मिरा-भाईंदरमध्ये गेल्या काही वर्षांत ‘पर्युषण पर्वा’च्या काळात आहाराच्या निवडीवरून येथे निर्माण होणाऱ्या वादाची सातत्याने पुनरावृत्ती होत आहे. त्यामुळे धार्मिक भावना आणि नागरिकांचे वैयक्तिक स्वातंत्र्य यांमधील संघर्ष वारंवार समोर येत आहे. हा वाद केवळ एका धार्मिक परंपरेपुरता मर्यादित नसून, त्यामागे जैन समाजाचा वाढता सामाजिक-राजकीय प्रभाव, संघटित मतदारसंघ आणि स्थानिक राजकारणाची समीकरणे दडली आहेत.

नेमका वाद कधीपासून सुरू झाला?

सर्वात पहिल्यांदा उघड वाद २०१५मध्ये सुरू झाला. २०१५मधील महापालिकेने पर्युषण काळात मांसविक्री बंदीचा निर्णय घेतल्यामुळे अन्यधर्मीय जनतेत संताप उसळला होता. तर संदा भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित खासगी शाळेने विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, लसूण, बटाटा इत्यादी पदार्थ न आणण्याचा ‘सल्ला’ दिला. त्यामुळे याही वर्षी हा मुद्दा चर्चेत आला. परिस्थिती वेगळी असली तरी मुख्य प्रश्न समान आहे. एका समुदायाच्या धार्मिक भावना जपत असताना इतर नागरिकांच्या आहाराच्या निवडीचे काय, हा प्रश्न यामुळे उपस्थित होतो. जैन समाजासाठी पर्युषण हा अत्यंत महत्त्वाचा धार्मिक काळ आहे. या काळात अहिंसेला विशेष महत्त्व दिले जाते.

त्यामुळे मांसाहार तसेच काही पदार्थ टाळण्याचे आवाहन केले जाते. धार्मिक भावना लक्षात घेऊन अशी विनंती केली जाणे ही एका बाजूची भूमिका आहे. मात्र, हीच बाब शाळा, महापालिका किंवा अन्य सार्वजनिक संस्थेच्या निर्णयाचा भाग बनली तर त्यावर इतर समाजांकडून प्रश्न उपस्थित होतात. यंदाच्या प्रकरणातही शाळेने पालकांना संदेश पाठवून काही पदार्थ डब्यात न आणण्याचे आवाहन केले. संदेश मागे घेण्यात आला असला तरी विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आहाराच्या निवडीचा मुद्दा यामुळे पुढे आला आहे. शिक्षण विभागानेही याच पार्श्वभूमीवर शाळेकडून खुलासा मागवला आहे.

जैन समाजाचा सामाजिक आणि राजकीय प्रभाव काय?

मिरा भाईंदरच्या राजकारणात जैन समाजाची संघटित उपस्थिती हा या वादांकडे पाहताना लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. शहरातील भाईंदर पश्चिम आणि मिरा रोड परिसरात जैन समाजाची लक्षणीय वस्ती आहे. गेल्या काही दशकांत शहराचा विस्तार होत असताना या समाजातील अनेक कुटुंबे मिरा भाईंदरमध्ये स्थायिक झाली. काही भागांत निवासी इमारतींमध्येच जैन मंदिरे उभारण्याची परंपराही विकसित झाली. त्यामुळे धार्मिक आणि सामाजिक संस्थांचे जाळे शहरात अधिक मजबूत झाले. याचा परिणाम राजकीय पातळीवरही दिसून येतो. जैन समाजाची मतदारसंख्या आणि संघटित उपस्थिती वाढल्याने या समाजाच्या प्रश्नांना स्थानिक राजकारणात महत्त्व मिळत गेले, असे शहरातील राजकीय घडामोडींवरून दिसते. गेल्या तीन विधानसभा निवडणुकांकडे पाहिले तर २०१४मध्ये नरेंद्र मेहता, २०१९मध्ये गीता जैन आणि २०२४मध्ये पुन्हा नरेंद्र मेहता हे मिरा-भाईंदरचे आमदार झाले.

म्हणजेच सलग तीन निवडणुकांत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व जैन समाजातील दोन नेत्यांकडे राहिले आहे. महापौरपदाच्या राजकारणातही जैन समाजातील नेत्यांची उपस्थिती दिसून येते. गीता जैन २०१५ ते २०१७ या काळात महापौर होत्या, तर डिंपल मेहता यांची २०२६मध्ये पुन्हा महापौर म्हणून निवड झाली आहे. मिरा-भाईंदरच्या सर्व महापौरपदांवर जैन समाजाचेच वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे २०१५च्या मांसबंदीच्या वादात जैन समाजाची संघटित ताकदही दिसून आली होती. त्यामुळे पर्युषण किंवा जैन समाजाशी संबंधित एखादा विषय समोर आला की तो केवळ धार्मिक प्रश्न राहत नाही. त्यामागे मोठा सामाजिक समुदाय, संघटित मतदारसंघ आणि स्थानिक राजकीय समीकरणेही जोडली जातात.

