Missing Link Landslide Incident : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सलग सहाव्या दिवशी सर्वदूर पावसाचा जोर कायम आहे. यामुळे अनेक महामार्गांवर दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबई-पुणे मिसिंग लिंकला देखील पावसाचा फटका बसला आहे, मिसिंग लिंकवरील बोगद्याच्या संरक्षक भिंतीचा भाग पुलावर कोसळला आहे. यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या मिसिंग लिंकची पहिल्याच पावसात दैना झाली आहे, यामुळे महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहे.
७१२० कोटींच्या निधीवर पाणी?
मिसिंग लिंक म्हणजे सह्याद्रीच्या पर्वत रांगेत उभा राहिलेला आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार म्हणून संबोधला जातो. ७१२० कोटींचा निधी वापरुन एमएसआरडीसीने हा महामार्ग उभारला. देशातील सर्वात रुंद बोगदा आणि सर्वात उंच केबल स्टेड पूल या मार्गावर उभारण्यात आला. नैसर्गिक आपत्तीचे धोके लक्षात घेऊन मिसिंग लिंकचे काम करण्यात आले, असा दावा सरकारने केला. पण पहिल्याच पावसाने या दाव्यांवर मात्र पाणी फेरले आहे. डोंगर दऱ्यांचा भाग असल्याने मुसळधार पावसात धोके संभवू शकतात, अशी शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती. त्यामुळे पायाभूत प्रकल्पांचे नियोजन, अंमलबजावणी आणि देखभालीबाबत सरकारची भूमिका पुन्हा चर्चेत आली आहे.
सत्ताधाऱ्यांवर टीकेचे बाण
काही दिवसांपूर्वीच मिसिंग लिंकवर खड्डे पडल्याच्या मुद्द्यावर विरोधकांनी सवाल उपस्थित केले. याला प्रत्युत्तर देताना मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘कनेक्टिंग लिंकवर फक्त दोन खड्डे आढळून आले आहेत. संपूर्ण रस्त्यावर खड्डे पडले आहेत, असे म्हणणे चुकीचे आहे. पहिल्या पावसात कामाच्या टिकाऊपणाची चाचणी घेतली जाते. चाचणीच्या आधारावर संभाव्य धोक्यांचा आढावा घेतला जातो. रस्त्याचे काम असो वा उड्डाणपुलाचे काम, ते पूर्ण झाल्यावर स्थिरावण्यासाठी काही वेळ लागतो,’ अशी सारवासारव मुख्यमंत्र्यांनी केली होती.
विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा समाचार घेतला आहे. मिसिंग लिंकवरील खड्ड्यांमुळे सरकारचे तथाकथित ‘विकास मॉडेल’चे पितळ उघडे पडले आहे, असे काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले होते. या सर्व घडामोडींनंतर दोनच दिवसांत मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांवर पुन्हा टीकेचे सत्र सुरु झाले आहे.
पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेणे गरजेचे – सुळे
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘जेवढा निधी खर्च करुन हा महामार्ग बनवला आणि सगळ्यांची योग्य सोय झाली. त्याबद्दल आम्ही सरकारला शुभेच्छा दिल्या. पण ज्या पद्धतीने मिसिंग लिंकच्या बातम्या समोर येतायत ते अतिशय चिंताजनक आहे. वसई विरार, भांडूप यासोबत सगळ्याच भागांत मोठ्या प्रकल्पांची कामं सुरुयत, यादरम्यान अनेक दुर्घटना घडत आहेत. महाराष्ट्रात नक्की काय सुरुय. याआधीही असा पाऊस झाला आहे. पण यावेळी जे नुकसान आणि हानी झाली आहे, ते अतिशय चिंताजनक आहे.’
तर, सुप्रिया सुळेंनी असेही नमूद केले की, ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने आणीबाणी घोषित करावी आणि या सर्व पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेणे गरजेचे आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सत्य सांगावे,’ अशी विनंती केली आणि नागरिकांनी पावसात प्रवास करणे टाळावे, असे आवाहनही खासदार सुळेंनी केले आहे.
निसर्ग चक्रामुळे दरड कोसळली – मुख्यमंत्री
या सर्व परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन केले आहे. या सर्व घटनांना निसर्ग चक्रातील बदल जबाबदार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात पावसामुळे अतिशय अनिश्चित परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईत दरवर्षी सरासरी ८०० झाडं पडतात. काल एका दिवसात ३५० झाडं पडली आहेत. काल जी इमारत पडली ती बेकायेदशीरच होती. ती ज्या छोट्या झोपडीवर पडली त्यातली लोकं मेलेली आहेत, हे गंभीरच आहे. मुंबई पुणे महामार्गावर दरड कोसळली आहे, त्यामुळे या घटना निसर्ग चक्रातील बदलामुळे घडलेले आहेत. तयारी केली नाही असे नाही, पण तयारी केली त्यापेक्षा विपरीत घटना घडत आहेत.
मुख्यमंत्र्यांनी पुढे नमूद केले की, ‘महानगरपालिका, आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व यंत्रणा पूर्णपणे रस्त्यावर आहेत, परिस्थितीचा सामना करत आहेत. जशी कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळली, तत्काळ वाहतूक बंद करण्यात आली, तसेच काही वाहतूक वळवण्यात देखील आली. ज्या गाड्या पाण्यात अडकल्या, त्यांनाही बाहेर काढण्यात आलंय.’
‘आजचा दिवस अधिकच गंभीर आहे. आज दुपारनंतर ताशी ७० ते ९० किमी ताशी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. गेल्या दोन तीन दिवसांत ज्या घटना घडल्या, त्या घटना घडू नये म्हणून कारवाई करण्यात आली. गेलेले मृत्यू परत आणता येत नाही, संवेदनशीलतेने राहावं लागेल. नागरिकांनाही आवाहन करतो की, दुपारनंतर वेगाने वारे वाहणार असल्याने लोकांनी सजग राहावे, शक्यतो सर्वच प्रवास टाळावा,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
विकासाच्या मॉडेलवर प्रश्नचिन्ह
मिसिंग लिंकच्या या घटनेमुळे सरकारच्या विकासाच्या मॉडेलवर टीका केली जात आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या प्रकल्पाच्या सुरक्षेतील त्रुटींवर प्रश्न उपस्थित होत आहेत. पायाभूत प्रकल्प उभारताना गुणवत्तेची आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सरकारने घ्यावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
