Mount Everest Famous Green Boots Identity Confirmed : जगातील सर्वोच्च शिखर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माऊंट एव्हरेस्टवर तब्बल ३० वर्षांपासून गोठलेल्या अवस्थेत असलेला एका मृतदेहाची अखेर ओळख पटली आहे. ग्रीन बूट्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मृतदेहाला शिखरावरून खाली आणण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे हा मृतदेह नेमका आहे तरी कोणाचा आणि तो तीन दशकांपासून शिखरावरच का पडून आहे? अशी चर्चा सध्या सगळीकडेच सुरू आहे, त्याविषयीचा हा सविस्तर आढावा…

१० मे १९९६ रोजी माऊंट एव्हरेस्टवर अचानक आलेल्या भीषण हिमवादळात अनेक गिर्यारोहकांना आपले प्राण गमावावे लागले होते. एव्हरेस्टच्या इतिहासातील ही सर्वात जीवघेणी आणि भयानक दुर्घटना मानली जाते. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या एका गिर्यारोहकाचा मृतदेह अजूनही गोठलेल्या अवस्थेत शिखरावरच पडून आहे. तब्बल ३० वर्षानंतरही या मृतदेहाची खरी ओळख पटवण्यात अपयश येत होते. गिर्यारोहकाच्या पायात असलेले हिरव्या रंगाचे बूट पाहून अनेकजण त्याला जगभरात ‘ग्रीन बूट्स’ याच नावाने ओळखत होते. यादरम्यान भारतीय अधिकाऱ्यांनी अलीकडेच या गिर्यारोहकाचा मृतदेह शिखरावरून खाली आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मोहिमेचा आराखडा जाहीर केला आहे. या आराखड्यात ‘ग्रीन बूट्स’ म्हणून ओळखला जाणारा हा मृतदेह भारतीय लष्करातील लान्स नायक दोर्जे मोरूप यांचा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

कोण होते जवान दोर्जे मोरूप?

यापूर्वी १९९६ पासून हा मृतदेह त्सेवांग पालजोर या भारतीय गिर्यारोहकाचा असल्याचा दावा अनेक वृत्तांमधून करण्यात आला होता. पालजोर यांचाही त्याच हिमवादळात मृत्यू झाला होता; पण त्याला केंद्र सरकारकडून कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नव्हता. मात्र, आता अधिकृत पडताळणीनंतर हा मृतदेह आयटीबीपीचे (भारत-तिबेट सीमा पोलीस दल) जवान दोर्जे मोरूप यांचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. यादरम्यान एका शूर जवानाची ओळख केवळ त्याच्या बुटांवरून होणे हे अत्यंत क्लेशदायक असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. सैनिक वेल्फेअर न्यूजच्या माहितीनुसार, दोर्जे मोरूप हे एक यशस्वी आणि अनुभवी भारतीय गिर्यारोहक होते. हिमालयातील कठीण मोहिमांचा मोठा अनुभव असलेले प्रशिक्षित व्यक्ती म्हणून त्यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली होती. आयटीबीपीच्या जुन्या गिर्यारोहण नोंदींमध्येही दोर्जे मोरूप यांचे नाव आढळते. १९७३ मध्ये त्यांनी पँगाँग पर्वतरांगेतील तब्बल सहा हजार ४४२ मीटर उंच ‘काकस्टेट’ शिखर यशस्वीरीत्या सर केले होते. त्या शिखरावरची ती पहिली अधिकृत यशस्वी मोहीम मानली जाते. जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्यांनी अनेक मोठमोठे विक्रम आपल्या नावावर केले होते. आता ३० वर्षांनंतर का होईना, या वीर जवानाला त्याची खरी ओळख आणि सन्मान परत मिळत आहे.

१९९६ मध्ये नक्की काय घडले होते?

१० मे १९९६ रोजी एव्हरेस्टवर अचानक आलेल्या भीषण हिमवादळात एकूण आठ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता. जगातील सर्वोच्च शिखरावरील सर्वात भीषण दुर्घटनांपैकी ही एक मानली जाते. त्या मोहिमेत इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलातील सहा सदस्यांचे पथकही एव्हरेस्ट सर करण्यासाठी निघाले होते. मात्र, शिखराच्या अगदी जवळ असतानाच भीषण हिमवादळाने त्यांना गाठले. विविध अहवालांनुसार, आयटीबीपीचे पथक एव्हरेस्टवरील धोकादाक भागातून पुढे जात होते. त्या उंचीवर ऑक्सिजनचे प्रमाण अत्यल्प असल्याने अत्यंत प्रशिक्षित असूनही त्यांचे शरीर साथ देत नव्हते. परिस्थिती आणखीनच बिकट होत गेल्याने पथकातील तिघांनी पहिल्या टप्प्यातच मागे फिरण्याचा निर्णय घेतला. मात्र, ४७ वर्षांचे दोर्जे मोरुप आणि त्यांचे दोन सहकारी २८ वर्षांचे त्सेवांग पाल्जोर व त्सेवांग समनला यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दुसरा टप्पा पार करून शिखराच्या दिशेने आगेकूच सुरू केली.

