महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध भरती प्रक्रियांमध्ये कथित गैरप्रकार, उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाबाबतचे आक्षेप, न्यायालयीन प्रकरणे आणि चौकशी यांमुळे हजारो उमेदवारांचे भवितव्य अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडले आहे. परीक्षा व्यवस्थेतील या अनिश्चिततेचा फटका उमेदवारांच्या वयासोबतच त्यांच्या आर्थिक आणि मानसिक स्थितीलाही बसत आहे.
‘एमपीएससी’च्या भरती प्रक्रियांमध्ये सध्या अनिश्चिततेचे वातावरण का आहे?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांमध्ये कथित गैरप्रकार, उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाबाबत उमेदवारांचे आक्षेप, न्यायालयीन प्रकरणे आणि चौकशी यामुळे भरती प्रक्रियांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. काही परीक्षांमध्ये गैरप्रकारांच्या आरोपांमुळे चौकशी सुरू आहे. काही परीक्षांचे निकाल किंवा नियुक्त्या रखडल्या आहेत, तर काही परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याची वेळ आली आहे. या संपूर्ण गोंधळामुळे राज्य शासनाने सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली. समितीने राज्यभर दौरे करून परीक्षा सुधारणांसाठी विद्यार्थ्यांच्या सूचना जाणून घेतल्या. यानंतर समिती परीक्षा सुधारणांचा एक अहवाल तयार करून तो राज्य शासनाला सादर करणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे एमपीएससीने आगामी सर्व भरती प्रक्रिया थांबवल्या आहेत. तसेच सरळसेवा भरती प्रक्रियाही थांबल्य आहेत. आयोगाने राज्यसेवा, स्थापत्य अभियांत्रिकी आणि गट-बच्या मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे परीक्षा देण्यापासून ते प्रत्यक्ष नियुक्ती मिळेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर उमेदवारांना अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे.
औषध निरीक्षक पदभरती प्रकरणाचा परिणाम नेमका काय झाला?
औषध निरीक्षक (गट-ब) पदभरतीतील कथित पेपरफुटीचे प्रकरण आयोगाच्या परीक्षा व्यवस्थेतील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले. या परीक्षेचा निकाल १२ जून रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर १ ते २२ जुलैदरम्यान मुलाखतींची प्रक्रियाही पार पडली. मात्र, परीक्षेतील कथित गैरप्रकारांच्या तक्रारीनंतर गुन्हे शाखा आणि विशेष तपास पथकाकडून तपास करण्यात आला. या प्रकरणात अटकसत्र सुरू झाल्यानंतर २६ ऑगस्ट रोजी आयोगाने परीक्षा रद्द केली. विशेष म्हणजे, निकाल आणि मुलाखतींचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर परीक्षा रद्द करण्याची वेळ आल्याने उमेदवारांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. परीक्षा प्रक्रियेतील सुरक्षेच्या उपाययोजना, प्रश्नपत्रिकांची गोपनीयता आणि गैरप्रकार रोखण्याची यंत्रणा किती सक्षम आहे, असा प्रश्न या प्रकरणामुळे निर्माण झाला. महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०२४ ची अंतिम शिफारस यादी १७ जून २०२६ रोजी प्रसिद्ध झाली. मात्र, निवड झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ च्या प्रक्रियेतही नियुक्त्यांचा प्रश्न कायम आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे या भरतीतील पुढील टप्प्यांवर परिणाम होत आहे. यामुळे आयोगाची परीक्षा घेण्याची जबाबदारी आणि शासनाची नियुक्ती प्रक्रिया यांच्यातील समन्वयाचा प्रश्नही तापला आहे. उमेदवारांची निवड झाल्यानंतरही सेवेत रुजू होण्यासाठी अनिश्चित काळ प्रतीक्षा करावी लागत असेल, तर भरती प्रक्रियेच्या कालमर्यादेचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होतो.
राजपत्रित परीक्षांबाबतही प्रश्न का उपस्थित होतात ?
