Understand the Science behind Memory Loss and Brain Health in Marathi: घडलेल्या गोष्टी आठवून पुढील कामे करत राहणे हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. आपल्याला बुद्धीचा वापर करून सतत कामे करावी लागतात. परंतु, एखाद्या खोलीत आपण गेल्यानंतर नेमकं कोणत्या कामासाठी आपण त्या खोलीत आलो, हेच विसरून जातो. तसेच कधी चावी कुठे तरी ठेवतो व विसरून जातो. घरी आल्यावर पायमोजे (सॉक्स) नेमकं कुठे काढले होते, ते आपण विसरून जातो. कधीकधी जर आपण काही गोष्टी विसरत असू तर चिंता करण्याची गरज नाही, कारण तो आपल्या मेंदूच्या एका प्रक्रियेचा भाग आहे. पण जर आपण सतत गोष्टी विसरत असू तर मात्र चिंता करण्याची गरज आहे. स्मरणशक्ती कमी होण्यामागील (मेमरी लॉस) विज्ञान काय आहे, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय करायला हवं, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
ग्रेटर नोएडा मधील कैलाश रूग्णालयाचे न्यूरोलॉजिस्ट सल्लागार डॉ. शिशिर पांडे यांनी याबाबत ‘एचटी लाइफस्टाइल’ या वृत्तसंस्थेला माहिती दिली. न्यूरोलॉजिकल घटक आणि वैयक्तिक जीवनशैलीतील आवडनिवड स्मरणशक्ती कमी होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. न्यूरोसायन्समध्ये याबाबत काय सांगण्यात आले, त्याची कारणे काय आहेत ते जाणून घेऊयात.
विसरण्याने कोणता फायदा होतो, ते लाभदायक का ठरते?
आपल्या मेंदूच्या विसरण्याच्या क्षमतेमुळे आपल्याला जीवनात निश्चितच काही फायदे होत असतात. दरम्यान, स्मरणशक्ती चांगली असायला हवी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. ज्यांची स्मरणशक्ती चांगली असते त्यांचे अनेकदा इतरांकडून कौतुक होते. अशा लोकांच्या स्मरणशक्तीला ‘फोटोग्राफिक मेमरी’ असल्याचे म्हटले जाते. दरम्यान, विसरण्याने देखील आपल्याला काही फायदे होतात. मेंदूच्या प्रक्रियेमुळे आपण काही गोष्टी विसरतो.
विसरण्याची प्रक्रिया मेंदूत सतत का सुरू असते?
न्यूरोलॉजिस्ट पांडे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले, “विसरणे हा मेंदूच्या कार्याचा एक भाग आहे. त्यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात, असे न्यूरोसायन्स संशोधन सांगते. मेंदूमध्ये एक फिल्टरिंग सिस्टीम असते. मेंदूपर्यंत येणारी माहिती मेंदू तपासत असतो. त्यातील जी माहिती महत्वाची असते तेवढीच तो साठवून ठेवतो. ही प्रक्रिया मेंदू दररोज करत असतो. एक प्रकारची फिल्टर सिस्टिम मेंदू करत असतो.”
तुम्ही जर दैनंदिन जीवनात कधीकधी काही गोष्टी विसरत असाल तर ते तुमच्यासाठी घातक असतेच असे नाही. आपला मेंदू आपल्यासाठी ज्या गोष्टी, आठवणी महत्वाच्या नाहीत, त्या तो विसरून जात असतो. मेंदूच्या या प्रक्रियेमुळे मेंदूत नवीन माहिती साठवण्यासाठी मदत होते. नवीन माहितीची साठवणूक करण्यासाठी मेंदू तयार होत असतो. त्यामुळे तुम्ही जर विसरत असाल तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरत नाही. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही.
स्मरणशक्ती कमी होण्याची किंवा विसरण्याची कारणे कोणती?
मेमरी डिके – मेंदूतील आठवणी साठवून ठेवणाऱ्या चेता पेशी कमजोर झाल्याने स्मरणशक्ती कमी होते. कालांतराने वयोमानानुसार अथवा माहितीचा अभ्यास करणे थांबवल्याने मेंदूतील पेशी कमजोर होतात.
इंटरफेरन्स – इंटरफेरन्स म्हणजे ज्यावेळी एखादी नवीन माहिती मेंदू साठवतो त्यावेळी जुन्या आठवणींना विसरतो.
तणाव आणि थकवा – तणाव आणि थकवा सतत येत असल्यास मेंदूला नवीन आठवणी साठवून ठेवणे अवघड जाते. त्यामुळे सतत गोष्टी विसरल्या जातात.
एकाग्रता कमी होणे – मेंदूत नवीन गोष्टी व आठवणी साठवून ठेवण्यासाठी पूर्ण एकाग्रतेची आवश्यकता असते. एकाग्रता भंग होत असल्यास मेंदू नवीन गोष्टी साठवून ठेवू शकत नाही.
झोपेचे चक्र बिघडणे – मेंदूच्या स्मरणशक्तीचे कार्य चांगल्या प्रकारे सुरू राहावे यासाठी शांत व गाढ झोपेची आवश्यकता असते. झोप पूर्ण न झाल्यास स्मरणशक्तीवर परिणाम होतो.
‘ही’ लक्षणे आढळली तर वेळीच सावध व्हा!
कधीकधी काही गोष्टी विसरणे हे सामान्य आहे. परंतु, जर सतत गोष्टी विसरत असाल तर मात्र वेळीच सावध होऊन डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ती लक्षणे कोणती ते जाणून घेऊयात.
१) नवीन माहिती किंवा कोणाशी साधलेला संवाद सतत विसरणे.
२) नेहमी करत असलेले काम करण्यात अडथळा येणे.
३) समोरचा आपल्याशी बोलत असल्यास त्याचे बोलणे न समजणे किंवा बोलताना योग्य शब्दांची निवड करणे न जमणे.
४) परिस्थिती समजून घेऊन त्यानुसार निर्णय घेण्यात अडथळा येणे.
५) सतत प्रश्न विचारणे व स्पष्टीकरण मागणे
६) स्मरणशक्ती कमजोर झाल्याने दैनंदिन जीवनातील कामे करताना अडचण येणे.
ही लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करायला हवी, असा सल्ला डॉ. पांडे यांनी दिला.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय कराल?
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक आहे, असे न्यूरोलॉजिस्ट सांगतात. त्याचबरोबर कोडे सोडवणे (पझल), वाचन किंवा नवीन गोष्टी शिकल्याने स्मरणशक्ती वाढते. आपल्याकडे असलेल्या माहितीत आणखी भर घातल्याने आपल्या मेंदूची क्षमता वाढते व स्मरणशक्ती वाढण्यास फायदा होतो, असे डॉ. पांडे सांगतात. दररोज व्यायाम केल्याने शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया चांगली राहते. त्यामुळे मेंदूतील स्मरणशक्तीशी संबंधित भागातील रक्ताभिसरण चांगले होऊन स्मरणशक्ती वाढते. चांगला आहार, ओमेगा -३ फॅट्टी अॅसिड आणि अँटीऑक्सिडेंट असलेले पदार्थ खाल्ल्याने मेंदूचे आरोग्य चांगले राहते.
