प्रणित पवार
केंद्र सरकारने लोकसंख्येतील बदलांचा अभ्यास करण्यासाठी एक नवीन संकेतस्थळ सुरू केले आहे. ‘तुमच्या भागाच्या लोकसंख्येत २०११ नंतर काही असामान्य बदल (अनैसर्गिक) दिसले आहेत का, अशी विचारणाच या संकेतस्थळावरून करण्यात आली आहे.
संकेतस्थळ नेमके काय आहे?
केंद्रीय गृह मंत्रालयाने लोकसंख्येतील बदलांवरील उच्च-स्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीने http://demography.mha.gov.in या नावाने एक संकेतस्थळ सुरू केले असून, याचा उद्देश लोकसंख्येतील अनैसर्गिक बदल (नैसर्गिक जन्म-मृत्यू दरापेक्षा वेगळे), असामान्य वसाहत पद्धती अर्थात एखाद्या ठिकाणी अचानक वेगळ्या पद्धतीने लोक येऊन राहणे आणि बेकायदा स्थलांतर याबद्दल माहिती गोळा करणे हा आहे.
संकेतस्थळावर माहिती कोण देऊ शकते आणि ८ प्रश्न कोणते?
या संकेतस्थळावर केंद्र सरकारची मंत्रालये, राज्य सरकारे, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था आणि सामान्य नागरिकही माहिती देऊ शकतात. संकेतस्थळावर ८ प्रश्न विचारण्यात आले आहेत. गेल्या १५ वर्षांत तुम्हाला माहीत असलेल्या भौगोलिक क्षेत्रात (गाव, शहर, जिल्हा, राज्य) कोणते मोठे लोकसंख्येतील बदल दिसले किंवा अभ्यासले; या बदलांमागील मुख्य कारणे कोणती वाटतात? जसे की जन्मदरातील फरक, सीमेपार स्थलांतर, आर्थिक संधी, पर्यावरणीय घटक; या बदलांचा रोजगार, शिक्षण, आरोग्यसेवा, घरे, पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा, पर्यावरण, सामाजिक सलोखा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला; लोकसंख्येतील बदलीमुळे कोणती आव्हाने निर्माण झाली आहेत; सरकार, स्थानिक संस्था, स्वयंसेवी संस्था किंवा शैक्षणिक संस्थांनी यावर कोणते यशस्वी उपाय केले आहेत का; तुमच्याकडे यासंबंधी काही संशोधन, अहवाल, माहिती संच किंवा इतर पुरावे आहेत का; भारतातील लोकसंख्येतील आव्हानांना तोंड देण्यासाठी तुमच्या पाच प्रमुख शिफारसी किंवा सूचाना कोणत्या; समितीच्या विचारासाठी तुम्हाला आणखी काही टिप्पणी, सूचना किंवा कागदपत्रे जोडायची आहेत का; हे आठ प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतरच छायाचित्र, नकाशे, चित्रफीत ‘अपलोड’ करण्याचा पर्याय मिळतो.
२०११ नंतरचीच माहिती कशासाठी?
भारतात शेवटची पूर्ण जनगणना २०११ या वर्षी झाली होती. त्यानंतर कोविडमुळे जनगणना लांबली आणि आता ती जानेवारी २०२७पासून सुरू होण्याच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे २०११नंतर जिल्हा पातळीवर अधिकृत आणि अद्ययावत विदा सरकारकडे नाही. यासाठीच समिती २०११ नंतरच्या काळावर लक्ष केंद्रित करत आहे.
राज्यांकडून कोणती माहिती मागितली?
समितीने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना ३५ प्रश्नांची यादी पाठवली आहे. त्यात गेल्या १५ वर्षांतील धर्मनिहाय आणि जिल्हानिहाय जन्म नोंदणी, उशिरा झालेल्या नोंदी, फसवणुकीची प्रकरणे; आदिवासी भागातील मंदिरे, मशिदी, चर्च यांसारख्या धार्मिक स्थळांची संख्या आणि गेल्या १५ वर्षात सुरू झालेल्या धार्मिक शैक्षणिक संस्था; आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका नोंदणीत झालेली अचानक वाढ; सीमावर्ती जिल्ह्यांतील व्यावसायिक वाहन परवाने, मालमत्ता हस्तांतरण (जमीन/ घर खरेदी-विक्री), आदिवासी जमिनींवरील अतिक्रमण; बेकायदा स्थलांतरितांचा शोध घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तांत्रिक किंवा समुदाय-आधारित यंत्रणेची माहिती, आदी प्रश्नांचा समावेश आहे.
समितीचा उद्देश काय?
सरकारच्या ठरावानुसार, काही प्रदेशांतील लोकसंख्येतील बदल हे केवळ सामान्य प्रजनन (जन्मदर) किंवा मृत्युदरामुळे नाहीत, तर बाह्य घटक जसे की बेकायदा स्थलांतर, अनियमित लोकसंख्या हालचाल आणि प्रशासकीय हलगर्जी यामुळे आहेत. त्यामुळे सार्वजनिक सेवा, संसाधनांचे वाटप यावर परिणाम होतो, असे सरकारचे म्हणणे आहे. समितीला दोन प्रमुख कामे दिली आहेत. लोकसंख्येतील बदलांची कारणे आणि परिणामांचा अभ्यास करणे; बेकायदा स्थलांतरितांची कायदेशीर, निष्पक्ष आणि वेळेत ओळख, स्थानबद्धता आणि हद्दपारी यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा आणि सीमा व्यवस्थापनासाठी उपाय सुचवणे, ही दोन कामे आहेत. समितीला एका वर्षात त्याबाबतचा अहवाल द्यायचा आहे.
या उपक्रमावर चर्चा काय?
गर्दी किंवा लोकांकडून गोळा केलेली माहिती, छायाचित्र, चित्रफीत हे कितपत वैज्ञानिक आणि विश्वासार्ह असतील, याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच भारतातील अधिकृत नोंदींमध्ये धर्मनिहाय जन्म नोंदणी, वाहन नोंदणी, मालमत्ता व्यवहार अशी माहिती सहसा ठेवली जात नाही. त्यामुळे राज्यांना ही माहिती देणे अवघड जाईल, असा सूर व्यक्त होत आहे. तसेच नागरिकांकडून ओळखण्यायोग्य वैयक्तिक माहिती जसे की मोबाईल क्रमांक, पत्ता घेतला जात आहे. हा विदा किती काळ ठेवला जाईल, कोण पाहू शकेल आणि त्याची सुरक्षा कशी असेल? याबद्दल संकेतस्थळावर स्पष्ट माहिती दिलेली नाही. तसेच नागरिकांनी एकमेकांबद्दल तक्रार नोंदवण्याचा हा प्रकार आहे का, अशीही चर्चा आहे.
या नव्या पद्धतीचा जनगणनेशी संबंध काय?
भारताची पुढील जनगणना पुढील वर्षी सुरू होत आहे आणि त्यासाठी ४० प्रश्नांची नवी प्रश्नावली अधिसूचित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर हे संकेतस्थळ जनगणनेपेक्षा वेगळे, पण पूरक विदा गोळा करण्याचा प्रयत्न मानला जात आहे. जनगणना ही घरोघरी जाऊन केली जाणारी अधिकृत मोजणी असते, तर या संकेतस्थळावर लोकांच्या अनुभवावर आधारित माहिती आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर सीमा व्यवस्थापन, लोकसंख्या स्थिरीकरण आणि केंद्र-राज्य समन्वयासाठी एक कायमस्वरूपी यंत्रणा सुचवली जाण्याची अपेक्षा आहे.
pranit.pawar@expressindia.co.in