मिरा-भाईंदरमध्येच वारंवार वाद का होतात?

मिरा-भाईंदर हे विविध समाजांचे शहर आहे. गेल्या काही दशकांत शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. रोजगार, व्यवसाय आणि घरांच्या उपलब्धतेमुळे राज्याच्या तसेच देशाच्या वेगवेगळ्या भागांतून नागरिक येथे स्थायिक झाले. त्यामुळे शहराची सामाजिक रचना मोठ्या प्रमाणात बदलली. आज शहरात मराठी समाजासोबतच जैन, गुजराती, राजस्थानी, उत्तर भारतीय, मुस्लिम आणि इतर समाजांचे नागरिक राहतात. प्रत्येक समाजाच्या धार्मिक, सामाजिक आणि खाद्यपद्धती वेगळ्या आहेत. त्यामुळे एका समाजाच्या धार्मिक भावनेशी संबंधित निर्णयाचा परिणाम इतरांच्या दैनंदिन जीवनावर होत असेल, तर त्यातून प्रतिक्रिया उमटतात. विशेषतः आहाराचा विषय अधिक संवेदनशील आहे. धार्मिक भावना हा श्रद्धेचा विषय असला तरी काय खावे आणि काय खाऊ नये, हा प्रत्येक कुटुंबाच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न आहे. त्यामुळे या दोन गोष्टी समोरासमोर आल्या की वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते.

राजकारणामुळे वाद अधिक वाढतो?

अशा विषयांना राजकीय रंग मिळाल्यानंतर वाद आणखी वाढतो. धार्मिक भावना, आहार आणि नागरिकांची वैयक्तिक निवड यांचा प्रश्न पक्षांच्या भूमिकांशी जोडला जातो. त्यानंतर मूळ विषयापेक्षा कोणत्या पक्षाने किंवा नेत्याने काय भूमिका घेतली, याची चर्चा सुरू होते. २०१५मध्ये मांसबंदीच्या निर्णयावरूनही असाच राजकीय संघर्ष झाला होता. आठ दिवसांची बंदी लागू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला; मात्र सार्वजनिक आणि राजकीय दबावानंतर तो निर्णय बदलून दोन दिवसांची बंदी ठेवण्यात आली. यंदाही शाळेच्या संदेशावरून राजकीय नेत्यांनी भूमिका मांडल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या डब्यातील खाद्यपदार्थांचा विषयही स्थानिक वरून थेट राज्य स्तरीय राजकारणात चर्चेचा मुद्दा बनला आहे. शाळेला शिक्षण विभागाची नोटीस मिळाल्याने या चर्चेला संस्थात्मक स्वरूपही आले आहे. मिरा-भाईंदरमध्ये विविध समाजांचे मतदार असल्याने अशा विषयांकडे राजकीय पक्षांचेही लक्ष असते. त्यामुळे धार्मिक किंवा सामाजिक प्रश्नाला राजकीय प्रतिक्रिया मिळाल्यानंतर त्याची व्याप्ती वाढली आहे.

मुद्दा जैन समाजाचा की निर्णयाचा?

मिरा-भाईंदरमधील या घटनांकडे केवळ ‘जैन विरुद्ध इतर समाज’ अशा पद्धतीने पाहणे योग्य ठरणार नाही. जैन समाजाच्या धार्मिक भावना आणि पर्युषणाचे महत्त्व लक्षात घेणे आवश्यक आहे. त्याचवेळी इतर नागरिकांच्या आहाराच्या निवडीचाही विचार करावा लागतो. खरा प्रश्न धार्मिक भावना ठेवण्याचा नाही, तर त्या भावना सार्वजनिक निर्णयांमध्ये कोणत्या मर्यादेपर्यंत आणायच्या, हा आहे. एखादी व्यक्ती किंवा कुटुंब धार्मिक कारणामुळे विशिष्ट आहार पाळत असेल, तर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र, तो निर्णय शाळा, महापालिका किंवा अन्य सार्वजनिक संस्थेच्या नियमाचा भाग बनतो तेव्हा त्यावर प्रश्न उपस्थित होतात.

Mayur.Thakur@expressindia.com