मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिहान परिसरात विमान उद्योगासाठी ‘फ्री ट्रेड झोन’ उभारण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतर ‘विशेष आर्थिक क्षेत्र’ (एसईझेड) आणि ‘फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोन’ (एफटीडब्ल्यूझेड) मधील फरक पुन्हा चर्चेत आला आहे. या दोन्ही व्यवस्थांचा उद्देश, उपयोग आणि मिहानसाठी त्यांचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे.

‘फ्री ट्रेड झोन’ आणि एसईझेडमध्ये फरक काय?

‘फ्री ट्रेड झोन’ ही संज्ञा जागतिक स्तरावर अशा क्षेत्रांसाठी वापरली जाते, जिथे आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करण्यासाठी सीमाशुल्क आणि आयात-निर्यात प्रक्रियांमध्ये विशेष सवलती दिल्या जातात. मात्र, भारतात ‘फ्री ट्रेड झोन’ ही स्वतंत्र कायदेशीर श्रेणी नाही. भारतात ‘विशेष आर्थिक क्षेत्र कायदा, २००५’ अंतर्गत एसईझेड आणि एफटीडब्ल्यूझेड या अधिकृत व्यवस्था अस्तित्वात आहेत. एसईझेडचा मुख्य उद्देश उत्पादन, सेवा, निर्यातवाढ आणि रोजगारनिर्मितीला चालना देणे हा आहे. येथे उद्योगांना पायाभूत सुविधा, प्रशासकीय सुलभता आणि करविषयक सवलती दिल्या जातात. याउलट, एफटीडब्ल्यूझेडचा भर  व्यापार आणि साठवणूक व्यवस्थेवर असतो. त्यामुळे भारतात ‘फ्री ट्रेड झोन’चा उल्लेख झाल्यास, तो प्रामुख्याने एफटीडब्ल्यूझेडसारख्या सुविधांशी जोडला जातो.

एसईझेड आणि एफटीडब्ल्यूझेडच्या उद्दिष्टांमध्ये काय फरक आहे?

एसईझेडमध्ये उत्पादन आणि प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य दिले जाते. वाहन, इलेक्ट्रॉनिक्स, एरोस्पेस, माहिती-तंत्रज्ञान आणि अन्नप्रक्रिया अशा विविध क्षेत्रांना येथे चालना दिली जाते. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न असतो. एफटीडब्ल्यूझेडमध्ये मात्र जागतिक पुरवठा साखळी मजबूत करण्यावर भर असतो. येथे आयात केलेल्या वस्तूंची साठवणूक, वर्गीकरण, पॅकेजिंग, री-पॅकेजिंग, लेबलिंग आणि पुनर्निर्यात यांसारख्या सुविधा उपलब्ध होतात. त्यामुळे एफटीडब्ल्यूझेड हे उत्पादन केंद्र नसून ते एक आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक आणि वितरण केंद्र म्हणून काम करते.

मिहानमध्ये ‘फ्री ट्रेड झोन’ची गरज का निर्माण झाली आहे?

मिहानचा विकास विमान उद्योग आणि एमआरओ (मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरहॉलिंग) क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. विमान देखभाल उद्योगासाठी जगभरातून मोठ्या प्रमाणावर सुटे भाग आयात करावे लागतात. ते वेळेवर उपलब्ध होणे आणि सुरक्षितपणे साठवले जाणे आवश्यक असते. सध्याच्या आयात प्रक्रियेत सीमाशुल्क आणि प्रशासकीय मंजुर्‍यांमुळे वेळ व खर्च वाढू शकतो. मिहानमध्ये एफटीडब्ल्यूझेडसारखी सुविधा उपलब्ध झाल्यास विमान कंपन्या आणि एमआरओ कंपन्यांना आवश्यक सुटे भाग मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवता येतील आणि गरजेनुसार ते तातडीने वापरता येतील. यामुळे मिहानला जागतिक दर्जाचे ‘विमान देखभाल-दुरुस्ती केंद्र’ म्हणून विकसित होण्यास मोठी मदत होईल.

मिहानसाठी एसईझेड की एफटीडब्ल्यूझेड?

याचे उत्तर मिहानच्या भविष्यातील विकासाच्या उद्दिष्टांवर अवलंबून आहे. विमानांचे सुटे भाग तयार करणारे उद्योग, एरोस्पेस उत्पादन आणि घटकनिर्मितीला चालना द्यायची असेल, तर एसईझेडची चौकट अधिक फायदेशीर ठरेल. मात्र, विमान कंपन्यांसाठी जागतिक पुरवठा केंद्र, सुट्या भागांची साठवणूक आणि आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक हब तयार करायचे असेल, तर एफटीडब्ल्यूझेड अधिक उपयुक्त ठरेल. प्रत्यक्षात या दोन्हींचा समन्वय साधल्यास उत्पादन आणि व्यापार या दोन्हींना समान गती मिळू शकते.

केवळ ‘फ्री ट्रेड झोन’ची घोषणा केल्याने मिहानचा विकास होईल का?

केवळ नवीन झोन जाहीर करणे पुरेसे ठरणार नाही. अशा प्रकल्पाच्या यशासाठी अनेक पूरक सुविधांची आवश्यकता असते. जलद सीमाशुल्क प्रक्रिया, अत्याधुनिक वेअरहाऊस, विमानतळाशी थेट जोडणी, सक्षम वाहतूक व्यवस्था आणि स्थिर धोरणात्मक वातावरण या बाबी महत्त्वाच्या ठरतात. जागतिक कंपन्या गुंतवणूक करताना केवळ सवलती पाहत नाहीत, तर ‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’, वेळ आणि खर्चाची बचत तसेच पुरवठा साखळीची सक्षमता या गोष्टींचा प्रामुख्याने विचार करतात. त्यामुळे मिहानमध्ये प्रत्यक्ष उद्योगस्नेही वातावरण निर्माण करणे हे सरकारपुढील मोठे आव्हान असेल.

मिहानच्या भविष्यासाठी पुढील दिशा काय असू शकते?

 मिहानमध्ये सध्या एसईझेड आणि नॉन-एसईझेड असे दोन विभाग आहेत. भविष्यात विद्यमान एसईझेडचा विस्तार केला जाणार की स्वतंत्र एफटीडब्ल्यूझेड विकसित केले जाणार, हे सरकारच्या धोरणावर अवलंबून असेल. नागपूरचे देशाच्या मध्यवर्ती भागातील भौगोलिक स्थान, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मल्टिमोडल कनेक्टिव्हिटी या मिहानच्या प्रमुख जमेच्या बाजू आहेत. योग्य नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी झाल्यास मिहानला दक्षिण आशियातील एक महत्त्वाचे एव्हिएशन, एमआरओ आणि लॉजिस्टिक हब बनण्याची मोठी संधी आहे. मात्र, त्यासाठी सरकारने दीर्घकालीन धोरण आखणे, सातत्यपूर्ण प्रयत्न तसेच उद्योगांना अनुकूल वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे.