Follow these essential Monsoon Diet Tips Marathi to protect your family from monsoon diseases and digestive issues. पावसाळा सुरू झाला की, वातावरणात आर्द्रता वाढते आणि संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होतो. या ऋतूत आपली पचनशक्ती मंदावते, त्यामुळे आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
काय खावे, काय टाळावे
पावसाळ्यात सर्वत्र पाणी साचते आणि त्याबरोबरच डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पिरोसिस, टायफॉइड, कॉलरा, गॅस्ट्रोएन्टेरायटिस आणि विविध विषाणूजन्य संसर्गांचे प्रमाण वाढते. या काळात केवळ बाह्य स्वच्छता नव्हे, तर योग्य आहारही तितकाच महत्त्वाचा ठरतो. आयुर्वेदानुसार वर्षा ऋतूमध्ये शरीराची पचनशक्ती (अग्नी) तुलनेने मंदावलेली असते, तर आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार आर्द्र हवामानामुळे अन्नामध्ये जिवाणू आणि बुरशी वाढण्याचा वेग अधिक असतो. त्यामुळे या ऋतूत काय खावे आणि काय टाळावे याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
उकळलेले किंवा शुद्ध केलेले पाणीच प्या
पावसाळ्यात नदी, नाले, विहिरी किंवा जलवाहिन्यांमधील पाणी अनेकदा दूषित होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो पाणी उकळून थंड करून पिणे हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. घरात आरओ किंवा वॉटर फिल्टर असल्यास त्याची वेळोवेळी स्वच्छता करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ज्या भागात शुद्धीकरणाची सुविधा नाही, तेथे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून उपलब्ध क्लोरीनच्या गोळ्या किंवा द्रावणाचा वापर करता येतो.

सुंठेचा तुकडा
आयुर्वेदात पाण्यात सुंठेचा छोटा तुकडा ठेवण्याचा उल्लेख आढळतो. यामुळे पाण्याला सौम्य उष्ण गुण मिळतात आणि सर्दी-पडसे होण्याची शक्यता काही प्रमाणात कमी होऊ शकते. मात्र हा पाणी शुद्ध करण्याचा पर्याय नाही; पाणी सुरक्षित करण्यासाठी उकळणे किंवा निर्जंतुकीकरण करणे आवश्यकच आहे.
हलका पण पौष्टिक आहार का आवश्यक?
पावसाळ्यात पचनशक्ती कमी झालेली असल्याने जड, तेलकट आणि अतिखारट पदार्थ पचण्यास वेळ लागतो. त्यामुळे अपचन, आम्लपित्त, पोट फुगणे आणि जुलाब यांसारख्या तक्रारी वाढू शकतात. म्हणून लाह्या, भाकरी, चपाती, वरण-भात, दूध-भात, पिठले, खिचडी यांसारखा साधा, ताजा आणि शिजवलेला आहार अधिक योग्य मानला जातो.
टोस्ट ब्रेड पचण्यास हलका
ब्रेड खाणार असाल तर साध्या ब्रेडपेक्षा टोस्ट केलेला ब्रेड तुलनेने अधिक पचण्यास सोपा असतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, अति खाणे टाळा. हलका आहार जरी असला तरी तो प्रमाणाबाहेर घेतल्यास पचनसंस्थेवर ताण येतो.
स्वयंपाकातील मसाले का फायदेशीर?
हिंग, आलं, सुंठ, मिरी, लसूण, जिरे, कढीपत्ता, पुदीना आणि कोथिंबीर यांसारखे मसाले केवळ चव वाढवत नाहीत, तर पचनक्रियेलाही मदत करतात. आलं आणि लसूण यामध्ये दाहशामक व सूक्ष्मजीवविरोधी घटक आढळतात, तर हिंग आणि जिरे वायूचा त्रास कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हे मसाले मर्यादित प्रमाणात नियमित आहारात वापरणे फायदेशीर ठरू शकते.
