Why appetite decreases in monsoon: “पावसाळ्यात सुद्धा हिवाळ्यासारखीच थंडी असते, मग जशी व जितकी भूक हेमंत-शिशिर ऋतुमध्ये लागते तशी ती प्रावृट्‌- वर्षा ऋतुमध्ये का लागत नाही?” असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. तर यामागील आयुर्वेदाचा विचार समजून घेऊ. हिवाळा व पावसाळा यामध्ये वातावरणात गारवा असूनही पावसाळ्यात भूक का लागत नाही, याचे स्पष्टीकरण महर्षि सुश्रुतांनी दिले आहे. हिवाळ्यात भूक वाढते ती घाम बाहेर टाकणारी त्वचेवरील सूक्ष्म रंध्रे (छिद्रे) बंद झाल्यामुळे, हिवाळ्यातल्या थंडाव्यामुळे ती संकोचतात. त्यामुळे या छिद्रांमधून घामावाटे शरीराबाहेर पडणारा अग्नी (उष्णता) हिवाळ्यात बाहेर न पडता शरीरातच आतल्या आत कोंडून अग्नी प्रबळ होतो आणि भूक व पचनशक्ती वाढते. पावसाळ्यात मात्र तशी स्थिती नसते.

हिवाळ्याप्रमाणे स्वस्थ भूक का नसते?

ज्या थंडाव्यामुळे अग्नी प्रज्वलित होऊन भूक व पचनशक्ती वाढते, तो थंडावाच मुळात या उभय ऋतूंमध्ये भिन्न-भिन्न असतो. हिवाळ्यातला थंडावा हा कोरडा असतो, तर पावसाळ्यातला ओला. पावसाळ्यातला गारवा सुद्धा त्वचेवरील सूक्ष्म रंध्रांचा संकोच करतो, त्यामुळे पावसाळ्यात सुद्धा अधूनमधून, काही प्रमाणात भूक वाढलेली दिसते, परंतु ती हिवाळ्याप्रमाणे स्वस्थ भूक नसते. असे का? तर पावसाळ्यातल्या त्या गारव्याला ओलाव्याची जोड असते. हवेतला ओलावा त्वचेची रंध्रे कोरड्या हवेप्रमाणे पूर्णतः संकोचू देत नाही, त्यामुळे भूक वाढल्यासारखी वाटते; मात्र व्यवस्थित लागत नाही आणि अन्नाचे पचनही नीट होत नाही.

पावसाळ्यात शीतवात बळावतो

महर्षी सुश्रुतांच्या एका श्लोकावर भाष्य करताना सुश्रुतसंहितेचे भाष्यकार आचार्य डल्हण म्हणतात की, पावसाळ्याआधीच्या उन्हाळ्यातल्या कोरड्या हवेमुळे शरीरामध्ये वात वाढलेला असतो. कारण कोरडेपणा (रुक्षत्व) हा वाताचा प्रमुख गुण आहे. उन्हाळ्यात शरीरामध्ये जमत गेलेला तो वात पावसाळ्यात गारव्याची जोड मिळाल्याने प्रकुपित होतो, ज्याला ’शीतवात’ असा शब्द सुश्रुतांनी वापरला आहे. हा शीतवात म्हणजेच गारव्याची जोड मिळाल्याने बळावलेला वात शरीरातल्या अग्नीला प्रबळ न करता उलट अवरोधित (अडथळा) करतो म्हणजे अग्नीला प्रज्वलित होण्यापासून (भडकण्यापासून) अडवतो, ज्यामुळे भूक व पचनशक्ती मंदावते.

Monsoon low appetite Ayurveda causes | Why digestion slows down in rainy season health tips | पावसाळ्यात भूक न लागण्याची कारणे आयुर्वेद | पावसाळ्यात पचनशक्ती मंदावणे घरगुती उपाय
पावसाळ्यात भूक मंदावणे आणि पचनशक्ती कमी होण्याची आयुर्वेदिक कारणे (Image- Gemini)

पित्ताचा त्रास वाढतो

याशिवाय पावसाळ्यात गारवा असला तरी अधुनमधून सूर्यदर्शन होत असते, त्यामुळे घाम येत राहतो. अर्थात घाम काढणारी रंध्रे बंद होत नाहीत आणि अग्नी (उष्णता) शरीरात कोंडला न जाता उलट बाहेर फेकला जातो व अग्निमांद्य होते. याशिवाय पावसाळ्यात शरीरामध्ये वाढलेला ओलावा (क्लिन्नता) अग्नीला प्राकृतरित्या प्रज्वलित तर होऊ देत नाही, उलट आपले पचनाचे कार्य व्यवस्थित करु न शकणारा असा विदाही (पित्ताचा दाह वाढवणारा) होतो, त्यामुळे अन्नाचे अपचन होऊन पित्ताचा त्रास वाढतो.

वर्षा ऋतूमध्ये अग्नी मंद होतो

या संदर्भात आयुर्वेद-शास्त्रकारांनी अजून एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे, तो म्हणजे हेमंत ऋतुमध्ये बलवान शरीरांमध्येच अग्नी प्रबळ होतो. हेमंत ऋतुमध्ये वातावरण व देहस्थिती अशी असते की, मानवाचे शरीर बलवान होते आणि या उलट पावसाळ्यामध्ये वातावरणात गारवा असला तरी शरीर बलवान नसून उलट कमजोर झालेले असते. त्यामुळे वर्षा ऋतूमध्ये अग्नी मंद होतो, याशिवाय महर्षि वाग्भट यांच्या मते शीत ऋतुमध्ये कफ व वात प्रकृती व्यक्तींचा अग्नी मंद होऊ शकतो, जे पावसाळ्यात थंड वातावरण असताना सुद्धा कफ व वातप्रकृतीच्या मंडळींना लागू होऊ शकते.

भूक व पचनशक्ती मंदावते

वर्षा ऋतुमध्ये आदान काळाचा प्रभाव असल्याने माणसाचे शरीर दुर्बल होते आणि या अवस्थेमध्ये अग्नी सुद्धा दुर्बल होतो, असेही अष्टाङ्गहृदय ग्रंथाचे भाष्यकार आचार्य हेमाद्रि सांगतात. दुसरीकडे प्रावृट‌ऋतुमध्ये वात-पित्त-कफ या तीनही दोषांचा प्रकोप होतो, तोसुद्धा अग्नीचे कार्य प्राकृत होऊ देत नाही. त्रिदोष-प्रकोपामुळे अग्निमांद्य आणि अग्निमांद्यामुळे त्रिदोषप्रकोप असे हे दुष्ट चक्र असते, ज्याच्या परिणामी भूक व पचनशक्ती मंदावते.

भूकशक्ती कमजोर होते

एकंदर पाहता वर्षा ऋतूमध्ये पावसाळ्यातले ओलसर वातावरण, त्याला मिळालेली गारव्याची जोड, त्यामुळे शरीरामध्ये वाढलेला ओलावायुक्त थंड गुणांचा वात (थंडाव्यामुळे वाढलेला वात), दुसरीकडे पित्ताचा संचय, बल हिरावून घेणारा आदान काळ, निर्बल शरीर आणि सतत जलवर्षावामुळे शरीराची निष्क्रियता या सर्व कारणांच्या एकत्रित परिणामांमुळे अग्नी मंद होऊन भूक व पचनशक्ती कमजोर करतो.

संदर्भसूची

  • सुश्रुतसंहिता १.६.११
  • अष्टाङ्गहृदय १.३.७
  • अष्टाङ्गसंग्रह१.७.२३८

drashwin15@yahoo.com