मोरोक्कोमधून जवळपास ५० हजार स्थलांतरितांनी स्पेनच्या उत्तर आफ्रिकेतील ‘स्यूटा’ या प्रदेशात नुकताच प्रवेश केला. अनेकांनी समुद्रातून पोहत तर काहींनी जमिनीमार्गे स्यूटामध्ये प्रवेश केल्याने मोरोक्को-स्पेन सीमेवर तणाव निर्माण झाला. घुसखोरीच्या संघर्षात ६७ स्थलांतरितांचा मृत्यू झाला. मोरोक्कोच्या नागरिकांनी स्पेनमध्ये प्रवेश का केला? दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध कसे आहेत, हे जाणून घेऊया.

स्पेनच्या स्यूटा प्रदेशात काय घडले?

अलीकडच्या काही दिवसांत मोरोक्को आणि स्पेनच्या ताब्यात असलेल्या ‘स्यूटा’ (Ceuta) या छोट्याशा प्रदेशादरम्यानची सीमा सुरक्षा व्यवस्था कोलमडल्याचे दिसून आले. मोरोक्कोमधून जवळपास ५० हजार स्थलांतरितांनी नुकताच स्पेनच्या या हद्दीत प्रवेश केला. युरोपमध्ये चांगल्या आयुष्याच्या शोधात असलेल्या स्थलांतरितांसाठी स्यूटा हे दीर्घकाळापासून एक प्रवेशद्वार मानले जाते. सतत होणाऱ्या बेकायदा सीमा ओलांडण्याच्या घटनांमुळे या शहराने आपली सीमा अधिकाधिक सुरक्षित आणि मजबूत केली आहे. मात्र गुरुवारी अचानक हजारो निर्वासित मोरोक्कोची सीमा ओलांडून स्यूटा प्रदेशात आले, त्यावेळी प्रचंड गोंधळ उडाला आणि धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. घुसखोरीच्या संघर्षात ६७ निर्वासितांना प्राण गमवावे लागले. स्पेनच्या गृह मंत्रालयाने सांगितले की, स्यूटाची सुरक्षा व्यवस्था मजबूत केली असून ४८ हजार स्थलांतरितांना पुन्हा त्यांच्या मायदेशात परत पाठवले आहे.

स्यूटा प्रदेश कोठे आहे? दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा का?

आफ्रिकेच्या उत्तर किनारपट्टीवर १९.९ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या द्वीपकल्पीय प्रदेशातील स्यूटा हे शहर, आफ्रिका खंडातील स्पेनच्या दोन ‘एक्सक्लेव्हज’पैकी (मुख्य भूभागापासून वेगळे असलेले स्पेनचे प्रदेश) एक आहे. दुसरे शहर ‘मेलिला’ आहे, ते स्यूटापासून आग्नेयेस सुमारे २२० किलोमीटर अंतरावर स्थित आहे. स्पेनची ही दोन स्वायत्त शहरे म्हणजे युरोपीय महासंघाच्या आफ्रिकेबरोबरच्या एकमेव जमिनीवरील सीमा आहेत. जिब्राल्टरची सामुद्रधुनीने स्पेनचा मुख्य भूभाग स्यूटापासून वेगळा होतो. १५८० पासून स्यूटावर स्पेनचे नियंत्रण आहे. स्यूटाची लोकसंख्या ८३,००० हून अधिक आहे. यात ख्रिश्चन आणि मुस्लिम समुदायांचे मिश्रण असून, त्यात मोरोक्को आणि स्पेनमधील रहिवासी तसेच दररोज कामासाठी येणाऱ्या कामगारांचा समावेश आहे. येथील लोकसंख्येने साधारणपणे नेहमीच सलोख्याने वास्तव्य केले आहे.

मोरोक्कोची स्यूटा या शहरावर नजर का?

