मोठा गाजावाजा करून वाहतूक सेवेत दाखल करण्यात आलेला आणि जागतिक स्तरावर गौरविला गेलेला मिसिंग लिंक प्रकल्पाचा पहिल्याच पावसात फज्जा उडाला आहे. आधी खड्डे आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच मिसिंग लिंकवर दरड कोसळली आणि या प्रकल्पाच्या सुरक्षिततेविषयी करण्यात आलेले सर्व दावे पाण्यात वाहून गेले. तेव्हा दरड कोसळण्याची घटना नेमकी कशी घडली आणि त्याचा फटका कसा बसला, याचा हा आढावा…
मिसिंग लिंक प्रकल्पाची गरज का?
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आज सर्वाधिक वर्दळीचा आणि राज्यातील सर्वांत महत्त्वाचा महामार्ग म्हणून ओळखला जातो. सहा पदरी महामार्गावरून काही वर्षांपूर्वीपर्यंत दिवसाला ५५ हजार वाहने धावत होती. पण आता यात मोठी वाढ झाली असून दिवसाला ६५ हजार वाहने धावत आहेत. गर्दीच्या वेळेत, सलग सुट्ट्यांच्या वेळी ही संख्या थेट एक लाखाच्या आसपास जाते. एकूणच या महामार्गावरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर भविष्यात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या वाढत्या वाहनसंख्येमुळे महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला असून हा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एमएसआरडीसीने मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेतला आहे.
दरड कोसळून नुकसान?
घाट भाग कमी होणार असल्याने मिसिंग लिंकचा प्रवास सुरक्षित असेल, असा दावा एमएसआरडीसीकडून केला जात होता. मात्र, सोमवारी पहाटे याच मिसिंग लिंकवर दरड कोसळली. पुणे-मुंबईत मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे झाडे, बांधकामे कोसळण्याच्या घटना सुरूच असताना मिसिंग लिंकवर दरड कोसळली. उंचावरून दरड कोसळून दुसऱ्या बोगद्याच्या कमानीवर पडली आणि कमानही कोसळली. त्यानंतर तातडीने मिसिंग लिंक वाहतुकीसाठी बंद करण्यात आली. सध्या दरड हटविण्याचे काम सुरू असून मिसिंग लिंकवरील मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या मार्गिकेवरून वाहतूक सुरू असून पुण्याहून मुंबईला जाणारी मार्गिका दरड कोसळल्याने बंद आहे. दरड हटवून मिसिंग लिंकवरील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे.
प्रकल्पाच्या सुरक्षिततेचे दावे ठरले खोटे?
मुंबई-पुणे प्रवासाचे अंतर ३० मिनिटांनी कमी करणारा हा प्रकल्प १ मे रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला. मोठा गाजावाजा करून प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. तर जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून या प्रकल्पाची नोंद गिनीज बुकमध्ये झाली. हा प्रकल्प पाहण्यासाठी सुरुवातीला काही दिवस नागरिकांच्या पुलावर अक्षरशः रांगा लागल्या होत्या. राज्यभरातून प्रकल्पाचे कौतुक होत होते. मात्र, तीन-चार दिवसांपूर्वी मिसिंग लिंकच्या पुलावर खड्डे पडले आणि प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले. तांत्रिक कारणे देत एमएसआरडीसीने, राज्य सरकारने यावेळी वेळ मारून नेली. मात्र, सोमवारी पहाटे मिसिंग लिंकवरील दुसऱ्या बोगद्यालगत बोगद्याच्या कमानीवर दरड कोसळली आणि पुलावर दगडमाती, चिखल, पाणी झाले. तातडीने मिसिंग लिंक वाहतुकीसाठी बंद करण्यात आली. त्यानंतर दरड हटविण्याचे काम सुरू झाले. दरड हटविण्यातही आली. मात्र, या दुर्घटनेच्या अनुषंगाने आता प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेसह प्रकल्पाच्या, वाहनचालक-प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विरोधकांसह नागरिकांकडूनही मिसिंग लिंकवर काढून टीका होत आहे.
दरड प्रतिबंधक उपाययोजनांवरही प्रश्न?
मिसिंग लिंकमधील केबल-स्टेड पूल दऱ्याखोऱ्यात बांधण्यात आला असून या परिसरातही दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेता प्रकल्पाचे डिझाइन तयार करताना दरड प्रतिबंधक उपाययोजनांवर भर दिल्याचे एमएसआरडीसीकडून सांगण्यात येत आहे. आयआयटी तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार संरक्षित जाळ्या बसविण्यापासून इतर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, जाळ्या काही निश्चित उंचीवर बसविण्यात आल्या असताना त्यापेक्षा उंचावरून दरड कोसळली आणि एमएसआरडीसीच्या दरड प्रतिबंधक उपाययोजना तोकड्या ठरल्या. पहाटेची वेळ असल्याने या मार्गिकेवरून तुरळक वाहने जात असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ही वेळ सकाळची, दुपारची वा रात्रीची असती तर, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तर प्रकल्पाच्या सुरक्षिततेसह प्रकल्पाच्या कामावरही प्रश्न उपस्थित करत नागरिकांसह राजकीय पक्षांकडून या दुर्घटनेच्या चौकशीची मागणी होत आहे. आता राज्य सरकार यावर काय निर्णय घेते, या प्रकरणाची चौकशी होते का आणि झालीच तर पुढे काय, असा प्रश्न असेल. तसेच यापुढे अशा घटना होऊ नयेत यासाठी एमएसआरडीसी काय करणार, हाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
mangal.hanavate@expressindia.com