तळलेले पदार्थ मर्यादितच…
पहिल्या पावसात गरम भजी, वडे किंवा समोसे खाण्याचा मोह अनेकांना होतो. मात्र अशा पदार्थांमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असल्याने ते पचण्यास वेळ लागतो. वारंवार वापरलेल्या तेलात तयार केलेले पदार्थ तर आरोग्यास अधिक हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे अशा पदार्थांचा आस्वाद कधीतरी आणि मर्यादित प्रमाणातच घ्यावा.
साजूक तूप मर्यादित प्रमाणात वापरल्यास ते पचनास तुलनेने अधिक अनुकूल मानले जाते. मात्र कोणतेही स्निग्ध पदार्थ प्रमाणातच सेवन करणे गरजेचे आहे.
दह्यापेक्षा ताक अधिक उत्तम
आयुर्वेदानुसार पावसाळ्यात दही कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. आधुनिक पोषणशास्त्रानुसारही दही दीर्घकाळ बाहेर ठेवल्यास त्यामध्ये जिवाणू वाढण्याची शक्यता असते. त्याऐवजी ताजे ताक, त्यात सुंठ, आलं, जिरेपूड किंवा सैंधव मीठ घालून घेतल्यास पचनास मदत होते. मात्र ज्यांना डॉक्टरांनी प्रोबायोटिक म्हणून दही खाण्याचा सल्ला दिला असेल त्यांनी वैद्यकीय सल्ल्यानुसारच आहार ठेवावा.
कोणत्या भाज्या आणि धान्यांना प्राधान्य द्यावे?
दुधी भोपळा, दोडका, पडवळ, भेंडी, माठ यांसारख्या भाज्या पचण्यास तुलनेने हलक्या असतात. ताज्या, स्वच्छ धुतलेल्या आणि व्यवस्थित शिजवलेल्या भाज्यांचे सेवन करावे. कच्च्या सॅलडपेक्षा शिजवलेल्या भाज्या या ऋतूत अधिक सुरक्षित मानल्या जातात.
तर प्रतिकारशक्तीला आधार
जुने तांदूळ, गहू, मूग, मटकी आणि चवळी यांसारखी धान्ये तुलनेने हलकी असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे. याबरोबरच आवळा आणि लिंबू यांसारख्या व्हिटॅमिन ‘सी’युक्त पदार्थांचा समावेश केल्यास प्रतिकारशक्तीला आधार मिळतो.
मांसाहाराबाबत काय काळजी घ्यावी?
पावसाळ्यात मांसाहार पूर्णपणे बंद करण्याची गरज नसली तरी तो नेहमी ताजा, स्वच्छ आणि पूर्णपणे शिजवलेला असावा. बाहेरचे अर्धवट शिजवलेले किंवा बराच वेळ उघडे ठेवलेले मांसाहारी पदार्थ टाळावेत. हलके चिकन किंवा मटण सूप घेताना त्यामध्ये आलं, मिरी, लसूण आणि पुदिना वापरल्यास चव आणि पचन दोन्ही सुधारते.
चातुर्मासामागील आरोग्यदृष्टिकोन
भारतीय परंपरेमध्ये आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास पाळला जातो. या काळात अनेक जण मांसाहार टाळतात आणि उपवास करतात. धार्मिक परंपरा हा त्यामागील प्रमुख भाग असला तरी त्याला आरोग्यदृष्ट्याही काही आधार असल्याचे अनेक तज्ज्ञ मानतात. पावसाळ्यात अन्न दूषित होण्याची शक्यता अधिक असल्याने साधा, ताजा आणि सहज पचणारा आहार घेण्याची परंपरा निर्माण झाली असावी, असे काही संशोधकांचे मत आहे.
स्वच्छ पाणी, ताजे अन्न, हलका आहार
पावसाळ्यातील निरोगी राहण्याचा मंत्र म्हणजे स्वच्छ पाणी, ताजे अन्न, हलका आहार, योग्य प्रमाण आणि स्वच्छता. ताप, उलट्या, जुलाब किंवा पोटदुखी यांसारखी लक्षणे दिसल्यास घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. योग्य आहार आणि स्वच्छतेच्या सवयी पाळल्यास पावसाळ्यातील अनेक संसर्गजन्य आजारांपासून स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण करता येते.
( ३० जून २०२४ रोजी प्रसिद्ध झालेला लेख पुनर्प्रकाशित करत आहोत)
