Morning Back Pain Reasons: Learn why your back feels stiff in the morning and how lifestyle changes can provide relief: “सकाळी उठल्यावर दोन मिनिटं सरळ उभं राहवत नाही. थोडं चाललं की बरं वाटतं,” हे वाक्य आजकाल चाळिशीनंतरच नाही, तर तरुणांच्या तोंडूनही ऐकायला मिळतं. सकाळी अंथरुणातून उठताना कंबर किंवा पाठ जड झाल्यासारखी वाटणे आणि दिवस पुढे सरकल्यावर हा आखडलेपणा कमी होणे, ही समस्या सर्वसामान्य झाली आहे. अनेकदा याला ‘वय झाले’ म्हणून दुर्लक्षित केले जाते, पण याचे मूळ कारण तुमची खालावलेली जीवनशैली असू शकते.

वयाचा परिणाम नव्हे…

सकाळचं हे दुखणं वाढलं की, अनेक जण लगेच निष्कर्ष काढतात “आता वय झालंय”, “झीज सुरू झाली आहे”, किंवा “हे तर कायमचं आहे.” पण खरंच सकाळी जाणवणारा पाठीचा आखडलेपणा हा केवळ वयाचा परिणाम असतो का? याचं उत्तर अनेकदा “नाही” असं असतं.

सकाळीच पाठ आखडलेली का वाटते?

रात्री आपण साधारणपणे ६ ते ८ तास झोपलेले असतो. या काळात शरीराची हालचाल अत्यंत कमी असते. दिवसभर सतत काम करणारे स्नायू, सांधे आणि इतर ऊती विश्रांती घेत असतात. या दीर्घ विश्रांतीनंतर सकाळी उठल्यावर काही काळासाठी आखडलेपणा जाणवू शकतो. हे अनेक वेळा शरीराचं सामान्य जैविक वर्तन असू शकतं. जसं एखादी गाडी अनेक दिवस न वापरता उभी राहिली तर सुरू होण्यासाठी थोडा वेळ घेते, तसंच शरीरालाही हालचालीची गरज असते.

Morning back pain reasons and stiff back causes | Exercises for back stiffness remedies in Marathi | सकाळी पाठ आणि कंबर आखडणे कारणे व उपाय | पाठीचे दुखणे घालवण्यासाठी घरगुती उपाय
सकाळी पाठ दुखणे आणि आखडणे यावर सोपे उपाय (Image- Gemini)

वय वाढलं की होणारे नैसर्गिक बदल

वय वाढत असताना शरीरातील काही बदल नैसर्गिकरित्या होतात.
उदाहरणार्थ:

  • स्नायूंची ताकद कमी होणं
  • ऊतींची लवचिकता कमी होणं
  • सांध्यांमध्ये वयानुसार बदल होणं
    यामुळे काही प्रमाणात स्टिफनेस जाणवू शकतो.

सक्रिय आणि वेदनामुक्त

मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी प्रत्येक stiffness हा वयामुळेच असतो असं नाही.
काही ६५ वर्षांचे लोक अत्यंत सक्रिय आणि वेदनामुक्त असतात, तर काही ३५ वर्षांचे लोक सकाळी उठल्यावर कंबरदुखीची तक्रार करतात. म्हणजेच वय हा एक घटक आहे, पण ते एकमेव कारण नाही.

जीवनशैलीची भूमिका

आजच्या काळात अनेक लोकांचा दिवस असा असतो:

  • तास न् तास संगणकासमोर बसणं
  • कमी चालणं
  • वाहनांवर जास्त अवलंबून राहणं
  • व्यायामाचा अभाव
  • अपुरी झोप
  • वाढता मानसिक ताण
    या सगळ्यांचा परिणाम शरीराच्या हालचालींवर होऊ शकतो.

झोपेची पद्धतही महत्त्वाची

जे स्नायू नियमितपणे वापरले जात नाहीत, ते कालांतराने कमी कार्यक्षम होऊ लागतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर शरीराला हालचाली सुरू करायला थोडा वेळ लागू शकतो. झोपेची स्थितीही कारणीभूत असू शकते
काही वेळा स्टिफनेसचं कारण पाठ नसून झोपण्याची पद्धत असते.

