समितीचे स्वरूप काय आहे?
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी गुणवत्ता यादी निश्चित करण्याच्या पद्धतीमध्ये आवश्यक बदल करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन स्तरावरून तज्ज्ञ समिती नियुक्त करण्याचा प्रस्ताव राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आयुक्तांनी २ सप्टेंबर रोजी शासनास सादर केला. त्या अनुषंगाने या प्रवेशांसाठी राज्याच्या सामाईक प्रवेशपूर्व परीक्षेचे अर्थात ‘एमएचटी-सीईटी’चे पर्सेंटाइल, बारावी परीक्षेतील गुणांची टक्केवारी यांचा विचार करून गुणवत्तायादी निश्चित करण्याचे धोरण ठरवण्यासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू, सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू, उच्च शिक्षण संचालक, तंत्रशिक्षण संचालक यांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अहवाल सादर करण्यास १५ दिवसांची मुदत दिली आहे.
समितीची कार्यकक्षा काय?
प्रवेशासाठी बारावी परीक्षेतील शैक्षणिक कामगिरी आणि एमएचटी-सीईटी परीक्षेतील कामगिरीला योग्य प्रमाणात महत्त्व देऊन गुणवत्ता यादी निश्चित करण्यासाठी धोरण निश्चित करण्यासाठी शिफारस करणे; अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र या दोन्ही परीक्षांच्या निकालांमध्ये समतोल साधता येईल, गुणानुक्रम निश्चित करण्याची पद्धत पारदर्शक, वस्तुनिष्ठ व सर्व उमेदवारांसाठी समतोल राहण्यास मदत होईल, या उद्देशाने प्रवेश प्रक्रियेसाठी सीईटी कक्षाद्वारे तयार करण्यात येणार्या गुणवत्ता यादीसाठी बारावीचे गुण, सीईटीतील पर्सेंटाइल प्रमाण निश्चित करणे; बारावीचे गुण आणि सीईटीतील पर्सेंटाइल याचे प्रमाण गृहीत धरून गुणवत्ता यादी जाहीर करण्याचा सकारात्मक विचार झाल्यास बारावी आणि ‘सीईटी’ची तयारी करण्यास उमेदवारांना पुरेसा अवधी राहील याचा विचार करून त्याची अंमलबजावणी कधीपासून करता येईल, याची शिफारस करणे या बाबी समितीने कराव्यात, असे नमूद आहे.
यातून बारावीच्या गुणांना महत्त्व मिळेल?
यंदाच्या एमएचटी-सीईटी प्रवेश प्रक्रियेत काही विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत कमी गुण असल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे केवळ एमएचटी-सीईटी परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश मिळवण्याचा मुद्दा चर्चेत आला. केवळ अभियांत्रिकी, तंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठी आयआयटी, एनआयटीसारख्या केंद्रीय संस्थांतील प्रवेशासाठी बारावीला किमान ७५ टक्के गुण मिळणे अनिवार्य आहे. मात्र, राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र प्रवेशासाठी बारावीच्या गुणांना तितकेसे महत्त्व नाही. औषधनिर्माणशास्त्रासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी पीसीएम गटात ५० टक्के, तर राखीव प्रवर्गासाठी ४५ टक्के, अभियांत्रिकीसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी पीसीएम गटात ४५ टक्के, तर राखीव प्रवर्गासाठी ४० टक्के एवढीच अट आहे. त्यामुळे या गुणांचे फारसे महत्त्वच विद्यार्थ्यांच्या लेखी उरलेले नाही. या पार्श्वभूमीवर, सीईटीच्या पर्सेंटाइलसह बारावीच्या गुणांचे महत्त्व विचारात घेण्याबाबत धोरण ठरवण्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा उद्देश असल्याचे दिसून येते.
तज्ज्ञ काय म्हणतात?
‘समिती नेमण्याचा निर्णय सकारात्मक आहे. बारावीचे गुण आणि सीईटीच्या गुणांना समान महत्त्व असावे किंवा बारावीला किमान ६० टक्के अनिवार्य असणे अशा काही उपाययोजना करता येऊ शकतात,’ असे तज्ज्ञ मार्गदर्शक हरीश बुटले यांनी सांगितले. ‘विद्यार्थी सीईटीसाठी शिकवणी लावतात, खर्च करतात. मात्र, त्यात बारावीच्या परीक्षेचे गांभीर्यच राहत नाही. दोन वर्षांचे महाविद्यालयीन शिक्षण वाया जाते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेचे महत्त्व टिकण्यासाठी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र प्रवेश प्रक्रियेत बारावीच्या गुणांनाही महत्त्व दिले पाहिजे. बारावी व सीईटीचे ५०-५० टक्के गुण विचारात घेतले जावेत,’ असे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी सांगितले.