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा २०२५, गट-ब संयुक्त परीक्षा २०२५ आणि गट-क संयुक्त परीक्षा २०२५ या परीक्षांच्या प्रक्रियेबाबत चौकशी आणि न्यायालयीन प्रकरणांचा संदर्भ दिला जात आहे. ‘गट-ब’ची मुख्य परीक्षा १७ मे २०२६ रोजी, तर ‘गट-क’ची मुख्य परीक्षा १२ जुलै रोजी पार पडली. मात्र, परीक्षा झाल्यानंतर निकाल आणि पुढील निवड प्रक्रियेबाबतची प्रतीक्षा उमेदवारांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. प्रत्येक भरती प्रक्रियेत काही ना काही कारणाने विलंब होत असल्याचे चित्र निर्माण झाल्याने आयोगाच्या वार्षिक परीक्षा नियोजनावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाबाबत उमेदवार आणि विद्यार्थी संघटनांनी आक्षेप नोंदवले होते. त्यानंतर आयोगाने पुनर्मूल्यांकनाचा निर्णय घेतला. मूल्यांकनातील त्रुटी दूर करून उमेदवारांना न्याय देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असला, तरी त्याचा परिणाम पुढील परीक्षांच्या वेळापत्रकावर झाला आहे. या निर्णयामुळे ३ ऑक्टोबर २०२६ पासून नियोजित राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा २०२६ आणि महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा २०२६ पुढे ढकलण्यात आल्या. एका परीक्षेतील मूल्यांकनाबाबतचे आक्षेप दूर करण्याच्या प्रक्रियेचा परिणाम अन्य परीक्षांच्या नियोजनावरही झाला.
सर्व प्रक्रियांचा उमेदवारांवर काय परिणाम होतो ?
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी वय ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अनेक उमेदवार पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही वर्षे पूर्णवेळ अभ्यास करतात. परीक्षा पुढे ढकलली गेली, निकाल रखडला किंवा नियुक्तीला विलंब झाला, तर त्यांच्या वयाचा आणि उपलब्ध संधींचा प्रश्न निर्माण होतो. वयोमर्यादेमुळे भविष्यातील परीक्षांपासून वंचित राहण्याची भीतीही त्यांना सतावत असते. याशिवाय, खासगी शिकवणीचे शुल्क, अभ्यास साहित्य, निवास आणि दैनंदिन खर्च यांमुळे आर्थिक भार वाढतो. ग्रामीण भागातील उमेदवारांना शेतीतील संकट आणि कुटुंबाची आर्थिक ओढाताण यांचाही सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत परीक्षा प्रक्रियेतील प्रत्येक विलंब त्यांच्या आर्थिक नियोजनावर आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करणारा ठरतो. स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश घरबुडे यांनी परीक्षा प्रक्रियेतील विलंबाबाबत चिंता व्यक्त केली आहे. परीक्षा पुढे ढकलणे, निकालांना विलंब आणि नियुक्त्या रखडणे यामुळे उमेदवारांचे वय वाढत असून, त्यांच्यावरील आर्थिक आणि मानसिक ताणही वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘एमपीएससी’समोरील सर्वात मोठे आव्हान कोणते?
आयोगासमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे परीक्षांच्या विश्वासार्हतेसोबतच भरती प्रक्रियेतील सातत्य आणि वेळेची निश्चितता कायम ठेवणे आहे. पेपरफुटीसारखे कथित गैरप्रकार रोखण्यासाठी अधिक प्रभावी सुरक्षा व्यवस्था, उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनात पारदर्शकता आणि तक्रारींचे वेळेत निराकरण करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर न्यायालयीन प्रकरणे किंवा चौकशी सुरू असली, तरी त्यांचा परिणाम अन्य भरती प्रक्रियांवर कमीत कमी होईल, असे नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे. एमपीएससीने परीक्षा जाहीर करण्यापासून ते उमेदवारांच्या नियुक्तीपर्यंत प्रत्येक टप्प्यासाठी कालबद्ध आराखडा निश्चित करणे आवश्यक आहे. याचे वेळापत्रत दरवर्षी तयार केले जात असले तरी त्याचे पालन होत नसल्याने सर्व गोंधळ आहे. त्यामुळे परीक्षा, उत्तरपत्रिका तपासणी, निकाल, मुलाखती, अंतिम शिफारस आणि नियुक्ती या प्रक्रियांचे वेळापत्रक सार्वजनिक करून त्याच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेणे आवश्यक राहणार आहे.
deveshkumar.gondane@expressindia.com