उदाहरणार्थ:

  • खूप मऊ किंवा अति कडक गादी
  • खूप उंच उशी
  • दीर्घकाळ एकाच स्थितीत झोपणं
    यामुळे सकाळी उठल्यावर मान, पाठ किंवा कंबर आखडल्यासारखी वाटू शकते.

याचा अर्थ गादी बदलली की सर्व समस्या संपतील असं नाही, पण झोपेच्या सवयींचाही विचार करावा लागतो.

कमी हालचाल आणि जास्त स्टिफनेस

कमी हालचाल करणाऱ्या व्यक्तींमध्ये स्टिफनेस अधिक आढळतो. अनेकांना वाटतं की, दुखत असल्यामुळे जास्त आराम करावा. पण अनेकदा उलट घडतं. जेव्हा शरीर कमी हालचाल करतं तेव्हा …

  1. स्नायू कमकुवत होतात
  2. सांध्यांची हालचाल कमी होते
  3. शरीराची क्षमता घटते
    आणि त्यामुळे स्टिफनेस वाढू शकतो.

म्हणूनच ‘मूव्ह मोअर, फियर लेस’ हा आधुनिक पुनर्वसनशास्त्रातील महत्त्वाचा संदेश मानला जातो.

सकाळी चालल्यावर बरं का वाटतं?

अनेक लोक सांगतात:
“उठल्यावर दुखतं, पण थोडं चाललं की बरं वाटतं.” यामागे विज्ञान आहे.
हालचाल सुरू झाल्यानंतर:

  • रक्तपुरवठा वाढतो
  • स्नायू सक्रिय होतात
  • सांध्यांची हालचाल सुधारते
  • मज्जासंस्था हालचालींसाठी तयार होते
    म्हणून स्टिफनेस हळूहळू कमी होऊ शकतो.

कधी डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्यावा?

साधारण काही मिनिटांत कमी होणारा स्टिफनेस अनेकदा गंभीर नसतो.
मात्र खालील लक्षणं असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरू शकतं:

  • स्टिफनेस एक तासापेक्षा जास्त टिकणं
  • सतत वाढत जाणाऱ्या वेदना
  • पायात मुंग्या किंवा कमजोरी
  • रात्री झोपमोड करणाऱ्या वेदना
  • दैनंदिन कामांवर परिणाम होणं
    अशा वेळी योग्य तपासणी आवश्यक असते.

फिजिओथेरेपीची भूमिका

फिजिओथेरेपीमध्ये सकाळच्या स्टिफनेसकडे फक्त वेदना म्हणून पाहिलं जात नाही.
त्याऐवजी:

  • हालचालींची क्षमता
  • स्नायूंची ताकद
  • दैनंदिन सवयी
  • झोपेची पद्धत
  • कामाचं स्वरूप
    यांचा एकत्रित विचार केला जातो.

अनेक वेळा योग्य व्यायाम, हालचालींचं नियोजन आणि जीवनशैलीतील छोटे बदल यांमुळे सकाळचा आखडलेपणा लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.

शरीराला हालचालींची गरज असल्याचा संकेत

सकाळी पाठ आखडलेली वाटणं म्हणजे नेहमीच वय वाढल्याचं लक्षण असतं, असं नाही. त्यामागे कमी हालचाल, दीर्घकाळ बसून काम करणं, झोपेच्या सवयी, स्नायूंची क्षमता आणि एकूण जीवनशैली यांचाही मोठा वाटा असू शकतो. लक्षात ठेवा, शरीराला हालचाल आवडते. अनेक वेळा सकाळचा स्टिफनेस हा शरीर खराब झाल्याचा संदेश नसतो, तर शरीराला पुन्हा हालचाल सुरू करण्याची गरज असल्याचा संकेत असतो.
वय वाढणं आपल्या हातात नाही, पण शरीर किती सक्रिय ठेवायचं हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे.