Meta YouTube Social Media Addiction Lawsuit: अमेरिकेतील लॉस एंजेलिस मधील एका न्यायालयाने ‘मेटा प्लॅटफॉर्म्स’ व युट्यूबला ६० दशलक्ष डॉलरची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडिया वापरकर्त्यांना (यूजर्स) सोशल मीडियाचे व्यसन लागेल, अशी सोशल मीडिया उत्पादने तयार केली, असा आरोप ‘मेटा प्लॅटफॉर्म्स’ व युट्यूबवर एका तरूणीने केला होता. या प्रकरणात ज्यूरींनी (न्यायालयात पुरावे तपासून निर्णय देणारे पंच) तरूणीच्या बाजूने निकाल दिला आहे. ‘मेटा प्लॅटफॉर्म्स’ व युट्यूबने डिझाइन केलेल्या ‘अ‍ॅडिक्टिव प्रोडक्ट’मुळे (व्यसन लागेल अशी उत्पादने) लहान मुले व तरूणाईच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे निरीक्षण ज्यूरींनी नोंदवले. हे प्रकरण काय आहे? ‘मेटा प्लॅटफॉर्म्स’ व युट्यूब विरोधात कोणता खटला दाखल करण्यात आला होता? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

टेक कंपन्या व्यसन लागेल अशी उत्पादने तयार करत आहेत का?

टेक कंपन्या त्यांच्या प्लॅटफॉर्मसाठी प्रोडक्ट डिझाइन करताना निष्काळजीपणा करत असल्याचे लॉस एंजेलिस मधील ज्यूरींनी म्हटले आहे. तसेच या कंपन्या त्यांच्या प्रोडक्टचा वापर करताना काय काळजी घ्यावी, चुकीचा वापर केल्यास कोणते दुष्परिणाम होतात, हे वापरकर्त्यांना सांगण्यात अपयशी ठरल्या आहेत, असे निरीक्षण नोंदवण्यात आले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स द्वेष, दडपशाही व फसवणूक करत त्यांचे कार्य करत आहेत का ? या प्रश्नाला ज्यूरींनी होकारार्थी उत्तर दिले. ज्यूरींनी या प्रकरणात नुकसान झालेल्या तरूणीला ६० लाख डॉलरची नुकसान भरपाई देण्याचे आदेश ‘मेटा प्लॅटफॉर्म्स’ व युट्यूबला दिले आहेत. त्यापैकी ७० टक्के रक्कम ‘मेटा प्लॅटफॉर्म्स’ व ३० टक्के रक्कम युट्यूब तरूणीला देणार आहे.

अ‍ॅडिक्टिव प्रोडक्ट डिझाइनमुळे अमेरिकेत कोणते दुष्परिणाम?

फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे सोशल मीडिया अ‍ॅप मेटा कंपनीच्या मालकीचे आहेत. या अ‍ॅपचा वापर जगभरात साडेतीन अब्जांहून अधिक लोक करतात. अमेरिकेतही यांचा वापर केला जातो. अमेरिकेत १३ ते १७ वयोगटातील दर दहा मुलामुलींपैकी ९ जण युट्यूबचा मोठ्या प्रमाणात वापर करतात असे २०२५ च्या ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या अहवालातून समोर आले आहे. व्यसन लागेल असे सोशल मीडिया प्रोडक्ट्स व प्लॅटफॉर्म्स मेटाकडून तयार केले जातात असा आरोप सातत्याने करण्यात येतो. पालक, चाइल्ड सेफ्टी ग्रुप्स आणि टेक पॉलिसीशी संबंधित वकिलांनी मेटावर वारंवार आरोप केले आहेत. मेटाच्या अ‍ॅडिक्टिव प्रोडक्ट डिझाइन करण्यामुळे अमेरिकेतील लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होता. तसेच त्यांच्या खानपानाशी संबंधित सवयींवरही परिणाम होतो. ते स्वत:चे नुकसान करून घेतात, असा आरोप मेटा व युट्यूबवर अमेरिकेत सातत्याने झाला आहे.

मेटा व युट्यूब विरोधातील नेमके प्रकरण काय?

