scorecardresearch

Premium

विश्लेषण : नागपूरचा ‘मिहान’ प्रकल्प ठरू शकतो का उद्योग क्षेत्रासाठी ‘गेम चेंजर’?

अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व काही उद्योजक संघटनांनी टाटा उद्योग समूहाला पत्र पाठवून उद्योग विस्तारासाठी मिहान योग्य ठिकाण आहे याकडे लक्ष वेधले.

mihan project nagpur
येथील वातावरण विमान उड्डाण क्षेत्रासाठी अनुकूल आहे. (Photo- Maharashtra govt website)

-राजेश्वर ठाकरे

विदर्भातील महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्पात उद्योग यावे म्हणून शासनाकडून प्रयत्न केले जात असले तरी त्याला अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. विशेष म्हणजे, येथे उद्योगांसाठी आवश्यक सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. येथील वातावरण विमान उड्डाण क्षेत्रासाठी अनुकूल आहे. ही बाब लक्षात घेऊनच अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व काही उद्योजक संघटनांनी टाटा उद्योग समूहाला पत्र पाठवून उद्योग विस्तारासाठी मिहान योग्य ठिकाण आहे याकडे लक्ष वेधले. या प्रकल्पाचा हा विश्लेषणात्मक आढावा.

devendra fadnavis
तैवानबरोबर तंत्रज्ञान, उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढविणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
Two lakh plots unauthorized
नागपूर : मेट्रो रिजनमध्ये दोन लाख भूखंड अनधिकृत; १५ हजार भूखंडधारकांकडून नियमितीकरणासाठी अर्ज
Maharera
विश्लेषण : महारेराचा विकासकांवर वचक आहे का? आतापर्यंतच्या कारवायांनी नेमके काय साधले?
mns mla pramod patil warn car burn to tmc if bhandarli dumping ground not close
भंडार्ली कचराभूमी बंद करा अन्यथा वाहने जाळू; मनसे आमदार प्रमोद पाटील यांचा ठाणे पालिकेला इशारा

मिहान प्रकल्प काय आहे?

नागपूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ‘मल्टी-मोडल इंटरनॅशनल कार्गो हब ॲण्ड एअरपोर्ट ॲट नागपूर’ (मिहान) हा प्रकल्प आहे. हा देशातील पहिला असा प्रकल्प आहे की, ज्यात आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी आणि कार्गो हब राहणार आहे. येथे प्रवासी आणि कार्गो  टर्मिनससाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मूळ योजना आहे. 

हा प्रकल्प केव्हा सुरू झाला?

महाराष्ट्र सरकारने ४ जानेवारी २००२ ला मिहान प्रकल्पाला मान्यता दिली. त्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) ही नोडल एजन्सी स्थापन केली. जानेवारी २००८ मध्ये केंद्र सरकारने या प्रकल्पाला मान्यता दिली. प्रकल्पाचा आत्मा कार्गो हब असून त्यासाठी किमान दोन धावपट्ट्या आवश्यक आहेत. त्यासाठी तेल्हारा, कलकुही, दहेगाव, खापरी आणि शिवणगाव येथील ४,२०० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. १,३६० हेक्टर विमानतळासाठी आहे

प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय?

मिहान प्रकल्पाचे ठिकाण भौगोलिक दृष्ट्या देशाच्या मध्यभागी आहे. येथून रस्ता, रेल्वे आणि हवाई वाहतूक सहज उपलब्ध आहेत. अस्तित्वात असलेल्या आंतरराष्ट्रीय विमातळालगत बहुउत्पादन विशेष आर्थिक क्षेत्र असलेला बहुधा हा एकमेव प्रकल्प आहे.  विशेष आर्थिक क्षेत्र आणि या क्षेत्राबाहेरील भाग असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. दोन हजार हेक्टरवर विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) आणि त्याबाहेरील परिसर सुमारे एक हजार हेक्टरचा आहे.

प्रकल्पाची सध्या स्थिती काय?

मिहानमध्ये सध्या बीपीएस, टाटा उद्योग समूहाचा टाल आणि टीसीएस, लुपीन फार्मा आदी उद्योग सुरू झाले आहेत. याशिवाय येथे एअर इंडियाचे आणि एएआर-इंदमार टेक्निक्सचची एकूण दोन विमान देखभाल दुरुस्ती केंद्रे (एमआरओ) सुरू आहेत. दसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस लिमिटेडचे काम सुरू झाले आहे. कन्टेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि चा. (कॉन्कॉर) मल्टी-मोडल लॉजिस्टिक्स पार्क आहे. एचसीएल टेक्नालॉजीज लि., इन्फोसिस लि.ने गुंतवणूक केली आहे, तर पतंजली फूड व हर्बल पार्कने जागा घेतली असून हा प्रकल्प  सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे. विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर निवासी संकुले, वाणिज्यिक संकुल, माल साठवणूक केंद्रे विकसित करण्यात आली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्था सुरू झाल्या आहेत. त्यात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम), राष्ट्रीय महाराष्ट्र विधि विद्यापीठ, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल आदींचा समावेश आहे. 

टाटा उद्योग समूहाला साकडे कशासाठी? 

राज्याचे उद्योग मंत्री उदय सावंत यांनी टाटाचा एअरबसचा प्रकल्प नागपूरला येणार असल्याचे सूतोवाच केले आहे. टाटा समूहाकडून भविष्यातील उद्योग विस्ताराचा दृष्टिकोन लक्षात घेता, मिहान येथे आणखी एका एअरबससाठी एमआरओएसची योजना तयार केली जाऊ शकते. कारण येथे यासाठी लागणारी धावपट्टी अस्तित्वात आहे. शिवाय हे शहर देशाच्या मध्यस्थानी असल्याने तसेच समृद्धी महामार्ग आणि येऊ घातलेला ड्रायपोर्टमुळे दळणवळणाच्या तसेच मालवाहतुकीच्या दृष्टीने  सोयीचे आहे. टाटा उद्योग समूहाचे ग्राहक उपयोगी वस्तू, वाहन निर्मिती, विमान वाहतूक आदी उद्योग लक्षात घेता आणि त्याला लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा विचार करता मिहानमध्ये त्या उपलब्ध असल्याने टाटांना उद्योग विस्तारासाठी येथे संधी आहे. त्याचप्रमाणे मिहानमध्ये उपलब्ध जागा आणि मनुष्यबळ या बाबीही फायदेशीर ठरणाऱ्या आहेत. त्यामुळे टाटा उद्योग समूहाच्या विस्तारासाठी मिहान योग्य ठिकाण आहे, अशी विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचे (वेद) उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी यांनी टाटा सन्सचे प्रमुख नटराजन एन. चंद्रशेखरन यांना केली आहे. 

टाटांच्या येण्यामुळे विदर्भाचा फायदा काय?  

विदर्भ हा औद्योगिकदृष्ट्या मागासलेला प्रदेश म्हणून ओळखला जातो. येथे उद्योगधंदे सुरू व्हावे म्हणूनच मिहान प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. येथे टाटासारखे उद्योग समूह आल्यास मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊन रोजगार निर्मिती होईल व या भागातील तरुणांना रोजगार मिळेल. शिवाय टाटांच्या येण्यामुळे औद्योगिक क्षेत्रात सकारात्मक संदेश जाऊन अन्य उद्योग समूहसुद्धा येथे गुंतवणुकीला प्राधान्य देईल. प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास या भागातील  शेतमालाला अधिक किंमत मिळेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mihan project nagpur can be gamechanger print exp scsg

First published on: 14-10-2022 at 06:48 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×