तंबाखू किंवा धूम्रपानाचे कोणतेही व्यसन नसतानाही दिल्लीतील एका २३ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला तोंडाच्या कर्करोगाचे निदान झाले. काही महिन्यांपूर्वी तिच्या जिभेच्या कडेला एक लहानशी जखम (अल्सर) झाली होती. जेवताना चुकून जीभ चावली गेल्यामुळे ही जखम झाली असावी, असा तिचा समज होता. त्यामुळे सुरुवातीला किरकोळ त्रास होत असतानाही तिने जवळपास सहा आठवडे त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिला सुरुवातीच्या टप्प्यातील जिभेचा कर्करोग असल्याचे स्पष्ट झाले. या विद्यार्थिनीच्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या. अभ्यासाच्या प्रचंड तणावामुळे ती अनेकदा जेवण टाळत होती. तसेच, घरचे सकस अन्न आणि ताज्या फळांऐवजी तिने पाकीटबंद अन्न आणि साखरयुक्त पेयांची सवय लावून घेतली होती. तिची जीवनशैली ही शहरांमध्ये राहणाऱ्या अनेक तरुणांप्रमाणेच होती.
तोंडातील फोडाकडे दुर्लक्ष केले, पण निघाला कॅन्सर
यादरम्यान सुरुवातीला तरुणीच्या जिभेवरील किरकोळ वाटणारी जखम काही आठवड्यांनंतर अधिक वेदनादायी झाली आणि त्यामुळे तिला बोलतानाही त्रास होऊ लागला होता. अखेर वाढत्या त्रासामुळे तरुणीने वैद्यकीय मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर केलेल्या तपासणीत तिला सुरुवातीच्या टप्प्यातील तोंडाच्या कर्करोगाचे निदान झाले. बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी याला कारणीभूत ठरत असल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे जर योग्य वेळी आणि सुरुवातीच्या टप्प्यातच निदान झाले, तर रुग्णाचे प्राण वाचवणे आणि त्याला पूर्ववत आयुष्य देणे शक्य होते. सुदैवाने या २३ वर्षीय तरुणीच्या आजाराचे निदानही अगदी सुरुवातीच्या टप्प्यात झाले होते. त्यामुळे डॉक्टरांना शस्त्रक्रिया करून तिच्या जिभेचा बाधित भाग पूर्णपणे काढून टाकण्यात यश आले.
उपचारानंतर तरुणी कर्करोगातून बरी कशी झाली?
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया अशा पद्धतीने केली, ज्यामुळे तरुणीच्या जिभेची नेहमीची कार्यक्षमता आणि बोलण्याची क्षमता पूर्णपणे सुरक्षित राहिली. या जीवघेण्या आजारातून बरे होण्याचा तिचा प्रवास केवळ शस्त्रक्रियेपुरता मर्यादित नव्हता, तर त्यानंतरचे उपचारही तितकेच महत्त्वाचे होते. शस्त्रक्रियेनंतर तरुणीचे आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी डॉक्टरांनी तिच्याकडून बोलण्याचा सराव करून घेतला. तसेच, अन्न आणि पाणी व्यवस्थित गिळता यावे यासाठी आवश्यक थेरपीही दिली. त्याशिवाय शरीराला योग्य पोषण मिळण्यासाठी डॉक्टरांनी तिच्या आहाराचे काटेकोर नियोजन केले आणि हळूहळू तिला नेहमीचा सामान्य आहार सुरू करण्यात आला. या सर्व प्रयत्नांमुळे अवघ्या काही आठवड्यांतच तरुणीचा बोलण्याचा आत्मविश्वास परत आला आणि तिने अर्धवट राहिलेले महाविद्यालयीन शिक्षण पुन्हा सुरू केले. आता ही तरुणी तिचे नेहमीचे सामान्य आयुष्य जगत आहे. सध्या ती नियमित वैद्यकीय तपासणी करत असून पूर्णपणे निरोगी आहे. या तरुणीची कहाणी एक महत्त्वाचा वैद्यकीय इशारा देणारी ठरत आहे.
तोंडाच्या कॅन्सरचे स्वरुप कसं बदलतंय?
