आलं बारबरा जराबिका! मेहुल चोक्सीला अटक केली, तेव्हा त्याच्यासोबच त्याची प्रेयसी होती असं सांगितलं गेलं. हीच बारबरा जराबिका असल्याचा दावा करण्यात आला. मेहुल चोक्सीच्या पत्नी प्रिती चोकसी यांनी बारबरावर अपहरणाच्या गुप्त कटाचा भाग असल्याचा आरोप करून या दाव्याला पुष्टीच दिली!

चोक्सीशी बारबरा जराबिकाचा संबंध काय?

प्रीती चोक्सी यांच्या आरोपांमुळे बारबरा आणि मेहुल एकमेकांना ओळखत होते हे तर स्पष्ट झालं. प्रीती यांनी केलेल्या आरोपांनुसार, बारबरा काही महिन्यांपूर्वी अँटिग्वामधील त्यांच्या घराजवळ राहायला आली होती. मॉर्निंग वॉकला जाताना मेहुल चोक्सी आणि बारबरा यांची मैत्री झाली. काही दिवसांपूर्वी तिने घर बदललं आणि ती दुसरीकडे राहायला गेली. मेहुलला तिने अँटिग्वातील जॉली हार्बर या ठिकाणी असलेल्या घरी रात्रीच्या जेवणाचं आमंत्रण दिलं. २३ मे रोजी मेहुल संध्याकाळी तिच्याकडे जेवणासाठी गेला, तो परत आलाच नाही! तिथून ८ ते १० लोकांनी त्याचं अपहरण केलं.

मेहुल चोक्सीच्या गर्लफ्रेण्डचे फोटो आले समोर; डिनर डेटला गेलेला असतानाच झाली अटक

बारबरा प्रॉपर्टी डिझायनर?

प्रिती यांच्या दाव्यानुसार, बारबराने आपण प्रॉपर्टी रिनोवेशनच्या क्षेत्रामध्ये काम करतो. पण तिचं नाव खरंच बारबरा जराबिका आहे किंवा नाही, याविषयी प्रिती यांना खात्री नाही. शिवाय, तिचे म्हणून जे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ते देखील ज्या तरुणीशी मेहुल चोक्सीची मैत्री झाली होती, तिचे नाहीत, असा दावा प्रिती चोक्सी यांनी केला आहे! पण जेव्हापासून मेहुल चोक्सीला अटक झाली, तेव्हापासून बारबरा जराबिका गायब झाली आहे. जर मेहुलच्या अपहरणात तिचा हात नव्हता, तर तिने समोर येऊन पोलिसांना खरं काय ते सांगायला हवं, असा देखील दावा प्रिती यांनी केला आहे.

व्हायरल होत असलेले फोटो कुणाचे?

सध्या मेहुल चोक्सी याची कथित गर्लफ्रेंड म्हणून जे फोटो व्हायरल होत आहेत, ते बारबरा जराबिका नावाच्या तरुणीच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरचे आहेत. अशाच प्रकारचे फोटो तिच्या ट्विटर आणि लिंक्डइन प्रोफाईलवर देखील सापडले आहेत. तिच्या लिंक्डइन प्रोफाईलवर तिची माहिती बल्गेरियातील प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट एजंट अशी देण्यात आली आहे. तिला १० वर्षांचा सेल्सचा अनुभव देखील असल्याचं या प्रोफाईलवर नमूद करण्यात आलं आहे. पण काही दिवसांपूर्वीपर्यंत या प्रोफाईलवर तिनं लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये शिक्षण घेतल्याचा उल्लेख होता. पण हे प्रकरण समोर आल्यानंतर हा उल्लेख तिथून काढण्यात आला आहे. लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्सनं देखील अशा नावाची कोणतीही व्यक्ती इथे शिकायला नसल्याचं म्हटलं आहे.

ती मेहुल चोक्सीची गर्लफ्रेंड नाही, तर…; चोक्सीच्या वकिलांनी केला धक्कादायक दावा

९ वर्षांत बारबरानं केलं फक्त एकच ट्वीट!

बारबरा जराबिकाच्या ट्विटर अकाउंटवर तिनं २०१२मध्ये हे अकाउंट सुरू केल्याचा उल्लेख आहे. पण आजपर्यंत तिने फक्त एकच ट्वीट केलं आहे. हे ट्वीट देखील एका कंपनीच्या खरेदीसंदर्भातला छापून आलेला एक लेख होता. ती ७ लोकांना फॉलो करते आणि तिला ११ लोकं ट्विटरवर फॉलो करतात. पण यापैकी १० लोकं हे भारतीय आहेत. शिवाय तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर देखील फक्त ७ फोटो आहेत. २०१९च्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात बुडापेस्टमध्ये हे फोटो काढण्यात आले आहेत. पण तिच्या फोटोंना गेल्या ४ ते ५ दिवसांमध्येच मोठ्या प्रमाणावर लाईक्स मिळाले आहेत.

अशा नावाची महिला खरंच आहे?

बारबरा जराबिका नावाची महिला खरंच आहे का, यांदर्भात भारतीय तपासयंत्रणांकडून होकार किंवा नकार देखील आलेला नाही. मात्र, डोमिनिकाच्या पंतप्रधानांपासून ते मेहुल चोक्सीच्या पत्नीपर्यंत सगळ्यांनीच एक गूढ तरुणी या प्रकरणात महत्त्वाची कडी असल्याकडे निर्देश केले आहेत. आणि आता ही तरुणी गायब असल्यामुळे नेमकी ती गेली कुठे? ती खरंच मेहुल चोक्सीची गर्लफ्रेंड आहे का? मेहुल चोक्सीचं खरंच अपहरण झालं का आणि झालं असेल, तर बारबरा जराबिकाचा त्यात हात होता का? या प्रश्नांभोवतीचं गूढ आता वेगाने वाढू लागलं आहे!