इन्स्टाग्रामचा व युट्यूबचा वापर अमेरिकेत लाखो लोक करतात. अमेरिकेत या प्लॅटफॉर्म्स विरोधात अनेक खटले दाखल करण्यात आले होते. अल्पवयीन मुले, शाळा यांनी खटले दाखल केले होते. अखेर न्यायालयाने त्यातील एका प्रकरणावर सुनावणी केली. २० वर्षीय ‘केजीएम’ नावाच्या तरूणीने दाखल केलेल्या याचिकेवर लॉस एंजेलिस मधील न्यायालयात सुनावणी सुरू होती. केजीएमने वयाच्या सहाव्या वर्षी युट्यूबचा, तर नवव्या वर्षी इन्स्टाग्रामचा वापर करणे सुरू केले होते. हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स व्यसन लागेल अशा पद्धतीने बनवण्यात आल्याने त्यांचा वापर केल्याने नैराश्य, तणाव आणि बॉडी डिसमोर्फिया झाल्याचे तरूणीने ज्युरींना सांगितले. सोशल मीडियाकडे एक प्रोडक्ट (उत्पादन) म्हणून पाहायला हवे. त्याचे डिझाइन आणि इतर कंम्पोनेंटचा विचार व्हायला हवा. पोडक्ट लियाबिलिटी स्टँडर्ड त्यासाठी लागू करायला हवे, असे केजीएमने न्यायालयात म्हटले. त्यानंतर ज्युरींनी मेटा व युट्यूबकडे प्रोडक्टच्या दृष्टीकोनातून पाहत खटला सुरू केला.

एंडलेस स्क्रोल फिचर व्यसन लागते?

केजीएमचे वकिल मार्क लेनियर म्हणाले, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सने तयार केलेले डिझाइन डोपामाइन तयार करते. जेव्हा तुम्हाला आनंद मिळतो, तेव्हा मेंदू डोपामिन सोडतो. तो आनंद पुन्हा पुन्हा घेण्याची इच्छा होते. युट्यूब आणि मेटा हे डिजिटल कॅसिनोज प्रमाणे काम करत आहेत. त्यांच्या एंडलेस स्क्रोल फिचरमुळे वापरकर्त्यांना त्याचे व्यसन लागत आहे.

सोशल मीडिया कंपन्यांना कायद्याचे संरक्षण का मिळाले नाही?

सोशल मीडिया विरोधात दाखल होणाऱ्या याचिका ‘कम्युनिकेशन्स डिसेंसी अ‍ॅक्ट’मधील अनुच्छेद २३० मुळे फेटाळल्या जातात. हा अनुच्छेद सोशल मीडिया कंपन्यांसाठी अनेक प्रकरणात फायद्याचा ठरला आहे. वापरकर्त्यांनी पोस्ट केलेल्या कंटेंटसाठी सोशल मीडियाला जबाबदार धरले जाणार नाही, असे हा कायदा सांगतो. त्यामुळे अनेक प्रकरणे ज्युरींपर्यंत पोहोचण्याआधीच न्यायालयाबाहेरच संपुष्टात आली.

याचिकाकर्त्या केजीएम या तरूणीने मात्र या प्रकरणात तिचा दावाच वेगळ्या पद्धतीने मांडला. तिने मेटा व युट्यूबच्या प्रोडक्ट डिझाइन करण्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे हे प्रकरण ‘प्रोडक्ट लियाबिलिटी लॉ’च्या अखत्यारीत आले. आत सोशल मीडियावर काय पोस्ट केले जाते हे विचारात न घेता, त्याला कसे तयार करण्यात आले आहे, याचा विचार केला जातो. ज्युरींनी याच पद्धतीने हे प्रकरण पुढे नेले. त्यामुळे या प्रकरणात केजीएमला न्यायालयातील ज्युरींच्या आदेशानुसार नुकसान भरपाई मिळणार आहे.

ज्युरींनी कशावर भर दिला?

ज्युरींनी या प्रकरणात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आर्किटेक्चर, फिडचे स्ट्रक्चर आणि एंगेजमेंट कशी टिकवून ठेवली जाते, वापरकर्त्यांना पुन्हा पुन्हा अॅपवर कसे आणले जाते, या गोष्टींवर भर दिला. त्यामुळे मेटा व युट्यूबला अनुच्छेद २३० चे संरक्षण मिळू शकले नाही.