तोंडाचा कर्करोग हा भारतात सर्वाधिक आढळणाऱ्या कर्करोगांच्या प्रकारांपैकी एक आहे. गेल्या अनेक दशकांपासून हा कर्करोग प्रामुख्याने तंबाखूचे सेवन, सुपारी चघळणे आणि अतिमद्यपान यांच्याशी संबंधित मानला जात होता. मात्र तज्ज्ञांच्या मते, आता या आजाराचे स्वरूप आता झपाट्याने बदलत आहे. तंबाखू किंवा दारूचे कोणतेही व्यसन नसलेले तरुण, महिला आणि आरोग्याची काळजी घेणाऱ्या नागरिकांमध्येही तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. कोणतेही व्यसन नसल्यामुळे आपल्याला कर्करोग होऊच शकत नाही, असा एक गैरसमज लोकांमध्ये निर्माण होतो. त्यामुळेच तोंडात दीर्घकाळ राहणारा एखादा फोड किंवा जखम यांसारख्या गंभीर लक्षणांकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. काहीजण दातांची किरकोळ समस्या, मानसिक तणावामुळे आलेली उष्णता किंवा चुकून दात लागून झालेली जखम समजून त्यावर घरगुती उपचार करतात. परिणामी, मूळ आजाराची तपासणी करण्यास खूप उशीर होतो आणि तोपर्यंत कर्करोग पुढच्या टप्प्यात पोहोचलेला असतो. तोंडाचा कर्करोग हा जिभेवर, हिरड्यांमध्ये, गालांच्या आतील भागात, ओठांवर, तोंडाच्या तळाशी, टाळूवर तसेच घशाच्या भागात विकसित होऊ शकतो.
धूम्रपान न करणाऱ्यांनाही कॅन्सरचा धोका?
धूम्रपान किंवा तंबाखूचे सेवन न करणाऱ्या व्यक्तींना तोंडाचा कर्करोग कसा होऊ शकतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, व्यसन नसलेल्या लोकांमध्ये हा आजार होण्यामागे अनेक वेगवेगळी आणि न दिसणारी कारणे असू शकतात. धावपळीची जीवनशैली, आहारातील बदल आणि आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे हा धोका अधिक वाढतो. तुटलेले किंवा धारदार दात, नीट न बसणारी दातांची उपकरणे, यामुळे तोंडाच्या आतील त्वचेला वारंवार दुखापत होते. ही जुनी जखम दीर्घकाळ बरी न झाल्यास तिथे कर्करोगाची सुरुवात होऊ शकते. योग्य स्वच्छता न राखणे हे यामागचे मोठे कारण आहे. ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) या विषाणूचा संसर्गही तरुणांमधील तोंडाच्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरत आहे. याशिवाय शरीरातील पोषणतत्त्वांची कमतरता शरीरातील पेशींची दुरुस्तीची क्षमता कमी करते. अति-प्रक्रिया केलेले अन्न खाणे आणि आहारात फळे-पालेभाज्यांचा अभाव असल्यामुळे तोंडाच्या आतील भागाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास आणि दीर्घकालीन मानसिक तणाव यामुळेही हा धोका वाढतो.
तोंडाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे कोणती?
तज्ज्ञांच्या मते, तोंडाच्या कर्करोगाच्या उपचारांमधील सर्वात मोठे आव्हान म्हणजे- त्याची सुरुवातीची लक्षणे अतिशय सौम्य आणि वेदनारहित असू शकतात. तोंडात आलेला एखादा फोड किंवा जखम दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. त्याशिवाय तोंडाच्या आत पांढरे किंवा लाल रंगाचे चट्टे पडणे, तोंडातून अचानक आणि विनाकारण रक्त येणे, अन्न किंवा पाणी गिळताना त्रास किंवा वेदना होणे, तोंड पूर्ण उघडण्यास अडचण येणे, दात सैल होणे, सतत घसा खवखवणे, आवाजात बदल होणे किंवा मानेत गाठ जाणवणे ही लक्षणे कधीही दुर्लक्षित करू नयेत. ही सर्व लक्षणे नेहमीच कर्करोगाचीच असतात असे नाही, मात्र त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. दिलासादायक बाब म्हणजे, तोंडाच्या कर्करोगाचे वेळेवर निदान झाल्यास त्यावर यशस्वी उपचार करणे शक्य होते. सुरुवातीच्या टप्प्यात त्याचे निदान झाल्यास रुग्णावर जास्त आक्रमक उपचार करावे लागत नाहीत. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचे बोलणे, गिळण्याची क्षमता आणि चेहऱ्याचा आकार पूर्ववत राहण्याची शक्यता खूप जास्त असते. जर उशिराने निदान झाले, तर रुग्णाला मोठी शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी आणि प्रदीर्घ उपचारांना सामोरे जावे लागू शकते.