दोर्जे मोरूप यांचा मृत्यू कसा झाला?

संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास शिखराच्या कड्यावर भयंकर वादळ सुरू झाले आणि या जवानांचा बेस कॅम्पशी असलेला रेडिओ संपर्क तुटला. रात्री साडेसातच्या सुमारास अंधारात दोन हेड टॉर्चचे प्रकाश किरण हलताना दिसले; पण काही वेळात तो प्रकाशही कायमचा नाहीसा झाला. अतिवृष्टी आणि गोठवणाऱ्या थंडीमुळे या तिन्ही शूर जवानांचा तिथेच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर दोर्जे मोरूप यांचा मृतदेह एव्हरेस्टच्या उत्तर-पूर्व मार्गावरील बर्फाखालीच राहिला. त्यांच्या पायातील हिरव्या रंगाचे बूट मात्र स्पष्ट दिसत असल्याने जगभरातील गिर्यारोहक त्यांना ‘ग्रीन बूट्स’ या नावाने ओळखू लागले. काळाच्या ओघात ही बाब अधिकच वेदनादायक बनली. एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहकांनी त्या हिरव्या बुटांचा मार्गदर्शक खूण म्हणून वापर सुरू केला. उत्तर-पूर्व मार्गावरील अवघड टप्पा पार करताना ‘ग्रीन बूट्स’ हा गिर्यारोहकांसाठी एक महत्त्वाचा दिशादर्शक बनला.

मृतदेहाचे नाव ‘ग्रीन बूट्स’ कसे पडले?

१९९६ पासून एव्हरेस्टच्या आठ हजार ८४८ मीटर उंच शिखराकडे जाणाऱ्या गिर्यारोहकांसाठी ‘ग्रीन बूट्स’ हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जाऊ लागला. द गार्डियनच्या वृत्तानुसार, अनेक गिर्यारोहक बेस कॅम्पशी संपर्क साधताना आम्ही ग्रीन बूट्सपर्यंत पोहोचलो असल्याचे सांगत आपली प्रगती आणि वेळ यांचा अंदाज देत असत. त्या पर्वताने मोरूप यांचा केवळ जीवच घेतला नाही, तर सार्वजनिक स्मृतीतून त्यांची खरी ओळखही पुसून टाकली होती. विविध अहवालांनुसार, दोर्जे मोरूप यांचा मृतदेह एव्हरेस्टच्या शिखरापासून अवघ्या ३५० मीटर अंतरावर एका छोट्याशा खडकाच्या कपारीखाली तसाच पडून आहे. केंद्र सरकारच्या निविदा दस्तऐवजानुसार, दोर्जे मोरूप यांचा मृतदेह परत आणण्यासाठी अनुभवी कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. या मोहिमेसाठी अत्यंत उंच पर्वतीय भागातून मृतदेह खाली आणण्याचा अनुभव असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

शिखरावरून मृतदेह आणणे कठीण का असते?

तज्ज्ञांच्या मते, एव्हरेस्टवर एखाद्या गिर्यारोहकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह खाली आणण्यासाठी ८ ते १० प्रशिक्षित बचावकर्त्यांची आवश्यकता असते. कारण- मृतदेह दोऱ्यांच्या साहाय्याने एका शीटवर ठेवून खाली ओढावा लागतो. अशा परिस्थितीत पारंपारिक स्ट्रेचर वापरता येत नाहीत. एव्हरेस्टवरील रस्ते इतके अरुंद असतात की, एका व्यक्तीलाही व्यवस्थित उभे राहणे कठीण जाते. अशा मोहिमेसाठी जवळपास एक कोटी रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. शिखरावरील ८,००० मीटरपलीकडचा भाग हा ‘डेथ झोन’ म्हणून ओळखला जातो. या भागात समुद्रसपाटीवरील ऑक्सिजनच्या केवळ एकतृतीयांश प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध असतो. त्यामुळे गिर्यारोहकांना चक्कर येणे, मेंदूला सूज येणे किंवा फुफ्फुसांमध्ये द्रव साचणे यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. याशिवाय तेथील खडकाळ आणि घसरणारा रस्ता अत्यंत आव्हानात्मक असतो. त्यातच एव्हरेस्टवरील तापमान खूपच कमी असल्यामुळे कडाक्याच्या थंडीत मृतदेह अतिशय वेगाने गोठतो. मृत्यूनंतर शरीर अधिक जड होते आणि अनेकदा शरीर अनैसर्गिक अवस्थेत गोठलेले असते.