मुंबईत सध्या चार मेट्रो मार्गिका कार्यान्वित असून या वर्षात आणखी तीन नवीन मेट्रो मार्गिकांची भर पडणार आहे. नवीन वर्षात मेट्रोचा विस्तार होणार असून त्यामुळे २०२६ मध्ये एकूण सात नवीन मार्गिका कार्यान्वित होणार आहेत. या अनुषंगाने मुंबईतील कार्यान्वित मेट्रो मार्गिकांची संख्या पाचवर जाणार असून ठाण्यात पहिली मेट्रो धावणार आहे. यावर्षी त्यात आणखी एका मेट्रो मार्गिकेची भर पडणार आहे. या वर्षात कोणत्या तीन नवीन मार्गिका सेवेत दाखल होणार, केव्हा दाखल होणार आणि त्यामुळे प्रवाशांना कसा फायदा होणार याचा हा आढावा…

तीन मेट्रो मार्गिकेतील पहिला टप्पा

मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन – मंडाले, मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर – काशीगाव आणि मेट्रो ४, मेट्रो ४ अ मार्गिकेतील गायमुख – कॅडबरी जंक्शन अशा पहिल्या टप्प्यातील कामाला एमएमआरडीएने वेग दिला आहे. त्यानुसार डायमंड गार्डन – मंडाले टप्प्याचे आणि दहिसर – काशीगाव टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या टप्प्याच्या संचलनासाठीच्या मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा, दिल्ली (सीएमआरएस) यांनी चाचण्या घेऊन या दोन्ही मार्गिकेतील पहिल्या टप्प्यास सुरक्षा प्रमाणपत्र दिले. त्यामुळे या टप्प्यांच्या, मार्गिकेच्या संचलनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

डायमंड गार्डन – मंडाले टप्पा नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र आधी तांत्रिक अडचणी आणि त्यानंतर पालिका निवडणूक आचारसंहिता यामुळे या टप्प्याचे लोकार्पण रखडले. तर दुसरीकडे दहिसर – काशीगाव टप्प्याचे काम पूर्ण झाले असून सोमवार, १९ जानेवारी २०२६ रोजी या टप्प्याच्याही संचलनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या टप्प्यासाठी सीएमआरएसकडून एमएमआरडीएला सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले. मात्र गायमुख – कॅडबरी जंक्शन टप्प्याच्या संचलनासाठी ठाणेकरांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. गायमुख – कॅडबरी जंक्शन असा पहिल्या टप्पा सेवेत दाखल करू असे जाहीर करणाऱ्या एमएमआरडीएने प्रत्यक्षात मात्र गायमुख – विजय गार्डन टप्प्यातील चाचण्या (ट्रायल रन) सुरू केल्या. त्यामुळे आधी गायमुख – विजय गार्डन आणि त्यानंतर विजय गार्डन – कॅडबरी जंक्शन असा टप्पा वाहतूक सेवेत दाखल केला जाण्याची शक्यता आहे.

डायमंड गार्डन – मंडाले आणि दहिसर – काशीगाव

मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन – मंडाले टप्प्याला आणि मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर – काशीगाव टप्प्याला सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गिकांच्या संचलनाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता फेब्रुवारीच्या पहिल्या वा दुसर्‍या आठवड्यात या मार्गिका सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. या दोन्ही मार्गिकांतील पहिल्या टप्प्याच्या संचलनात आता कोणत्याही अडचणी नसून केवळ लोकार्पणासाठी राज्य सरकारची वेळ मिळणे शिल्लक आहे. मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली की लोकार्पण होईल आणि हे टप्पे सेवेत दाखल होतील.

दरम्यान, या मार्गिकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा विचार असल्याचीही माहिती समोर येत आहे. हे टप्पे सेवेत दाखल झाल्यास डायमंड गार्डन – मंडाले आणि दहिसर – काशीगाव प्रवास गारेगार, सुकर आणि अतिजलद होणार आहे. वाहतूक कोंडी आणि लोकलच्या गर्दीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल, मानखूर्द आणि मंडाले अशी पाच मेट्रो स्थानके मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन – मंडाले टप्प्यात आहेत. त्यामुळे या भागातील रहिवाशांना आता फेब्रुवारीपासून मेट्रोचा पर्याय उपलब्ध होणार आहे. तर मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर (पूर्व), पांडुरंग वाडी, मिरागाव आणि काशीगाव अशा चार स्थानकांचा समावेश पहिल्या टप्प्यात आहे. दहिसर पूर्व – काशीगावदरम्यानचा प्रवास फेब्रुवारीपासून अवघ्या काही मिनिटांत करणे मिरारोडवासियांना शक्य होणार आहे.

ठाणेकरांना प्रतीक्षा

ठाणेकरांना मात्र मेट्रो प्रवासासाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण सध्या गायमुख – विजय गार्डनदरम्यान केवळ चाचण्या सुरू आहेत. या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर सीएमआरएस चाचण्या आणि त्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे, इतकी प्रक्रिया शिल्लक आहे. मात्र याच वर्षात ठाणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार हे नक्की.