स्पेनच्या ताब्यात असलेल्या स्यूटा आणि मेलिला या दोन्ही प्रदेशांकडे मोरोक्को अजूनही व्याप्त भूभाग’ म्हणून पाहतो. आठव्या शतकातील इस्लामिक आक्रमणांचा संदर्भ देत मोरोक्को या प्रदेशांवरील स्पेनच्या सार्वभौमत्वाला आव्हान देतो. गेल्या काही वर्षांत, या वादामुळे मोरोक्कोने अनेकदा राजनैतिक तणाव निर्माण केला आहे. २००२ मध्ये, स्यूटाजवळील एका लहान निर्जन बेटावर दोन्ही देशांनी आपापली सैन्यदले पाठवल्यामुळे मोरोक्को आणि स्पेन यांच्यात संघर्षमय परिस्थिती निर्माण झाली होती. नंतर, मे २०२१ मध्ये पश्चिम सहारा या वादग्रस्त प्रदेशावरून राजनैतिक वाद तीव्र झाला असताना, मोरोक्को सरकारने आपल्या सीमांवरील नियंत्रणे शिथिल केली. याचा परिणाम म्हणून, अवघ्या दोन दिवसांत मोरोक्को आणि उप-सहारा आफ्रिकेतील देशांमधून सुमारे ८,००० नागरिक स्यूटामध्ये घुसले. यातील काही स्थलांतरित नंतर परतले, परंतु २०२२ मध्ये स्पेनने पश्चिम सहारासाठी मोरोक्कोच्या स्वायत्तता योजनेला पाठिंबा दिल्यानंतरच हा राजनैतिक तणाव निवळला.

स्यूटा हे स्थलांतराच्या दृष्टीने संवेदनशील केंद्र का बनले आहे?

चांगल्या आर्थिक संधींच्या शोधात किंवा आपल्या देशातील हिंसाचारापासून सुटका करून घेण्यासाठी आफ्रिकेतून युरोपमध्ये जाणाऱ्या लोकांसाठी स्पेन हे एक प्रमुख प्रवेशद्वार आहे. मोरोक्को आणि आफ्रिकेच्या इतर भागांतून स्पेनमध्ये पोहोचू पाहणाऱ्या लोकांसाठी स्यूटा आणि मेलिला ही महत्त्वाची ठिकाणे मानली जातात, त्यामुळे तिथे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. स्यूटा किंवा मेलिला येथे पोहोचणाऱ्या अनेक स्थलांतरितांना त्वरित परत पाठवले जाते, तर काहींना स्पेनमध्ये आश्रयासाठी अर्ज करेपर्यंत स्थलांतरित निवारा केंद्रांमध्ये ठेवले जाते. स्यूटापर्यंत पोहोचण्यासाठी लोक अनेकदा मोरोक्कोमधील ‘फनिदेक’ (Fnideq) या शहरातून पोहत येतात आणि सुमारे पाच किमी अंतर कापतात. काही लोक जवळच असलेल्या ‘बेल्युनेच’ (Belyounech) शहरातूनही हे अंतर पार करण्याचा प्रयत्न करतात. २०२२ मध्ये, प्रामुख्याने उप-सहारा आफ्रिकेतील सुमारे २,००० लोकांनी मोरोक्कोमधून मेलिलामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता २३ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच, २०१४ मध्ये स्यूटाजवळ किमान १४ जणांचा मृत्यू झाला होता; त्यावेळी २०० लोकांनी सीमा कुंपण ओलांडून किंवा शहराला मोरोक्कोच्या प्रदेशापासून वेगळे करणाऱ्या ‘ब्रेकवॉटर’च्या (समुद्रातील लाटांपासून संरक्षण करणारी भिंत) बाजूने पोहत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता.

न्यायालय, स्पेनच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचा परिणाम?

२९ जून रोजी स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयामुळे, समुद्रमार्गे स्यूटा आणि मेलिला येथे पोहोचणाऱ्या स्थलांतरितांना योग्य कायदेशीर प्रक्रियेचे पालन केल्याशिवाय त्वरित परत पाठवण्यापासून प्रशासनाला रोखण्यात आले. या निर्णयामुळे अनधिकृत प्रवेश कायदेशीर ठरला नाही किंवा समुद्रातून पोहत आलेल्यांना स्पेनमध्ये राहण्याची हमीही मिळाली नाही; मात्र मोरोक्कोमधील समाज माध्यमांवर हा निर्णय मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाला आणि त्यामुळे अनेकांनी स्पेनमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. स्पेनमधील ५,००,००० कागदपत्रे नसलेल्या स्थलांतरितांना कायदेशीर दर्जा मिळवून देण्याची योजना पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी आखली आहे. या योजनेसाठी दहा लाखांहून अधिक लोकांनी अर्ज केले आहेत. त्यांच्या निर्णयामुळे सीमेवर घुसखोरी परिस्थिती निर्माण झाली, असे तेथील विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.

sandeep.nalawade@expressindia.com